मंगळवार, २८ जानेवारी २०२५
28 January 2025

कॅनडा टूर : पार्ट 1
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक…!

– अतुल कुलकर्णी
आपले लहानपण या गाण्याभोवती फिरत राहिले. पण देशादेशात या भोपळ्याची महती काही औरच आहे. दोन अडीच वर्षानंतर मुलीला भेटायला म्हणून टोरोंटोला आलो. मार्केट मध्ये फिरताना भले मोठे भोपळे जागोजागी दिसू लागले. काही ठिकाणी विक्रीसाठी तर काहींच्या घरासमोर, दारात सजवून ठेवलेले लहान मोठ्या आकाराचे भोपळे लक्ष वेधून घेत होते. याची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि कितीतरी रंजक माहिती समोर आली.

अर्थात या भोपळ्याची देशागणिक वेगळी कथा आहे. पश्चिमी देशात यासाठी एक लोकप्रिय कथा आहे. कंजूस जॅक आणि शैतान आयरिश हे दोघे दोस्त असतात. जॅक कंजूस दारुडा असतो. एकदा तो आयरिश ला घरी तर बोलावतो पण त्याला पिण्यासाठी दारू देण्यास नकार देतो. आधी तो त्याला भोपळा द्यायला तयार होतो पण नंतर तो भोपळा ही देत नाही. आयरिश त्यामुळे नाराज होतो आणि भोपळ्यावर घाबरवणारा चेहरा काढुन त्यात मेणबत्ती पेटवतो व तो भोपळा घराबाहेर झाडाला कंदिलासारखा टांगून ठेवतो. ते पाहून जॅक घाबरतो. तेंव्हा पासून दुसऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी “जॅक ओ लालटेन’ ची प्रथा सुरू झाली. याला जोडूनच एक अशी ही आख्यायिका सांगितली जाते की, हा कंदील पूर्वजांच्या आत्म्याला रस्ता दाखवण्याचे आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण करण्याचे काम करतो. आपल्याकडे जसा पितृपक्ष असतो, आपण जसे या काळात पितरांना शांती मिळावी म्हणून विधी करतो तसेच काहीसे या दिवसाचे महत्व इकडे आहे. 

 

चौथ्या दशकात शहिदांच्या आठवणी प्रित्यर्थ मे आणि जून महिन्याच्या सुरुवातीला नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली. आठव्या शतकात पॉप क्रगौरी द थर्ड याने 1 नोव्हेंबरला हा दिवस साजरा करणे सुरू केले. 16 व्या शतकात हॅलोविन आणि ऑल सेंटस डे इंग्लंडमधून पूर्णपणे विसरला गेला. पण त्याच काळात स्कॉटलंड आणि आयर्लंड मध्ये हा साजरा केला जात असे.
गैल‍िक परंपरेला मानणारे लोक 1 नोव्हेंबरला नवीन वर्ष साजरे करतात. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 31ऑक्टोबरच्या रात्री हॅलोवीन पर्व साजरे केले जाते. त्या दिवशी लोक घाबरवणारे कपडे घालतात. अतृप्त किंवा वाईट आत्मे धरतीवर येऊन माणसांना नुकसान करू शकतात. ते होऊ नये म्हणून घराच्या बाहेर भोपळ्यांवर घाबरवणारे चेहरे बनवून त्यात मेणबत्त्या लावण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे घरात वाईट आत्म्यांचा प्रवेश होत नाही, आणि माणसाला कोणतेही नुकसान होत नाही अशी लोकांची धार्मिक भावना आहे. हॅलोवीनच्या दिवशी तयार केलेली सजावट देखील घाबरवणारी असते. ही सजावट जर बिघडवली तर त्याचे परिणाम वाईट होतात, अशी ही लोकांची त्यामागची भावना आहे.

तिकडे अतृप्त आत्म्यांना विषयीची ही मान्यता असताना दुसरीकडे या दिवशी आपले पूर्वज धरतीवर येतात, आणि पीक कापण्यासाठी मदत करतात अशीही आख्यायिका आहे. कारण तो दिवस पीककापणीचा शेवटचा दिवस असतो. पीक कापण्यासाठी मदतीला आलेल्या आत्म्याकडून प्रेम आणी स्नेह मिळते. आनंदी राहण्याचा आशीर्वाद मिळतो. अशीही एक कथा याबाबतीत सांगितली जाते. भोपळ्यांवर वेगवेगळे आकार करून त्यात मेणबत्त्या लावल्या जातात. असे भोपळे झाडाला लटकवले जातात. हा उत्सव संपला की असे कापलेले भोपळे जमिनीत पुरून टाकले जातात. या दिवशी भोपळ्या पासून बनवलेल्या मिठाया देखील खाल्ल्या जातात.

आता आपण या भोपळ्याची आर्थिक बाजारपेठ समजून घेऊ. थोडी आकडेवारी तपासली तर एकट्या अमेरिकेत 2001मध्ये, या भोपळ्यांचे उत्पादन मूल्य सुमारे 74.7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होते. 2020 पर्यंत हा आकडा 193.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत वाढला होता. टुणूक टुणूक चालणाऱ्या या भोपळ्याच्या उत्पादनात भारत दोन नंबरला आहे. चीन मध्ये दरवर्षी 78,38,809 मेट्रिक टन उत्पादन 18,434 हेक्टर जागेतून घेतले जाते तर भारतात 5,073,678 मेट्रिक टन उत्पादन 9,595 हेक्टर जागेत घेतले जाते, असे आकडेवारी सांगते. कॅनडा मध्ये 2020 मध्ये अंदाजे 1,39,880 मेट्रिक टन ताजे भोपळे आणि स्क्वॅशचे उत्पादन झाले, गेल्या वर्षी हे उत्पादन सुमारे 1,26,370 मेट्रिक टन होते. 2020 मध्ये कॅनडामध्ये प्रति व्यक्ती वापरासाठी अंदाजे 3.33 किलोग्राम ताजे भोपळे आणि स्क्वॅश प्रति व्यक्ती उपलब्ध होते.

बेल्जियमने जगातील सर्वात मोठ्या भोपळ्याचे उत्पादन केले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार बेल्जियमच्या माथियास विलेमिजन्सने 2624.6 पौंड वजनाचा भोपळा पिकवला. त्याने हा विक्रम 2016 मध्ये केला. तर इटालियन स्टेफानो कटरुपी याने 2021या वर्षात विजेतेपद मिळवले. एका टस्कन शेतकऱ्याने इटलीची लो झुकोन (भोपळा) चॅम्पियनशिप जिंकली. त्याच्या विशाल भोपळ्याचे वजन होते 1,226 किलो..! आपल्याकडे भारतात भोपळ्याचे विविध प्रकार, आकार आणि खाद्यपदार्थ आहेत. ते पुन्हा कधीतरी…. सध्या कॅनडा टूर च्या निमित्ताने चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची ही एवढीच कथा…!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *