पक्षवाढीचा नवीन सिलॅबस बनवण्यासाठी समिती
भाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीत वृत्तान्त
अतुल कुलकर्णी
वृत्तविशेष / लोकमत
मुंबई : पक्षवाढीसाठीचा नवीन सिलॅबस, नवीन नेत्यांना सोबत घेऊन तयार करावा. जुन्या नेत्यांकडे सांगण्यासारखे फार काही आता उरलेले नाही. ते विनाकारण बोधामृत देत राहतात. त्यापेक्षा शिवसेना मार्गे, काँग्रेस, व्हाया भाजपमध्ये आलेल्या नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रसाद लाड, राम कदम, प्रवीण दरेकर यांची एक समिती नेमून नवीन सिलॅबस फायनल करावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
नवीन लोकांमध्ये विशेष गुण असल्याचे पक्षाला जाणवले. त्यामुळेच नव्या लोकांना संधी दिली असेल, असे विधान पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे पक्षाच्या चिंतन बैठकीत यावर गंभीर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ज्यांना आपण संधी दिली, आमदारकी, मंत्रीपदे दिली. त्यांनी पक्षासाठी काय केले? त्यांच्यात असे कोणते विशेष गुण आहेत? म्हणून त्यांना ही संधी मिळाली? हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले पाहिजे, म्हणजे कार्यकर्ते पक्ष वाढवतील, अशी चर्चा चिंतन बैठकीत झाली. त्यासाठी पक्षाचा इतिहास नव्या पिढीला व्यवस्थित सांगता आला पाहिजे, यावर खलबते झाली. कोणता इतिहास शिकवायचा यावर मात्र नेत्यांचे काही केल्या एकमत झाले नाही. गोलवलकर गुरुजीं पासून सुरुवात करायची की, मधल्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षासाठी काय केले हे सांगायचे, की सध्याच्या राजकारणात आपल्याकडे कसे व कोणते लोक आहेत, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे, याविषयी सांगायचे..? असे गहन प्रश्न बैठकीत चर्चेला आले होते.
नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी नेमका सिलॅबस कोणता ठेवायचा? कोणत्या नेत्यांची नेमकी कोणती माहिती त्यांना द्यायची? जेणेकरून त्यांना पक्षात गतीने वरच्या जागा पटकावता येतील, यावर जोरदार विचार मंथन सुरू झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी कशा पद्धतीने पक्ष वाढवला? अडवाणी यांनी रथयात्रा काढून देशभरात पक्षासाठी कसे पूरक वातावरण तयार केले? या गोष्टी शिकवायच्या की नव्याने पक्षात आले आणि आमदार, मंत्री, विविध पदे गतीने मिळवणारे रमेश कराड, गोपीचंद पडळकर, नारायण राणे, राधाकृष्ण विखे, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड यांनी कशा पद्धतीने स्वतःचे स्थान पक्षात निर्माण केले याची माहिती द्यायची..? यावर काही केल्या निर्णय झाला नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमावी. ते यावर मार्ग काढतील, असा प्रस्ताव बैठकीत एका नेत्याने दिला. मात्र प्रसाद लाड आणि राम कदम यांनी तो प्रस्ताव देणाऱ्याकडे असे काही डोळे मोठ्ठे करून पाहिले की, तो प्रस्ताव पुढे नेण्याची कोणाची हिम्मतच झाली नाही. मनसे मार्गे भाजप मध्ये आलेले प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले तर काय सांगायचे…? प्रसाद लाड आधी राष्ट्रवादीत होते. एकेकाळी छगन भुजबळ यांचे ब्लू आइड बॉय असणारे प्रसाद लाड यांचा क्रिस्टल क्लिअर कारभार नेमका कसा सांगायचा..? राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्ये होते. नंतर अचानक भाजपमध्ये स्वतःच्या विरोधी पक्षनेते पदासह कसे आले? ही किमया त्यांनी कशी साधली? यावर देखील एक चॅप्टर त्या नव्या सिलॅबस मध्ये असावा असाही एक सूर पुढे आला. राष्ट्रवादीत असणाऱ्या चित्रा वाघ यांनी पक्ष सोडताना स्वतःच्या नेमक्या कोणत्या अडचणी शरद पवार यांना सांगितल्या आणि भाजपचा मार्ग स्वीकारला..? अशा अडचणी सांगून दुसऱ्या पक्षात जाता येते का? यावर नव्याने पक्षात येणाऱ्यांसाठी एखादे व्याख्यान ठेवले पाहिजे, असा मुद्दा प्रसाद लाड यांनी मांडला खरा, मात्र त्याला फारसे कोणी अनुमोदन दिले नाही.
भाऊसाहेब फुंडकर, विनोद तावडे या दोन्ही विधान परिषदेच्या तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षासाठी नेमके काय केले? विरोधी पक्षनेतेपदी असताना एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी रसद पुरवण्याचे काम केले. त्यावेळी ती रसद कोणत्या तत्त्वात बसत होती असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर काय द्यायचे…? विधानसभेच्या मुंबईतल्या अधिवेशनात दरवेळी प्रकाश मेहता सगळ्या आमदारांसाठी थेपले, खाकरा, ढोकळा कसे घेऊन येत असत..? त्यासाठीचे नेमके नियोजन ते कशा पद्धतीने करायचे? अधिवेशन काळात विनोद तावडे सगळ्या आमदारांना जेवणाची कशी व्यवस्था करायचे? यावरही विस्तृत मार्गदर्शन असावे असाही एक सूर पुढे आला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी ओबीसींची मोट बांधण्याकरता विदर्भात केलेल्या कामाची नेमकी नोंद कशा पद्धतीने सांगायची? यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. अखेर प्रश्नच जास्त समोर येऊ लागले. एकाही प्रश्नाचे उत्तर मिळेनासे झाले, म्हणून ही चिंतन बैठक पुन्हा घेण्याचा निर्णय झाला.
Comments