बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

बेलगाम बांधकामांची जबाबदारी कोणाकडे..? सोयी सुविधा द्यायच्या कोणी?

अतुल कुलकर्णी

मुंबई : सिडकोने नियोजनबद्ध शहर वसवता येते, हे नवी मुंबईच्या रुपाने दाखवून दिले. मात्र शिळफाटा ते कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागात सुरू असलेले नवीन प्रकल्प, येऊ घातलेल्या घरांची संख्या या पार्श्वभूमीवर तिथे असलेले इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी, मैदान, उद्यान, वाहतुकीची साधने ठाणे जिल्ह्यासह पालघर, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे एमआयडीसी एरियात मोठ्या प्रमाणावर होत असलेली घरे… ही चौफेर वाढ होताना कसलेही नियोजन नाही. नवी मुंबईत करंजाडे रोड, नयना क्षेत्र, नेरे, पळसपे, एमआयडीसी हद्दीतील गावे, तळोजाच्या दोन फेज, या ठिकाणी झालेल्या वस्तीमध्ये नागरी समस्यांचा विळखा, खारघर सारख्या भागात प्राथमिक सुविधा नसणे, रोडपाली, कळंबोली या परिसरात होणारी नागरी वाढ आणि समस्यांचे डोंगर याचा कसलाही विचार कोणतीही यंत्रणा करायला तयार नाही.
चंदिगड सारखे शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. सिडको औरंगाबाद आणि नवी मुंबईत उत्तम नियोजन करू शकते. चंद्रशेखर सारखे अधिकारी ठाण्यामध्ये अतिशय उत्तम विकास कामे करून दाखवू शकतात. मग या सगळ्या शहरांचा नियोजनबद्ध विकास कोणी करायचा? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत. लोकांच्या गरजा आणि सोयी यांचा विचार न करता ही शहर हातपाय पसरत आहेत. सीआरझेड ची मर्यादा ५० मीटर पर्यंत आणून ठेवली आहे. त्यातून भविष्यात येणारे प्रश्न भीषण असतील. बांधकाम क्षेत्रात सुरू झालेली माफीयागिरीमुळे दाद तरी कोणाकडे मागायची हा प्रश्न घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसापुढे आहेत.
मुंबई पाय ठेवायला जागा नाही. नवी मुंबईत परदेशी नागरिकांनी ठिकठिकाणी उघडलेले ड्रग्जचे अड्डे, वाढती गुन्हेगारी, पालघर सारख्या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधा देखील नसणे, रायगड जिल्ह्यात बाहेरून आलेल्या बड्या लोकांच्या बंगल्यांसाठीच्या सोयी सुविधा एकीकडे तर वस्ती, वाडे, तांड्यांवर सुविधा नावाच्या गोष्टीच नसणे हा प्रचंड मोठा विरोधाभास संपूर्ण एमएमआरडीए परिसरात निर्माण झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *