बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

मास्क न घालणारा एक माणूस
४०० लोकांना कोरोना चा प्रसाद देत आहे

लोकांच्या मनातली बेफिकीरी समाजाचा घात करेल – डॉ. संजय ओक

अतुल कुलकर्णी  / लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मास्क न घालता फिरणारा एक बाधित माणूस ४०० लोकांना कोरोनाची लागण करत आहे, यावर्षी आलेला कोरोनाचा स्ट्रेन गेल्यावर्षीपेक्षा वेगळा आहे, त्याची लक्षणे वेगळी आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी लोकमतला दिली.

अंगावर दुखणे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. वेळीच उपचार न करण्यामुळे रुग्ण अत्यवस्थ स्थितीत दवाखाना गाठत आहेत. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून गेली आहे, ही बेफिकीरी समाजाचा घात करेल, अशी भीतीही डॉ यांनी व्यक्त केली. त्यांची ही खास मुलाखत.

महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत?
– यावर्षी आलेल्या कोरोनाचा स्ट्रेन वेगळा आहे. त्याची लक्षणे वेगळी आहेत. पोटदुखी व डायरिया होणारे रुग्ण आढळत आहेत. सुरुवातीला नुसती सर्दी, अंगात कणकण दिसते. सौम्य लक्षणे आहेत म्हणून आजार अंगावर आधार काढला जात आहे. मात्र सहा ते सात दिवसांनी रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे चित्र भयावह आहे. गेल्या वर्षी एका कुटुंबात एखादी व्यक्ती बाधित होत होती. आता कुटुंबाच्या कुटुंब बाधित होत आहेत. मास्क न घालता फिरणारी कोरोना बाधित एक व्यक्ती पूर्वी किमान १०० लोकांना बाधित करत होती. आता ते प्रमाण ४०० वर गेले आहे.

ही साथ आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टर्स कोणते प्रयत्न करत आहेत वैद्यकीय क्षेत्रात काय शोध सुरू आहेत?
– कोरोना चे नियंत्रण ही केवळ वैद्यकीय विश्व आणि डॉक्टरांची जबाबदारी नाही. लस शोधायची होती. लस आली. दोन्ही लसी अत्यंत चांगल्या आहेत. पण सगळे काही डॉक्टर करतील आणि आम्ही बेजबाबदारपणे वाटेल तसे फिरत राहू, अशाने हा आजार कधीही आपल्यातून निघून जाणार नाही. उलट अख्खा समाजच्या समाज या आजाराने बाधित होईल. मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होईल. म्हणून गरज आम्ही जबाबदारीने वागण्याची आहे.

लॉकडाऊनला विरोध होत आहे, तो असावा की नसावा? त्यामुळे साथ आटोक्यात येईल का?
– या निर्णयाला राजकीय आणि सामाजिक कंगोरे आहेत. लॉकडाऊनला विरोध जेवढा धोक्याचा तेवढा सरसगट लॉकडाऊन देखील धोक्याचा आहे. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. लोकांच्या मनातली भीतीच निघून गेली आहे. समाज जेव्हा बेबंदशाहीकडे झुकू लागतो, त्यावेळी पोलिस व सैन्याचे संचालन नागरी वस्तीत केले जाते. आज राज्यातल्या काही भागात जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पोलीस संचलन झाले आहे. मात्र आपल्या बेजबाबदार वागण्याने आपण सरकारला लॉकडाऊन करण्यास भाग पडत आहोत, शिवाय जे लोक नियम पाळत आहेत मास्क वापरत आहेत त्यांचे देखील प्रचंड मोठे नुकसान करत आहोत.

यावर उपाय काय..? कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी आल्या आहेत, तट किती परिणाम करत आहे..?
– बिना मास्क फिरणाऱ्यांना आजूबाजूच्या लोकांनी अडवले पाहिजे, टोकले पाहिजे, मास्क लावण्याची सक्ती केली पाहिजे. बेजबाबदारीने फिरणाऱ्यांना जाणीव करून द्यावी लागेल. नाहीतर समाजाचा घात होईल. लॉकडाऊन ही उत्तम गोष्ट नाही. पण बेबंदशाहीला आळा घालणाऱ्यांना याशिवाय दुसरे उत्तर नाही. दोन्ही लसी चांगल्या आहेत. त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे अँटीबॉडीज तयार होण्यास मदत होते. अशा अँटीबॉडीज कोरोनाच्या विषाणूशी लढा द्यायला समर्थ असतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होईल. पण तो तुम्हाला व्हेन्टिलेटर पर्यंत नेणार नाही. तो भयंकर नसेल, आणि तुम्हाला मृत्यू दाखवणारा नसेल. मात्र लस घ्यावीच लागेल.

लोकांना पोटापाण्यासाठी रस्त्यावर यावे लागते. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी काय करायचे? आणि लोकांना लॉकडाऊन नको आहे, त्याचे काय..?
– सरकारलाही तो नको आहे. मात्र एका बाजूच्या पारड्यात मरण असताना दुसऱ्या बाजूला कसे वागावे याचे भान सुटत चालले आहे. जमा होणारी गर्दी मासळीबाजारासारखी झाली आहे. भाजी मार्केट, धान्य मार्केट या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांची गर्दी प्रचंड आहे. मास्क आणि सॅनिटायझर ही कवचकुंडले आहेत. कवच-कुंडल फेकून दिल्यानंतर कर्णाची काय अवस्था झाली होती, हे मी सांगण्याची गरज नाही. कोरोनाने माझे काही वाकडे होत नाही, असे म्हणणाऱ्यांना देखील तो झाला आहे. लाट दुसरी की तिसरी ही बाब महत्त्वाची नाही. या व्हायरसची शक्ती वाढलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बेफिकीर झालो आहोत. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, वेळच्यावेळी हात धुवा, कुठल्याही लॉकडाऊन ची गरज पडणार नाही, मात्र लोक हे मानायला तयार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *