बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

पाच वर्षाच्या मुलीला लिव्हर देण्यासाठी चा संघर्ष

कॅलिडोस्कोप / अतुल कुलकर्णी

आई नसलेली पाच वर्षाची ती निरागस, निष्पाप मुलगी. तिच्यापेक्षा थोडी मोठी बहीण… फारसा चांगला जॉब नसलेले वडील आणि म्हातारी आजी… एवढेच ते कुटुंब. पाच वर्षाच्या त्या चिमुरडीला लिव्हरचा दुर्मिळ आजार झालेला असतो. लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. कधी त्रास होऊ लागला तर रक्तही द्यावे लागत असते. घरी वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसते. पक्की नोकरी नाही. मेडिकल इन्शुरन्स नाही. अशा स्थितीत त्या मुलीच्या मदतीला एक अनोळखी हेअर ड्रेसर बाई येते. तिची एक वेगळीच कथा असते. ती महिला या छोट्या मुलीच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी पैसे उभारण्याचे काम करते. त्यातून त्या मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट होते.

१९९४ मध्ये अमेरिकेच्या केंटकी प्रांतात एका छोट्या गावात घडलेली ही सत्यघटना. प्रचंड बर्फ पडत असताना अवघे गाव या मुलीसाठी धावून आले होते. ही घटना त्यावेळी खूप गाजली. त्यावरच आधारित “ऑर्डिनरी एंजल्स” हा चित्रपट नेटफ्लिक्स वर आला आहे. एमिली मिशेल या छोट्या मुलीने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका केली आहे. संपूर्ण सिनेमा तिच्याभोवती फिरत राहतो. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि आपण मरणार आहोत की काय..? असा तिला प्रश्न पडतो… आपल्या मोठ्या बहिणीला ती ख्रिसमसची भेट देते. आणि म्हणते, तू हे उघडून बघ… कदाचित तू ज्या दिवशी ते उघडशील त्या दिवशी मी नसेन… हा या चित्रपटातला सर्वोच्च क्षण आहे. अवयव दानाचे महत्त्व किती आहे, आणि अवयव दानामुळे किती लोक वाचतात, याविषयी जागृती निर्माण करताना हा सिनेमा नात्यांची अनोखी वेगळीच गोष्ट तुमच्यासमोर ठेवतो.

हिलरी स्वँक ने यात हेअर ड्रेसर ची भूमिका केली आहे. हेलरीच्या वडिलांना लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आले होते त्यामुळे देखील त्या या भूमिकेशी समरस झाल्या. एमिली मिशेल ही एक कॅनडियन अभिनेत्री आहे. या छोट्या मुलीने या चित्रपटाशिवाय हॉलीवुड मधील इतरही अनेक चांगल्या चित्रपटात भूमिका केल्या. आपल्या नॅचरल ऍक्टिंगने तिने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. हा चित्रपट केवळ अवयव दानाचा प्रसार प्रचार करत नाही. तर अमेरिकेतील मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती, मेडिकल इन्शुरन्सचे अनन्यसाधारण महत्व, महागडी आरोग्य व्यवस्था, त्यासाठी करावा लागणारा झगडा, प्रत्येकाच्या स्वतःच्या स्पेस चे महत्त्व अधोरेखित करत हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. छोट्या मिशेलला अवयव दाता मिळतो. मात्र अवघ्या काही तासात तिला हॉस्पिटलला न्यायचे असते. मिशेल चे घर आणि हॉस्पिटल बाय रोड सहा तासाचे अंतर असते. प्रचंड बर्फ पडत असताना स्थानिक टीव्ही चॅनल लोकांना अपील करते आणि एक व्यक्ती स्वतःचे हेलिकॉप्टर घेऊन येतो. अखेर त्या मुलीला हॉस्पिटलला नेले जाते…

हा सगळा प्रवास तुम्हाला स्क्रीन समोर खिळवून ठेवतो. त्यासोबतच हेअर ड्रेसरची भूमिका करणाऱ्या हिलरीची स्वतःची एक स्टोरी असते. ती देखील तुम्हाला त्यात गुंतवून ठेवते. सिनेमा फार ग्रेट आहे असे नाही, मात्र ज्या पद्धतीने त्याची मांडणी केली आहे ती पाहता हा सिनेमा तुम्हाला अस्वस्थ करतो. कोणावरही अशी वेळ येऊ नये अशी प्रार्थना तुमचे मन करू लागते… हा त्या सिनेमाचा एक वेगळा अँगलही आहे. सिनेमाच्या शेवटी ज्या मुलीवर हा सिनेमा आधारित आहे ती मुलगी ही दाखवलेली आहे. ज्या गावातल्या लोकांनी तिच्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केले त्याचे व्हिडिओ फुटेजही सिनेमाच्या शेवटी दाखवले आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही अवयव दान या विषयाकडे गंभीरपणे बघाल हे मात्र नक्की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *