२१० दिवस बोटीतून जगाचा प्रवास
करणारी फक्त १६ वर्षाची जेसिका
कॅलिडियोस्कोप / अतुल कुलकर्णी
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तिला म्हणतात, आज संपूर्ण देशाला तुझ्यावर गर्व आहे. तू ऑस्ट्रेलियाची हिरो आहेस… तेव्हा, “मी पंतप्रधानांच्या विधानाशी सहमत नाही. मी एक साधी मुलगी आहे. मला माझ्या स्वप्नांवर ठाम विश्वास होता. काहीतरी साध्य करण्यासाठी हिरो होण्याची गरज नाही. फक्त आपले स्वप्न काय हे शोधले पाहिजे. त्याच्यावर पक्का विश्वास ठेवला पाहिजे… आणि खूप मेहनतही केली पाहिजे…” असे ती उत्तर देते… जेसिका वॉटसन नावाची ही मुलगी.
सोळा वर्षाच्या जेसिकाने लहानपणीच बोट घेऊन समुद्रातून जग फिरून येण्याचे स्वप्न पाहिले. १८ ऑक्टोबर २००९ रोजी तीने सिडनी येथून तिच्या साहसी प्रवासाला सुरुवात केली. २१० दिवसात तिचा प्रवास दक्षिणी गोलार्धातून गेला. ज्यात दक्षिण अटलांटिक, दक्षिण प्रशांत आणि हिंद महासागर यांचा समावेश होता. १६ व्या वर्षी एकटीने कोणाचीही मदत न घेता, जगभर नौकानयन करून २१० दिवसाची जेसिकाची अविस्मरणीय यात्रा २३ मे २०१० रोजी सिडनी ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण झाली.
जेसिकाच्या प्रवासाची दोन तास खेळवून ठेवणारी अफलातून कथा आपल्याला “ट्रू स्पिरिट” या सिनेमातून पाहायला मिळते. ज्यांना कोणाला संघर्षावर मात कशी करायची, लहान वयात पाहिलेले स्वप्न त्याच वयात पूर्ण कसे करायचे, हे पहायचे असेल तर हा सिनेमा जरूर बघा. सिनेमात नेमके काय केले आहे, हे सांगून मी तुमचा रसभंग करू इच्छित नाही. मात्र या सिनेमातील लहान वयाच्या जेसिकाच्या तोंडी असलेले संवाद, अनुभवांचे अर्धशतक पूर्ण केलेल्यांना ही सुचणार नाहीत असे आहेत. ज्या मुलीला डिस्लेक्सिया झालेला आहे, अशा मुलीला जग जिंकण्याचे स्वप्न पडते… त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी ती स्वतःला झोकून देते… त्यासाठी तिचे आई-वडील पहाडासारखे तिच्या पाठीशी उभे राहतात… ही कल्पनाच आपल्याकडे अशक्यप्राय आहे. मुलींना काय शिकवायचे? असे मानणारा एक वर्ग आजही आपल्याला दिसतो. त्यातही डिस्लेक्सीचा आजार असलेली मुलगी आई-वडिलांना अनेकदा भार वाटू शकते… ऑस्ट्रेलियात मात्र त्या जेसिकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघे कुटुंब तिच्या पाठीशी कशा पद्धतीने उभे रहाते हे पाहणे चित्तथरारक आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे. तिच्या समवयीन आणि छोट्या बहिणीचे तिच्याशी असणारे रिलेशन छोट्या बहिणीला पडणारे प्रश्न धमाल आहेत. सिनेमातील तणाव कमी करण्याला ते मदतच करतात… (प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात जेसिका घरी फोन करते. मी माझे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगते तेव्हा ही चिमुरडी; तिची छोटी बहीण तिला म्हणते ‘लवकर घरी ये, मी आता म्हातारी होत चालली आहे…’ ते ऐकून क्षणात तुमच्यावरचा ताण कमी होतो.)
माणसांची ओळख त्याच्या वाईट काळातच होते…, मुलींनाच प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवावी लागते… असे जेसिका म्हणते, तर तिच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आम्ही कोण? असा प्रश्न तिचे आई-वडील उपस्थित करतात… हे असे संवाद आपल्याही आपल्या घरातील वातावरणाची आठवण करून देतात…
वयाच्या सहा-सात वर्षाच्या टप्प्यावर ती तिच्या कोचकडे (प्रशिक्षकाकडे) जाते. “एका मोठ्या स्पर्धेत तुला मिलेनियम कप मिळाला नाही. त्यामुळे तू निराश आहेस. तू जर जगातल्या सगळ्यात कमी वयाच्या मुलीचा कोच झालास आणि मी त्यात जिंकले, तर तुझ्या आयुष्यातला तो वाईट प्रसंग लोक विसरून जातील…” असे म्हणत ती तिच्या कोचला स्वतःला शिकवण्यासाठी प्रवृत्त करते… कोच सोबत बोलतानाचा हा अगम्य आत्मविश्वास इतक्या लहान वयात एखाद्या मुलीकडे असणे हीच मुळात थक्क करणारी गोष्ट आहे.
समुद्रात प्रवास करताना एक क्षण असा येतो, की समुद्राचे पाणी स्थिर होते. हवा देखील येत नाही. ती खूप एकटी पडते. रडायला लागते. रडत रडत ती तिच्या व्हिडिओ ब्लॉगवर सांगते, मी गेली अनेक तास रडत आहे. नीट झोपलेली पण नाही. मला माझ्या घरची आठवण येत आहे. मी माझ्या खडूस कोचला देखील खूप मिस करत आहे… पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे… या एका प्रसंगातून तिच्या २१० दिवसाच्या प्रवासाचे एकटेपण ती तुमच्यासमोर उभे करते… तेव्हा अंगावर शहारे येतात… त्यावेळी तिला तिची बहीण त्या ब्लॉगच्या खाली येणाऱ्या कॉमेंट्स पहा म्हणून सांगते. त्या कॉमेंट्स पहाताना, बाहेर लोक आपल्याला कोणत्या नजरेने पाहत आहेत हे वाचल्यावर आणि पाहिल्यावर ती शहारून उठते…
मी या सिनेमावर कितीही वेळ बोलू शकेल इतका हा उत्तम सिनेमा आहे. सगळ्या गोष्टी सांगून तुमची उत्सुकता संपवण्याची माझी इच्छा नाही. डिस्लेक्सिया चा आजार असताना या विक्रमानंतर तिने दोन पुस्तके लिहिली. जी बेस्ट सेलिंग बुक्स म्हणून ओळखली गेली…
Comments