रविवार, ५ जानेवारी २०२५
5 January 2025

सगळेच नियम धाब्यावर बसमध्ये कधीच शिक्षक नसतात, दोन दरवाज्यांच्या नियमासही फाटा

परदेशात कारमधून मुलांना न्यायचे असेल तर मुलांची कारसीट असल्याशिवाय नेता येत नाही. महाराष्ट्रात मात्र बसमधून बाहेर डोकावणारे मुल गळा कापला जाऊन सहजपणे मारले जाते त्याचा दोषही मुलाच्याच नावे जमा होतो.

राज्य शासनाने २२ मार्च २०११ रोजी शालेय बसवाहतुकीसाठी काही नियम केले. ठाण्यात एका स्कूलबसला आग लागली होती तर मुंबईतही मुलांची ने आण करणाºया कारने पेट घेतला होता. या घटना घडल्यानंतर स्कूलबससाठीचे नियम कठोर करण्याची मागणी होऊ लागली. त्यातून या नियमांचा जन्म झाला तर आता ते देखील जास्ती त्रासदायक आहेत अशी ओरड संस्थाचालकच करु लागल्याचे परिवहन विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. आता काही दिवस आरटीओ काम नीट करत नाहीत म्हणून ओरड होईल पण एकही संस्था स्कूल बसचे नियम आणखी कठोर करा असे म्हणत कधीच समोर येत नाही असेही तो अधिकारी म्हणाला.

प्रत्येक स्कूलबससोबत एक शिक्षक असलाच पाहिजे, मुलींची ने आण करणाऱ्या बसमध्ये शिक्षीका असायला हवी, त्यांनी मुलींच्या सर्व गरजांकडे लक्ष द्यायला हवे असाही नियम कागदावर आहे पण किती शाळा आपल्या बससोबत शिक्षकांना पाठवतात याची आम्ही तपासणी करायला गेलो की संस्थाचालक आमच्यावर दबाव आणतात, बस सोडून द्यायला सांगतात अशी तक्रारही काही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी केली आहे.

याचा अर्थ हे अधिकारी फारच चांगले काम करत आहेत असाही नाही. अनेक पोलीस, आरटीओ चिरीमिरीसाठीच स्कूलबसकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात अशी पालकांची बाजू आहे.

शासनाने केलेले नियम किती स्कूलबसमधून पाळले जातात, किती पालक त्यासाठी आग्रही असतात याचे खरे तर व्यापक सर्व्हेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र सगळ्यांच्या हातमिळवणीत निरपराध मुलांचे हाकनाक जीव जातात, तेवढ्यापुरते त्यावर वादंग होते आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या होत रहाते हेच वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.

कायदा काय म्हणतो –

  • प्रत्येक बसला दोन दरवाजे असावेत.
  • स्कूलबससाठीच्या वाहनाची संपूर्ण स्टील बॉडीसह बंद स्वरुपाची बॉडी असेल. कोणत्याही कॅनव्हॉस हूड असलेल्या वाहनास स्कूल बस म्हणता येणार नाही. आतमध्ये मुलांसाठी लॉक यंत्रणा जोडलेली असावी.
  • स्कूलबससोबत ने आण करणाऱ्या शाळेतील मुलांची संपूर्ण यादी असावी. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, निवासाचा पत्ता, दूरध्वनी किंवा मोबाईल, मुलांचा रक्तगट आणि मुलामुलींच्या नावासमोर बसमध्ये चढण्याचे व उतरण्याच्या थांब्याचे ठिकाण, घराजवळचे एखादे खूण, या गोष्टी नमूद असायला हव्यात.
  • यादीसोबत मूळ ठिकाण, समाप्तीचे ठिकाण आणि वापरण्यात येणारा तपशिलवार मार्ग दाखविणारा शाळेच्या मुख्य व्यक्तीकडून स्वाक्षरी केलेला मार्गदेखील नमूद आहे.
  • प्रत्येक बसमध्ये चालकाशिवाय एक शिक्षक असेल. मुलींसाठीच्या बसमध्ये शिक्षीका असेल.
  • अडचणीच्यावेळी चालक आणि शिक्षक शाळेच्या अधिकाऱ्यांना प्रसंगाची माहिती देतील आणि मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करतील.
  • शिशुवर्गातील मुलांना जर शाळा व पालकांनी अधिकृत केलेली व्यक्ती नेण्यासाठी आली नाही तर त्या मुलाला पुन्हा शाळेत पाठवले जाईल आणि पालकांना बोलावून ते मूल त्यांच्या ताब्यात दिले जाईल.
  • बसच्या पायऱ्या चढण्यासाठी खालची पायरी जमिनीपासून २२० मिलीमिटरपेक्षा अधिक उंचीची नसावी. सर्व पायऱ्या पाय न घसरणाऱ्या असाव्यात.
  • सर्व बसमध्ये बर्हिवक्र भिंगाचा आरसा असावा, जेणेकरुन चालकास बाहेर पडण्याचा दरवाजा व प्रवेश दरवाजा आणि मागील भाग स्पष्ट दिसू शकेल. बसच्या आतील भाग स्पष्ट दिसू शकेल यासाठी मोठा पॅरॉबोलिक आरसादेखील असेल.
  • बसच्या पुढील दरवाज्याच्या पायºयांसोबत हाताने धरता येणाऱ्या कठड्याची सोय असावी. त्याची उंची, धातू, रचना निर्देशाप्रमाणे असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *