कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडण्यामागची नाराजी
अधून मधून / अतुल कुलकर्णी
प्रिय नेत्यांनो,
नमस्कार !
आपला प्रचार जोमाने सुरू असेल. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी नांदेडमध्ये एका बेरोजगार तरुणाने कुन्हाडीने ईव्हीएम फोडले, आपण एम.ए. थे शिक्षण घेऊनही बेरोजगार आहोत. आपल्याला नौकरी नाही. त्याचा संताप त्याने ईव्हीएमवर काढला आहे. तो तरुण वेडा असावा. सरकार थोडेच प्रत्येकाला नोकरी देऊ शकते..? एम.ए. केल्यानंतर त्याने आणखी काहीतरी शिकायला हवे होते. शिकून काय होणार असे त्याला सांगूनही त्याने ते फारसे मनावर घेतले नाही. त्यापेक्षा चहाची टपरी किंवा वडापावची गाडी टाकून बसला असता तर चार पैसे तरी त्याने कमावले असते. आता उगाच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला ना..
निवडणुका आल्या की बेरोजगारी, महागाई असे विरोधकांच्या आवडीचे मुद्दे चर्चेला येतात. म्हणून का आपण मशिन फोडायचे? याचे जरा तरी भान त्याने ठेवायला हवे होते. आपल्यापुढे किती महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपल्या मतदारसंघात येणारे उमेदवार आपल्याला किती अमूल्य मार्गदर्शन करत आहेत. याचा कसलाही विचार त्याने ही कृती करण्यापूर्वी केला नाही. त्यामुळे त्याला तुम्ही फार दोष देऊ नका. त्याना माफ करा.. आपण सगळे विकासासाठी या पक्षातून त्या पक्षात धावत पळत गेला. सुरत, गुवाहाटी, गौवा, दिल्ली, पुणे असा प्रवास अनेकांनी केला, एवढे कष्ट केल्यानंतर विकासाची फळे मिळतात, हे त्या कुन्हाड घेऊन फिरणाऱ्याला काय कळणार…? त्याने त्याची नाराजी मतपेटीवर कुन्हाड टाकून दाखवून दिली.. मात्र, इथे नाराजांची भली मोठी यादीच आहे.. त्यांचेच प्रश्न अजूनही मिटले नाहीत… तेथे याच्या किरकोळ बेरोजगारीच्या प्रश्नाकडे अधून मधून लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे…
महाराष्ट्रभर नाराजीचा फॉग सुरू आहे… एखादा नाराज असेल तर ठीक… पण नाराजांची यादी कितीही प्रयत्न केले तरी संपता संपत नाही… ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सगळे कुठे ना कुठे नाराज आहेत. म्हणून काय हे सगळे कुन्हाड घेऊन ईव्हीएम फोडायला गेले का? याचे तरी भान त्या किरकोळ बेरोजगाराने ठेवायला हवे होते…
शरद पवारांनी या वयात हट्ट केला म्हणून पुतण्या अजित पवार नाराज झाले.. कितीही दिले तरी पुतण्याचे समाधान होत नाही, म्हणून शरद काका नाराज झाले आपल्या भावाला उमेदवारीची संधी मिळायला हवी, असे वाटणारे उदय सामंत नाराज झाले… भाऊ मंत्री असून आपल्याला काही उपयोग झाला नाही, म्हणून किरण सामंत नाराज झाले. ज्या श्रीरंग बारणे यांनी मावळमधून ज्यांचा पराभव केला, त्या पार्य पवारांवर बारणेचाच प्रचार करण्याची वेळ आली आहे, म्हणून ते नाराज आहेत.. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोधी एकमेकांवर नाराज आहेत.. हिंगोलीचे हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या सौभाग्यवतीला बाजूच्या मतदारसंघात उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज आहेत.
मोठ्या आशेने भावना गवळी शिदिगटासोबत गेल्या, पण, त्यांचाच पत्ता कट झाल्यामुळे त्या नाराज आहेत.
उमेदवारी मिळेल म्हणून बँकेचे कर्ज क्लीअर करणारे छगन भुजबळ लवकर निर्णय होत नाही म्हणून नाराज आहेत.. आपले वडील आपल्यासोबत येत नाहीत म्हणून अमोल कीर्तिकर नाराज आहेत… तर उमेदवारी मिळताच मुलामागे ईडीचा ससेमिरा लावला म्हणून पिता गजानन कीर्तिकर नाराज आहेत. काँग्रेसशी भांडून, स्वतःची हकालपट्टी करून घेऊन सत्ताधाऱ्यांकडून काहीच मिळत नाही त्यामुळे संजय निरुपम नाराज आहेत..
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाली, पण आपल्याला काहीच कसे मिळत नाही म्हणून नसीम खान नाराज आहेत… वसंतदादा पाटील यांची पुण्याई असणारे विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज आहेत. माढधामध्ये उमेदवारी मिळालेले रणजित निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर बिलकुल सहकार्य करत नाहीत म्हणून नाराज आहेत. तर, रामराजे रणजित निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत.. रायगडमध्ये भास्कर जाधव अनंत गितेंवर नाराज आहेत… शेकापच्या जयंत पाटलांना सुनील तटकरेंवर राग आहे.. ज्या राष्ट्रवादीला सोडून आपण भाजपमध्ये गेलो, त्याच राष्ट्रवादीकडून स्वताच्या पत्नीसाठी उमेदवारी घ्यावी लागल्याने धाराशिवचे राणा जगजीतसिंह पाटील नाराज आहेत…
मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण या तीन ठिकाणी भाजप-शिंद गटाचे, तर मुंबई उत्तरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरत नाहीत म्हणून सगळे इच्छुक नाराज आहेत… मुख्यमंत्री ठाण्यातले तरीही ठाण्याची उमेदवारी अजून जाहीर होत नाही म्हणून ठाण्यातले इच्छुक नाराज आहेत…
ठाणे जिल्ह्यात आपल्या पक्षाचे ११ आमदार असूनही आपल्याला उमेदवारी का मिळत नाही म्हणून भाजप नेते नाराज आहेत.. मतदानाची टक्केवारी वाढत नाही म्हणून निवडणूक आयोग नाराज आहे..
या सगळ्यांमध्ये विनाकारण सर्वसामान्य माणसांनी गॅस, भाजीपाला महाग झाला… बेरोजगारी वाढली.. महिन्याचा पगार पुरत नाही अशी फुसकी कारणे पुढे करून नाराजी व्यक्त करणे, त्यातून कुन्हाडीने ईव्हीएम फोडणे हा शुद्ध वेडेपणा नाही तर काय…? ज्यांना आपल्या मतांवर निवडून यायचे आणि आपले प्रश्न सोडवायचे आहेत त्यांचीच नाराजी अजून संपलेली नाही तेव्हा ते आपल्या नाराजीकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा करणे हाच खरे तर डबल वेडेपणा आहे….
तेव्हा उरलेल्या मतदानाच्या टप्प्यामध्ये तरी तुम्ही तुमची नाराजी घरी ठेवा.. मतदान हे पवित्र दान आहे.. ते चुपचाप करा..! दान करताना अपेक्षा ठेवू नका. त्यांनी काही दिले तर तुमचे नशीब… नाही दिले तरी तुमचेच नशीब.. मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. त्याला जोडून सुट्टी आली तर फुकट ओटीटीवर एखादा सिनेमा बघा.. फार वाटलं तर है वाचा आणि चौकात जाऊन भेळपुरी खात शांत बसा….
– तुमचाच,
बाबूराव
Comments