अजित दादांना हवे सातारा, रायगड, पुण्याचे पालकमंत्रीपद
मुख्यमंत्र्यांना हवा आहे मंत्रिमंडळ विस्तार
अतुल कुलकर्णी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करून हवा आहे. त्यांच्यासोबत आलेले अनेक आमदार मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून नाराज आहेत. त्यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या दबावामुळे मुख्यमंत्री विस्तारासाठी आग्रही झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रायगड, सातारा आणि पुण्याचे पालकमंत्री पद हवे आहे. ते होत नाही म्हणून अजित दादा रुसून बसले. शेवटी यावर तोडगा काढण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शिंदे यांना घेऊन दिल्ली दरबारी गेल्याची माहिती हाती आली आहे.
पुण्याचे पालकमंत्रीपद भाजप चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. ठाणे आणि साताऱ्याचे पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. रायगडचे पालकमंत्री पद शिंदे गटाचे उदय सामंत यांच्याकडे आहे. रायगड मधून आदिती तटकरे मंत्री झाल्या आहेत. सुनील तटकरे यांना लोकसभा लढवायची आहे. म्हणून अजित पवार यांच्या गटाला रायगडचे पालकमंत्री पद हवे आहे. साताऱ्याचे पालकमंत्री पद पवार यांना राष्ट्रवादीसाठी पाहिजे. त्याशिवाय पुण्याचे पालकमंत्री पद देखील अजित पवार यांना स्वतःसाठी हवे आहे. यातली कुठलीच मागणी मान्य होत नाही म्हणून अजित पवार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. दबावाच्या राजकारणाचा हा एक भाग असू शकतो असे शिंदे गटाला वाटते.
पुण्याचे पालकमंत्रीपद भाजप सोडायला कदाचित तयार होईल मात्र शिंदे गटाकडून सातारा आणि रायगडचे पालकमंत्री पद सोडले जाणार नाही, असे सांगण्यात येते. तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतूनच निर्णय होतील असे सूत्रांनी स्पष्ट केले. अजित पवार आता आपल्या मनासारखे होत नसेल तर ते सरकारमधून बाहेर पडतील किंवा कामकाजात भागच घेणार नाहीत, असे करण्याची सुतराम शक्यता नाही, असे भाजपचे नेते खाजगीत सांगतात. त्यांचे असे हट्ट शरद पवार यांच्याकडे चालायचे. भाजपमध्ये अशा गोष्टी चालत नाही, असेही एक नेता म्हणाला. यावर तोडगा म्हणून पुण्याचे पालकमंत्री पद भाजपकडून सोडले जाईल त्या बदल्यात बारामतीची जागा जिंकून देण्याचा शब्द अजित पवार यांच्याकडून घेतला तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असेही भाजपच्या एका नेत्याने सांगितले.
Comments