आठ आयुर्वेदिक औषधे पेटंटच्या दिशेने रेडिओथेरपी
केमोच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी औषधे
अतुल कुलकर्णी / लोकमत
कॅन्सर नंतर कराव्या लागणाऱ्या केमो आणि रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६ आणि राष्ट्रीय स्तरावर २ अशी ८ पेटंट भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टने सादर केली आहेत. त्यापैकी ५ पेटंट प्रकाशितही झाली आहेत. पेटंट प्रकाशित होणे हा मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा असतो. ही माहिती ट्रस्टचे प्रमुख डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. कॅन्सरमध्ये केमो आणि रेडिओथेरपीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणे, रुग्णाची जीवनशैली चांगली ठेवण्यासाठी या औषधांचा उपयोग असल्याचेही डॉ. सरदेशमुख म्हणाले.
केमोथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रवाळ पिष्टी तसेच सुवर्ण भस्म असणारे औषध, सुवर्णभस्मादि योग हे प्रतिकारशक्ती वाढवणारे, सूज कमी करण्यासाठीचे पद्मकादि घृत औषध, अनुवंशिक व जनुकीय संक्रमण झालेल्या ब्रेस्ट कॅन्सर रुग्णांसाठीचे औषध, तोंडाच्या कॅन्सरमध्ये रेडीएशनमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे, ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर रुग्णाचा कॅन्सर नियंत्रणात आणणे व आयुर्मान वाढविण्यासाठीचे औषध, तोंडाच्या कॅन्सर मध्ये केमो आणि रेडिओथेरपीचा दुष्परिणाम दूर करण्यासाठीचे औषध यांचा या पेटंट मध्ये समावेश आहे. हे पेटंट भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल करण्यात आले असून त्यापैकी सहा पेटन्टचे संशोधन प्रकाशितही झाले आहे. सहा महिने ते एक वर्षाच्या आत या पेटंटला मान्यता मिळेल असेही डॉ. सरदेशमुख यांनी सांगितले. तर आयुर्वेदामध्ये संशोधन होते मात्र त्यासाठीच्या क्लिनिकल ट्रायल फारशा केल्या जात नाहीत. मात्र या सर्व पेटंटसाठी शंभर ते दोनशे रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या आहेत. यासाठी इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर मधील सर्व कॅन्सर तज्ञ कॅन्सर संशोधकांच्या टीमचा सहभाग असल्याचे डॉ. विनिता देशमुख यांनी सांगितले.
या आठ पैकी केमोथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणाऱ्या दोन केमो रिकव्हरी किटस चे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच झाले असून सध्या ते रुग्णांसाठी वापरले जात आहे. या आठ पेटंटसाठीच्या क्लिनिकल ट्रायल्स व प्रयोगशाळेतील तपासण्यांसाठी टाटा ट्रस्टने आर्थिक अनुदान दिले आहे, असे सांगून डॉ. सरदेशमुख म्हणाले, त्याशिवाय खारघर येथील टाटा कॅन्सर सेंटरचे संशोधन केंद्र, सह्याद्री रुग्णालय पुणे, क्युरी कॅन्सर मानवता सेंटर नाशिक, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन अँड लॅबरेटरी पुणे या संस्थांनी देखील या कामात मोलाचे सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले. दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ असणाऱ्या या सेंटरला प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी वाघोलीच्या केंद्रालाही भेट देऊन मोठे आर्थिक सहाय्य देऊ केले होते. पुण्यात झालेल्या ट्रस्टच्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेसाठी उद्घघाटक म्हणून उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आयुर्वेदाच्या मदतीने सुरू असलेल्या उपचार पद्धतीचे कौतुक केले होते. पुण्याच्या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरचे उद्घघाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले असून, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सेंट्रल ऑफ एक्सलन्स म्हणून या केंद्राला मान्यता देत अनुदानही देऊ केले आहे. आम्ही तयार तयार केलेल्या आयुर्वेदिक औषधांमुळे कॅन्सर रुग्णांना केमोनंतर होणारे त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्र प्राचीन आहे. त्याचा उपयोग दुर्धर आजारावरील रुग्णांना व्हावा या सद्हेतूने हे संशोधन केल्याचे डॉ. सरदेशमुख यांनी सांगितले.
Comments