आणि तिच्या भावासाठी ती वडील झाली..!
(नवरात्रीच्या सातव्या माळेच्या निमित्ताने)
– अतुल कुलकर्णी
ती कॉलेजला शिकत असताना तिचे वडील वारले. आई दुबईला शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. ती आणि तिचा भाऊ दोघे मुंबईत. त्यातही ही मुंबईत शिकायला आणि लहान भाऊ औरंगाबादेत शिकत होता. अशा स्थितीत तिने हिमतीने स्वत:चे आणि भावाचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्यासाठी बहिण, बाबा तीच झाली. आज ती टोराँटो येथे आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे तिने. तो देखील एकट्याच्या बळावर. अत्यंत कौतुकास्पद असा तिचा प्रवास आजच्या मुलींसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. तिचे नाव आहे, श्रध्दा देसाई.
बॉय कट हेअर स्टाईल, वागण्यात बिनधास्तपणा, न घाबरण्याची वृत्ती, यामुळे मी तर तिला टॉमबॉयच म्हणायचो. जे आहे ते समोर बोलून मोकळी होणारी, कोणतीही भीडभाड न ठेवणारी, पण मनापासूून, जाणीव ठेवून प्रेम करणारी अशा श्रध्दाची कहाणी रोमांचक तर आहेच शिवाय प्रेरणादायीपण..!
श्रद्धा, तिचा भाऊ श्रेयस यांची माझी ओळख सुकन्या कुलकर्णीमुळे झाली. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. श्रेयस औरंगाबादला सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत एनडीएमध्ये ११ वी नंतर शिकायला आला. साधारणपणे १९९४ ची ही घटना. त्यावेळी श्रेयसचे लोकल गार्डियन मी आणि माझी मिसेस दीपा दोघे होतो. श्रद्धा मुंबई मध्ये शिकत होती. या काळात या दोघांचे आई-बाबा देखील आमच्याकडे येऊन गेले होते. अत्यंत मनमिळावू असे हे कुटुंब. श्रद्धा मुंबईत चेतना कॉलेजमध्ये शिकत होती. तिने मार्केटिंग मध्ये एमबीए केले. ती सेकंड इयरला असताना मुंबईतच एका अपघातात तिचे वडील अचानक गेले. या छोट्याश्या कुटुंबावर मोठे संकट आले. मात्र त्यातून खचून न जाता श्रद्धाने स्वत:चे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. औरंगाबादला असलेल्या श्रेयसचे शिक्षण पूर्ण केले. स्वत: टाइम्स ऑफ इंडियाच्या मार्केटिंग विभागात दोन वर्षे काम केले. हे सगळं करत असताना श्रेयसच्या एज्युकेशनचा, इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचा खर्च, एम बी ए चा खर्च देखील श्रद्धाने आईच्या मदतीने केला. या काळात ती अनेकदा एकटी मुंबईहून औरंगाबादला येत असे. तेव्हा ती आमच्या घरीच थांबायची. अत्यंत लाघवी अशी ही बहिण भावाची जोडी आमच्या मनात कायमचे घर करुन गेली. भावाचे शिक्षणच श्रध्दाने केले असे नाही तर आजही ती त्याच्यासाठी आई आणि बाबा दोन्ही भूमिका बजावते. नातेवाईकांचे वाढदिवस, घरगुती समारंभ तीच त्याला आठवण करुन देते. तिकडे टोराँटो मध्ये राहून देखील ती हैदराबाद येथे राहणाऱ्या स्वत:च्या भावाचे सगळे काही पहाते.
पुढे जुलै २००२ मध्ये तिचे लग्न झाले. मे २००३ मध्ये नवरा अनंतला अमेरिकेत टीसीएसमध्ये नोकरी मिळाली म्हणून ते तिकडे गेले. या काळात त्यांना सिध्दांत नावाचा गोड मुलगा झाला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांनी टोराँटोला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. अनंतची नोकरी न्यूयॉर्कला होती. तेव्हा जवळपास दोन अडीच वर्ष अनंत न्यूयॉर्क ते टोराँटो सतत प्रवास करायचा. त्यावेळी श्रद्धाने एकटीने टोराँटो मध्ये राहुन स्वत: जॉब मिळवला. सिध्दांतच्या वाढीकडे लक्ष देत तीने तीथे नॅशनल टायर डिस्ट्रीब्यूटर कंपनी मध्ये मार्केटिंगचे काम केले. स्वत: सकाळी लवकर उठायचे, नवरा आणि मुलासाठी जेवण करायचे, आणि ऑफीसला जायचे. पुन्हा संध्याकाळी आले की दुसऱ्या दिवशीची तयारी. तेथे कामाला बाई मिळत नाही. तुमचे काम तुम्हालाच करावे लागते. यामुळे हळूहळू घरचा व्याप वाढू लागला तसे तिने नोकरी सोडून दिली.
टोराँटो मध्ये तिने शुद्ध शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ देण्याचा व्यवसाय सुरु केला. गणपतीच्या काळात मोदक असो की दिवाळीचा फराळ असो. श्रध्दाने खूप आवडीने आणि त्याहीपेक्षा जास्त मेहनतीने तिचा घरगुती व्यवसाय नावारुपाला आणलाय. खऱ्या अर्थाने ती तीचे मूळ विसरलेली नाही.
मधल्या काळात आमची भेट अशी नव्हतीच. श्रेयस त्याच्या नोकरीला लागला. आम्ही औरंगाबादहून मुंबईत आलो. एकेदिवशी अचानक श्रेयस मला फेसबूकवर दिसला. त्यात त्याने औरंगाबादच्या आठवणी दिल्या होत्या. अरे हा तर आपला श्रेयस, असे म्हणत मी त्याला फोन केला आणि तो तोच श्रेयस निघाला. आम्ही हैदराबादला भेटलो देखील. दुनिया गोल आहे असे म्हणतात ते उगाच नाही.
काही वर्षांनी माझी मुलीला, गार्गीला शिक्षणासाठी टोराँटो येथील यॉर्क युनिर्व्हसिटीमध्ये अॅडमिशन मिळाली. आमच्यासाठी तो देश नवा होता. काहीही माहिती नव्हती. तेव्हा आम्हाला माहिती झाले की श्रध्दा तेथे आहे. तिच्याशी संपर्क केला, आणि जेव्हा आम्ही तिघे पहिल्यांदा टोराँटोला गेलो तेव्हा त्या दिवशी श्रध्दा, अनंत आणि सिध्दांत आमच्यासाठी घरी बनवलेल्या जेवणाचा डबा घेऊन आले होते..! गार्गीच्या शिक्षणात आणि सुरुवातीच्या काळात श्रध्दा आणि अनंत तिचे लोकल गार्डीयनच झाले होते. वर्तूळ असे पूर्ण झाले होते. त्या काळात गार्गीला श्रध्दाने दिलेली साथ आमच्या कायम लक्षात राहणारी आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीत तीने जे काही जग स्वत:च्या हिमतीवर परक्या देशात जाऊन उभे केले आहे, तिथे स्वत:चा व्यवसाय सुरुकेला आहे तो कायमच कौतुकाचा विषय आहे. ज्या वयात मुलांनी आई बाबांच्या जीवावर बागडायचे, स्वच्छंद होऊन गगनभरारी घ्यायची त्या काळात श्रध्दाला वडील गमवावे लागले. त्यातून तीच भावासाठी मित्र, वडील आणि बहिण झाली. स्वत:चे आणि त्याचे शिक्षण पूर्ण केले, आज स्वत: अत्यंत यशस्वी अशी उद्योजिका म्हणून ती कार्यरत आहे. या सगळ्या काळात तिला अनंतने दिलेली साथ तेवढीच मोलाची आहे. हे दोघे जणू एकमेकांसाठीच बनलेले आहेत. आता तिचे फेसबूकवरचे फोटो, खाद्यपदार्थांविषयी तिने दिलेली माहिती पाहून तिच्या विषयी अभिमान वाटतो… ऑल द बेस्ट श्रध्दा…
Comments