शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

विधानसभेला भाजपा १६० जागांवर लढणार; अजित पवारांच्या गोटात स्वतंत्र लढण्याचा सूर

– अतुल कुलकर्णी

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप कोणत्याही परिस्थितीत १५५ ते १६०च्या खाली एकही कमी जागा लढविण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने दिली आहे. विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यापैकी एवढ्या जागा लढविल्यानंतर उरणाऱ्या १२८ ते १३३ जागा शिंदेसेना, अजित पवार गट आणि मित्र पक्षांना दिल्या जातील, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

विद्यमान विधानसभेत भाजपचे १०५ आमदार आहेत. काही अन्य सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे भाजपची संख्या ११५ पर्यंत गेली होती. शिवसेनेचे ५५ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी ४० सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ सदस्य निवडून आले होते. त्यापैकी ३९ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. विद्यमान आमदारांपैकी काहींची तिकिटे बदलली गेली तरी जी जागा ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच त्या जागेवर उमेदवारी मिळाली पाहिजे, असा दावा तिन्ही पक्षांचे आमदार करत आहेत. तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांच्या तिकिटात बदल केला तरी त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील. असे असले तरी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत १६०च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतून १५५ ते १६० च्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही या नेत्याने स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १०० जागा मागितल्या असल्या तरी त्यांना ८० ते ९० जागा दिल्या जातील. उर्वरित जागा अजित पवारांची राष्ट्रवादी व सहयोगी पक्षांना ठेवल्या जातील. अजित पवार गटाने मात्र आपल्याला ७० पेक्षा एकही जागा कमी चालणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच झाले तर आपण स्वतंत्र लढण्याचा विचार करू, असा राजकीय विचारही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याचे वृत्त आहे.

भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही

महाराष्ट्रात भाजपने स्वतंत्रपणे २८८ जागा लढण्याची वेळ आता निघून गेली आहे. जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत, त्या जागा त्याच पक्षाकडे ठेवल्या जातील, उर्वरित जागांचे वाटप कसे करायचे एवढा मर्यादित मुद्दा आपल्यापुढे असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हेच निवडणुका होत असताना मुख्यमंत्री म्हणून राहतील. त्यात कुठलाही बदल होणार नाही. पण, भाजपने कधीही, कोणाचे नाव पुढे करून विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही राज्यात लढवलेल्या नाहीत. ज्या राज्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, अशी राज्ये किंवा मित्र पक्षांसोबत सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीच्या आधी कधीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही, असेही संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *