रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

ममताच्या विजयाने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ लांबणीवर

महाराष्ट्रात सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच

अतुल कुलकर्णी
लोकमत / वृत्त विश्लेषण
मुंबई : पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ मोहीम सुरू होईल असे सांगणाऱ्या भाजपला आता मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत राज्यात काही बदल होतील असे कोणतेही चिन्ह आज दिसत नाही. पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले, आणि तीन पक्षांसोबत लढताना कोणती रणनीती आखायची ते देखील कळाले. हाच काय तो या निवडणुकांचा अन्वयार्थ म्हणता येईल.

पाच राज्यांच्या निकालाचे विश्‍लेषण कसे कराल? यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा मी आम्ही तिघांपैकी कोणीही महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होईल असे अधिकृतपणे बोललेलो नाही. महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या अंतर्गत विरोधातून पडेल. लोकांच्या मनात राग आहे. वीज कनेक्शन तोडणे, कर्जमाफी न मिळणे, असे विषय लोकांसाठी महत्त्वाचे आहेत. लोकांनी त्यांचा राग पंढरपूरच्या निकालातून दाखवून दिला आहे. आम्हाला कोणतीही घाई नाही. चंद्रकांत पाटील असे म्हणत असले तरीही, भाजपने पंढरपुर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळी रणनीती यशस्वी करून दाखवली आहे. बहुजन समाजातला दुसऱ्या फळीचा नेता पक्षात घ्यायचा. त्याच्यामागे सर्व ताकद उभी करायची. त्याला स्थानिक मुद्द्यांची फोडणी द्यायची, आणि महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक जिंकायची. अशीही रणनीती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन तुल्यबळ सत्तेतले पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना, त्यांना अपयश येणे आणि भाजपने यश मिळवणे ही दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ती साध्य करून दाखवली आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्र लढायचे ठरवले, तर प्रत्येक मतदारसंघात नाराजांची मोठी फौज उभी राहील. त्यातून भाजपला दुसऱ्या फळीतले अनेक नेते विविध मतदारसंघात मिळतील. त्यामुळे पंढरपूर पॅटर्न अनेक विधानसभा मतदारसंघात राबवणे भाजपाला सहज शक्य होईल. हा एक वेगळा राजकीय विचार भाजपने यानिमित्ताने यशस्वीरीत्या वापरून पाहिला आहे. मात्र भालके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली असती, तर ही रणनीती यशस्वी झाली असती का? हा प्रश्न देखील आहेच. त्यामुळे शंभर टक्के या रणनीतीचे हे यश आहे असेही म्हणता येणार नाही.

शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे मत वेगळे आहे. पंढरपूर मध्ये स्थानिक गणितं होती. उमेदवारीविषयी काही वेगळे मतप्रवाह होते. त्यामुळे एक विधानसभा जिंकली, म्हणजे महाराष्ट्राचे गणित बदलेल. तीच पद्धत सगळीकडे वापरली जाईल असे म्हणणे चुकीचे आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक पक्षांचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल, असे खा. राऊत यांना वाटते. भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांना बंगाल, तामिळनाडू, केरळ या तीन मोठ्या राज्यात फारसे यश मिळाले नाही. त्याच वेळी स्थानिक पक्षांना घवघवीत यश मिळाले आहे. यातून येणाऱ्या काळात प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांचे महत्त्व वाढीस लागेल. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना, स्थानिक पक्ष्यांची जुळवून घ्यावे लागेल. हा इशारा देखील या निकालाने दिला आहे. महाराष्ट्रात कोण, कोणाशी, कसे जुळवून घेतो यावर काँग्रेस आणि भाजपचे राज्यातील स्थान अधोरेखित होणार आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया बोलकी होती. बंगाल मध्ये हिंसाचार झाल्यानंतर, गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला गेला. त्यावर कोणाच्या मागण्यामुळे मी राजीनामा देत नाही, असे ते बोलले होते. आता या निवडणुकीत २०० जागा जिंकू असे सांगणार्‍या अमित शहा यांना बंगालच्या जनतेने नाकारले आहे. तेव्हा ते याच जनतेसाठी राजीनामा देतील का? या निकालामुळे महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. जी भाजप प्लासीच्या लढाईत पराभूत झाली तिने सह्याद्री जिंकण्याची स्वप्न बघू नयेत असे मलिक यांचे म्हणणे आहे. टाळ्यांसाठी हे वाक्य चांगले असले, तरीदेखील राष्ट्रवादीचा पंढरपूरमधील पराभव त्यांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस, शिवसेना हे सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी सोबत होते. तरीही राष्ट्रवादी पराभूत होते. याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. सत्ता मिळाली की राष्ट्रवादीचे नेते जमिनीपासून दोन पावले वर चालतात. त्यांना कोणाची गरज वाटेनाशी होते. हा आजवरचा इतिहास आहे. त्याउलट सत्तेत असताना आणि नसताना भाजपचे महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने सगळ्यांची वागतात तो गुण अन्य पक्षांनी नक्कीच घेतला पाहिजे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र व मजबूत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात लगेच काही वेगळे घडेल या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. जर भाजपने फोडाफोडी केली तर महाराष्ट्रातील जनता त्यांचा रोष दाखवून देईल. सचिन वाझे, परमवीरसिंग, सुशांत सिंग राजपूत अशा अनेक प्रकरणात केंद्र सरकारने महाराष्ट्रात समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाची साथ असल्यामुळे आम्ही संयमाने वागत आहोत. देशभरातील परिस्थिती कशी हाताळली जात आहे ते जनता पाहात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काहीही बदल होणार नाही. दिवसा स्वप्न बघणार्‍या विषयी मी जास्त काय बोलणार? असेही नाना पटोले यांचे म्हणणे आहे.

पंढरपूरच्या निकालाने महाविकास आघाडी सरकारला नाही पण राष्ट्रवादीला धोक्याची घंटा वाजली आहे. शरद पवार यांनी दिवंगत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असे सुचवले होते. मात्र राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनी भालके यांच्या मुलाचे नाव आग्रहाने लावून धरले. भालके यांच्या पत्नीना उमेदवारी दिली असती तर निकाल वेगळे लागले असते. पैशाच्या राजकारणावर, भावनेचे राजकारण नेहमीच वरचढ ठरते. हा ज्येष्ठांचा सल्ला राज्यातल्या राष्ट्रवादी नेत्यांनी ऐकला असता तर, आज झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. राजकारणात जर तरला महत्त्व नसते हेच खरे.

पंढरपूर जरी भाजपला मिळाले असले तरी, भाजप विस्कळीत आहे. जुनेजाणते नेते फारसे सक्रिय नाहीत. अनेक पक्ष फिरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची पक्षात चलती आहे. ही अस्वस्थता दूर करणे भाजपचे प्रमुख काम ठरणार आहे. ज्या तडफेने ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक जिंकली, ती तडफ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दाखवण्याची गरज आहे. मात्र या तिघांचा नको तेवढा संयम त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *