तलावासोबत उद्यानाची अवस्थाही बिकट
औरंगाबाद, दि. १८ – सलीम अली सरोवराला लागूनच असणाऱ्या त्यांच्याच नावाने निघालेल्या उद्यानाची अवस्थादेखील तेवढीच बिकट बनलेली आहे तर दिल्ली गेटच्या बाजूने सलीम अली सरोवरात काही मंडळींनी पिलर्स टाकून बांधकाम केले आहे. सलीम अली सरोवराची हीच अवस्था राहिली तर पुन्हा एकदा कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, अशाच प्रतिक्रिया आज येथे उमटल्या.
सलीम अली सरोवराच्या दुरवस्थेविषयी आज पहिला भाग प्रसिद्ध झाला तरी सिडको प्रशासनाने काहीही प्रतिक्रिया नोंदविलेली नाही, हे विशेष. एरवी थोडे काही प्रसिद्ध होताच खुलासा करण्यासाठी धावपळ करणाऱ्या सिडको प्रशासनाने सलीम अली सरोवरप्रकरणी मात्र मौनच पाळलेले आहे.
या सरोवरात प्लास्टिकच्या पिशव्यात बांधून कचरा टाकला जातो. त्यावरदेखील बंदी घालावी, अशी पर्यावरणप्रेमी मागणीदेखील येथे सुरक्षारक्षकच नसल्याने पूर्ण होत नाही.
पक्षी निरीक्षण मनोऱ्याची दुरवस्था
येथे देशविदेशातून पक्षी येतात. ते दुर्बिणीच्या साहाय्याने जवळून पाहता यावेत म्हणून त्या वेळचे मुख्य प्रशासक संजय भाटिया यांनी पक्षी निरीक्षणासाठी मनोरा उभारला होता. मध्यंतरी मनोऱ्याच्या फळ्या मोडल्या. त्याचे सचित्र वृत्त झळकताच त्या फळ्यांची डागडुजी करण्यात आली, पण मनोऱ्याकडे जाताना असणाऱ्या पायऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे. संपूर्ण परिसरात एक प्रकारचा कुबट वासही तेथे आता वाढीला लागला असल्याने पक्षीही नको आणि वासही नको, अशी स्थिती तेथे येणाऱ्यांची बनली आहे.
गाळ काढला तर पाणी वाढेल
या सरोवरातून किमान एक फूट उंचीचा गाळ काढून टाकला तर येथे साचलेला कचरादेखील निघून जाण्यास मदत होणार आहे. मात्र, हा गाळ काढण्याचे काम होत नाही. गाळ काढला तर केवळ कचराच दूर होणार नाही, तर पाण्याचा साठादेखील वाढण्यास मदतच होणार आहे. मात्र तसे आदेश का दिले जात नाहीत, त्याबद्दल सिडको प्रशासन काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही.
या तलावात बेशरमाची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. थोडी वाढ झाली की ती वरवर कापून काढली जातात. पण नंतर पुन्हा ती तशीच राहतात.
सांडपाण्याचे तोंड तलावात
शहरातील विविध भागातून येणारे सांडपाणी सरळ या तलावात सांडले जाते. त्यामुळे पाणी घाण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पाणी शुद्ध करणाऱ्या पिस्टिया लेग्ना, हायड्रिला, सिरेटॉ फायमलसारख्या वनस्पती येथे लावल्या गेल्या तर हे पाणी शुद्ध होण्यास मदतच होऊ शकते. गवत खाऊन जगणारे ग्रीस कार्पसारखे मासे येथे सोडले तरीदेखील यात मोठी मदत होऊ शकते. पण या साऱ्या गोष्टी करायच्या कोणी, हाच खरा प्रश्न आहे. सिडको प्रशासनाला त्यात किती आवड आणि सवड आहे त्यावर या बाबी अवलंबून आहेत. याशिवाय पाण्याच्या शुद्धीकरण व ऑक्सिजीकरणासाठी पाण्यात कारंजी, कृत्रिम धबधबे वगैरे निर्माण करावेत. तसेच महापालिका किंवा सिडको यापैकी कोणाचाही ताबा राहिला तरी दररोजची देखभाल यात महत्त्वाची आहे. पण ती करण्याची सध्या तरी सिडको प्रशासनाची मानसिकता नाही.
उद्यानात अंधार
सलीम अली उद्यानात असणारे विजेचे दिवे ९0 टक्के बंद आहेत. दिव्यांची अवस्था अतिशय वाईट बनलेली आहे. एकाही खांबावर विजेचे दिवे नाहीत. अंतर्गत वायरिंग पूर्णपणे तोडून टाकण्यात आलेली आहे. येथे असणारी डी.पी.देखील मोडून पडलेली आहे. वीज नसल्यामुळे सायंकाळी अंधार पडला की उद्यानात कोणीही येत नाही. अतिशय सुरेख मांडणी केलेल्या या उद्यानात मोठ्या प्रमाणात हिरवळ लावण्यात आलेली आहे. पाणीदेखील नियमित देण्यात येते, पण बाकी गोष्टींच्या नावाने येथे सारा उजेडच आहे.
खेळण्यांची मोडतोड
उद्यानात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. अनेक खेळण्यांच्या खाली मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. उद्यानात पाणी टाकल्यानंतर त्या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे मुलांना तेथे खेळतादेखील येत नाही. सिडको प्रशासनाने या उद्यानाकडे थोडे जरी लक्ष देण्याचे ठरविले, तर या उद्यानाची दुरवस्था दूर होण्यास मदतच होईल.
Comments