शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

काय घडले त्या रात्री..?
वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद

अतुल कुलकर्णी  (दि. २३ डिसेंबर २०२०)
मुंबई : भारत सरकारने ब्रिटनमधून भारतात येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या सात तासात मुंबई महानगरपालिकेने वाºयाच्या वेगाने कारवाई केली. युके मधून मुंबई विमानतळावर विमाने येताच त्यातील प्रवाशांना थेट बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये रवाना केले गेले. त्यामुळे आजतरी मोठा धोका टाळण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. सात दिवसानंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल. घरी देखील त्यांना सात दिवस विलगीकरणात रहावे लागेल. सक्तीने हॉटेलमध्ये पाठवण्यात आलेल्या प्रवाश्यांमध्ये अभिनेत्री आणि अक्षयकुमारची पत्नी टष्ट्वींकल खन्ना, आ. धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख यांचाही समावेश आहे.

त्या रात्री असे काय घडले की, कोणाला काही कळायच्या आत सेलीब्रेटीपासून सामान्य प्रवाश्यांपर्यंत सगळ्यांची रवानगी हॉटेलमध्ये केली गेली. हे सगळे घडले कसे, याचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहेल यांना गाठले. तेव्हा त्यांनी सांगितलेली कहाणी चित्तथरारक होती. ते म्हणाले, आम्हाला सोमवारी सायंकाळी ४ वाजता केद्र सरकारने विमानसेवा बंद केल्याचा आदेश मिळाला. तातडीने साडेचार वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आधीच्या बैठका रद्द करुन मुख्य सचिव संजयकुमार, मी आणि अन्य महत्वाच्या अधिकाºयांची बैठक बोलावली.कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी काही प्रवासी विमानतळावरुन पुण्याल टॅक्सी करुन गेले व आपल्याकडे साथ पसरली. नंतर येणारे प्रवासी शोधण्यात गेलेला वेळ आणि वाढलेले रुग्ण याची पुनरावृत्ती आम्हाला कोणत्याही स्थीतीत होऊ द्यायची नव्हती.
बैठकीत काही निर्णय घेतले गेले. मला व्यवस्था करायची आहे, असे सांगून आपण मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अर्ध्यातासात बीएमसीकडे निघालो. वर्षावरुन मुंबई महापालिकेत पोहोचेपर्यंत ट्रायडन्ट, मेरियट, ताज आणि अन्य काही हॉटेलच्या प्रमुखांशी बोललो. आपल्याला येत्या तीन तासात दोन हजार रुम हव्या आहेत, असे त्यांना सांगितले. वेगाने सगळी यंत्रणा कामाला लागली. महापालिकेत सहाय्यक आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह बेस्टचे अधिकारी, अन्य सह आयुक्त सगळे रात्री १२पर्यंत बीएमसीमध्ये ठाण मांडून कामाचे वाटप करत होते.

२१ तारखेच्या रात्री व पहाटे मिळून पाच विमाने आपल्याकडे येणार होती. त्यातून दोन हजार प्रवासी अपेक्षीत होते. त्यांना विमानतळ ते संबंधीत हॉटेलसाठी बसेस लागणार होत्या, अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करायची होती. सगळे काही विमानतळावर तयार ठेवायचे होते. शिवाय मोठा पोलिस बंदोबस्तही लागणार होता. मुंबई पोलिसांनी यासाठी खूप कष्ट घेतले. विमानतळावर काम करणाºया ईमीग्रेशनचे अधिकारी कर्मचारी यांना महापालिकेच्या वतीने पीपीई कीट मोफत वाटप केले गेले. कारण त्यांच्यापैकी कोणाला बाधा झाली तर सगळी मेहनत वाया जाणार होती. रात्री ८ वाजेपर्यंत आपल्याकडे २ हजार रुमची यादी तयार होती. कोणत्या हॉटेलमध्ये किती रुम असतील, तीन वेळच्या जेवणासह हॉटेलचे दर काय असतील, याच्या याद्या करणे सुरु झाले. हॉटेलमधून कोणी बाहेर जाऊ नये म्हणून तेथे बंदोबस्त आणि महापालिकेचे अधिकारी नेमण्याचे काम सुरु झाले होते. बारा वाजेपर्यंत सगळी तयारी पूर्ण झाली आणि रात्री पहिले विमान आले. सर्व प्रवाश्यांना राहण्यासाठीचे प्राधान्य विचारुन त्यांच्या सामानासह हॉटेलवर पोहचवण्याचे काम सुरु झाले. आज प्रत्येक हॉटेलबाहेर रुग्णवाहिका ही तयार ठेवल्या आहेत.

आलेल्या प्रवाश्यांपैकी जवळपास ३० टक्के प्रवासी अन्य राज्यात जाणारे होते. त्यांचा मुंबईत क्वारंटाईन होण्यास विरोध होऊ लागला. त्यांचा रोष वाढत असल्याचे कळताच पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलून रात्री निर्णय घेतला गेला. त्या प्रवाश्यांची वेगळी यादी केली. त्या त्या राज्याच्या मुख्य सचिवांना आपल्या उपायांसह ती कळवली गेली. आज आपण शपथपत्रावर लिहून द्यायला तयार आहोत की, त्या रात्री एकही प्रवासी मुंबईत त्याच्या घरी गेलेला नाही. सगळेच्या सगळे हॉटेलवर पोहोचवले गेले आहेत असेही चहेल यांनी ठामपणे सांगितले.

तणावपूर्ण वातावरणात मानवी संवेदनशिलता
येणाºया प्रवाश्यांमध्ये तीन महिला प्रेग्नंट असल्याचे कळाले. त्यांची डिलीव्हरी काही दिवसात अपेक्षीत आहे. हे कळाल्यानंतर त्यांच्याकडून ‘आम्ही फक्त दवाखान्यासाठी बाहेर जाऊ’ असे शपथपत्र लिहून घेतले व त्यांना घरी सुरक्षीतपणे पोहोचवले गेले. आजही त्यांच्या घरी बीएमसीचे कर्मचारी चौकशी करत आहेत, असे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

येत्या १० दिवसात रोज ४ हजार रुम लागणार
युकेमधून येणारी विमाने आता बंदच झाली आहेत. पण अनेक प्रवासी कनेक्टींग विमान घेऊन अन्य देशातून येतात. युरोपीयन आणि मिडल इस्ट मधून येणाºया विमानांवर बंदी नाही. त्यामुळे त्या प्रवाश्यांना सक्तीने क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी हॉटेलच्या ४ हजार खोल्या रोज लागणार आहेत. पुढच्या १० दिवसात ४० हजार खोल्या लागतील. मात्र कालापासून अनेकांनी विमानाची तिकीटे रद्द करणे सुरु केल्यामुळे किमान १ हजार खोल्या रोज लागणार आहेत. त्यांची यादी आज आपल्याकडे तयार आहे, असेही चहेल यांनी सांगितले. शिवाय यादीही देऊ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *