बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

वेदनेतून चाली शोधणारा संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जाण्याने गमावले एक अनोखे व्यक्तीमत्व

१९५१ साल. ऑल इंडिया रेडीओत गाण्यांना चाली देण्याचे म्हणून महिन्याला ५० रुपये मिळायचे. नुकतेच लग्न झालेले. त्यात काही भागेना.. ज्या गाण्यामुळे संसाराची वाट लागली ते गाणोच नको असे म्हणत खळेकाकांनी एकेदिवशी रागारागाने हार्मोनियम डोक्यावर घेतला आणि तो विकून टाकण्यासाठी म्हणून ते घराबाहेर पडले. तेव्हा त्यांच्या पत्नी वसूकाकूंनी त्यांना थांबवले. म्हणाल्या, एवढय़ातच हरलात..? खळेंनी खिन्नपणो होकार भरला.. काकू म्हणाल्या, पेटी विकून संगीताला मुठमाती द्यायची होती तर घरातून बाहेर पळून कशाला गेलात..?आता जाताच आहात तर जा.. विकायची तर विका पेटी.. त्या पैशातून थोडे विष घेऊन या.. आपण दोघे मिळून घेऊ..

वसूकाकूंच्या या बोलांनी श्रीनिवास खळे महान संगीतकाराचा पुर्नजन्मच झाला. आयुष्यात अशी मनस्वी बायको मिळाली म्हणून पुढचा गाडा ओढता आला.. कधी काळी पाल्र्याच्या घरी खळेकाकांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक आठवणी जाग्या केल्या होत्या. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि तो दिवस सर्रकन डोळ्यासमोर काल घडल्यासारखा उभा राहीला.

घरी कोणी भेटायला गेलं की त्यांना किती बोलू आणि किती नको असं होत असे. आठवणींची पोतडीच ते रिकामी करायचे. १९५० साली रेल्वेतून नोकरीचा कॉल आला पण तो आलाच नाही असं घरी खोटं सांगितलं बघ.. त्यावेळी वडीलांना फसवलं पण संगीताच्या वेडापाई हे सगळं मी केलं.. असं सांगताना त्यांचे डोळे एवढे बोलके व्हायचे की तो सगळा प्रसंगच समोर उभा होत असे.

एकदा त्यांनी मोहंम्मद रफीची आठवण सांगितली होती. ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओत खळे एका गाण्याला चाल लावत बसले होते. तेवढय़ात रेकॉर्डिग संपवून रफी तेथून जात होते. सहज डोकावून त्यांनी आत येऊ का, असे विचारले. कोणासाठी गाणे बनवत आहात याची चौकशी केली. चाल ऐकल्यावर ‘दादा, ये गाना मै ही गाऊंगा..’ असा आग्रह त्यांनी धरला. खरे तर ते गाणे लता मंगेशकरांसाठी बनवले होते. खळेंनी तसे स्पष्ट सांगितले नाही. त्यांनी रफींना होकार दिला. रफी, खळेकाका आणि हार्मोनियम या तिघांचा मुक्काम सलग तीन दिवस रफींच्या घरी राहिला. तालमी सुरु होत्या. गाण्याची पहिली ओळ होती, ‘चुकचुकली पाल मनी..’ सगळे गाणे रफी व्यवस्थीत म्हणायचे. पण ‘चुकचुकली’ हा शब्द त्यांना जमायचा नाही. कधी ‘सुकसुकली’ तर ‘च्यूकच्यूकली..’ शेवटी रफींनी तो शब्दच काढून टाकायचा आग्रह धरला. मराठी माणूस पाल चुकचुकणे हे अशूभ मानतो. ही संकल्पनाच कशी काय बदलणार? ‘बडबडली पाल’ असं कसं लिहीणार..? शेवटी खळेंनी रफींना नकार दिला. तर रफी ऑल इंडिया रेडीओच्या डायरेक्टर्पयत गेले. मला खळे गाणे देत नाहीत अशी तक्रारही केली. डायरेक्टरना जेव्हा शब्दांची ही कसरत कळाली त्यावेळी त्यांनाही रफीसारख्य गायकाला हे गीत मिळू नये याचे वाईट वाटले. शेवटी ते गीत लतादिदींनीच गायले. मात्र ज्या ज्यावेळी रफी ते गाणे ऐकत त्या त्यावेळी मनातल्या मनात ते चुकचुकायचे.. हा किस्सा खळे काका असा काही रंगवून सांगायचे आणि रफीची नक्कल करायचे की त्याला तोड नाही. आज मात्र दोघेही नाहीत..

जे कोणालाही जमले नाही ते खळेकाकांनी करुन ठेवले आहे. पंडीत भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांना एकत्र करुन त्यांनी त्यांची एलपी काढली. त्यासाठी दोघांना कसे तयार केले याचा किस्साही तेवढाच रंजक. या दोघांना एकत्र करुन अल्बम बनवायची कल्पना समोर आली तेव्हा त्यांनी आधी लतादिदींना तयार केले. दिदी आधी तयार नव्हत्याच. त्या म्हणाल्या एका बाजूला त्यांची गाणी, दुसऱ्याबाजूला माझी गाणी.. अशी करा रेकॉर्ड तयार.. पण काही भजन दोघांनी मिळून गायची आहेत हे सांगितल्यावर दिदी तयार झाल्या. मग खळे काका गेले भीमसेन जोशींकडे. म्हणाले, अण्णा, तुम्ही आणि लता दोघांची कॅसेट करुया.. अण्णांनी तयारी दर्शवली पण अट घातली ती पंधरा दिवस तालीम करायची..! अट मान्य झाली. प्रत्यक्षात अडीच महिने तालमी झाल्या. १९८४ साली चार युगल गितांसह ‘राम श्याम गुनगान’ हा पंडीत नरेंद्र शर्मा यांनी लिहीलेल्या गाण्यांचा अल्बम तयार झाला. जो आजही सीडींच्या रुपात प्रचंड विकला जातोय. पण सात स्वरांच्या पलिकडे दुसरा कोणताही व्यवहार कधीही न कळालेल्या खळे काकांना त्याची रॉयल्टी किती मिळाली हे त्यांनाच ठावूक..

३० एप्रिल १९२६ चा खळेकाकांचा जन्म. आयुष्यभर वेदनेने आणि दु:खाने कधी साथ सोडली नाही. एकाचे झाले की दुसऱ्याचे.. घरात सतत आजारपण.. जणू गादीलाही आजारपणाचाच वारसा..? ठावूक नाही. बायकोची तेरा ऑपरशेन्स. स्वत:ची अनेक आजारपणं.. तीन मुली. एका मुलीचे लग्न झाले आणि काही महिन्यातच तिच्यावर वैधव्याची पहार कोसळली. एकीचे बरे चाललेले. दुसरीचे लग्न नोव्हेंबर 2006 मध्ये झाले. गेली ८५ वर्षे सतत दु:ख जणू सावलीसारखे पाठी लागलेले.. मात्र खळेकाकांनी कधी याचं भांडवल केलं नाही. अरे माझ्या या वेदनेतूनच कदाचित सृजनाची निर्मिती झाली असेल बघ.. आणि हे सांगताना तोंडभर निर्वाज्य हसू पसरवत ते टाळीसाठी हात पुढे करायचे. तेव्हा त्यांच्या बोलण्याला टाळी द्यावी की दु:ख सहन करण्याला सलाम करावा हेच क्षणभर सुचायचे नाही..

खळेकाका फार छान सांगायचे. म्हणायचे, अरे आपल्या दु:खाला आपणच हळूवार फुंकर घालायची.. मग ते हुळहुळतं.. आणि त्या वेदनेतून छान चाली सुचतात बघं.. स्वत:च्या वेदनेशी बांधलेली नाळ खळेकाकांनी सावलीसारखी जपली असावी. पाठी असणा:या दु:खांच्या आवर्तनांनादेखील छंदासारखे गोंडस रुप देण्याची ताकद फार थोडय़ांकडे असते. वेदनेसोबत अवीट आठवणींची शिदोरी सोबत असली की, अनेकांची आयुष्ये त्यावर तरुन जातात.. खळेकाकांच्या वेदनेवरदेखील आठवणींचे असेच ओझे आहे. त्यामुळे घरी गेलेल्या प्रत्येकाला ते संगीताइतक्याच रसाळ गोडीच्या आठवणी थरथरत्या मनाने सांगायचे.. सांगताना सगळा प्रसंग समोर उभा करायचे.. त्यात समोर हार्मोनियम दिसला की कंप पावणाऱ्या हातांचे गारुड त्या पेटीवर व्हायचे आणि ते एखादी अनवट सुरावट गाऊनही दाखवायचे..

गोरी गोरी पान.., एका तळ्यात होती.., श्रवणात घन निळा.., भाव भोळ्या भक्तीची.., चंदा राणी; का गं दिसतेस.. किती गाणी सांगायची. दु:खातूनच जन्माला आलेली ही गाणी आजही ओठांवर येतात आणि आपले दु:ख विसरायला होते. मात्र या अनवट सुरावटींच्या जन्मदात्यास; खळेकाकांच्या वेदनांचा गंधही कधी त्यातून येत नाही.. यापेक्षा कौतुक ते काय..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *