महापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’
एकच रंगसंगती, आधूनिक साधने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धा
अतुल कुलकर्णी
लोकमत
मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांची वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी प्रगत राष्ट्रातील सरकारी शाळांची संकल्पना विचारात घेऊन कधी काळी केलेला ‘मुंबई पब्लिक स्कूल’चा विचार आता युध्द पातळीवर राबण्यासाठी प्रत्यक्षात काम सुरु झाले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या ताब्यातील १८२८ शाळांचे रंग रुप बदलण्याच्या कामाला गती आली आहे. आत्तापर्यंत जवळपास १५० शाळांनी कात टाकली आहे. प्रत्येक वॉर्डात एक तरी सीबीएससीची शाळा देखील सुरु करण्याचेही नियोजन केले गेले आहे.
मंत्री आदित्य ठाकरे लोकमतशी बोलताना म्हणाले, महापालिकेच्या शाळांनी स्पर्धेमध्ये नावाजलेल्या खाजगी शाळांच्याही पुढे राहिले पाहिजे. त्यासाठी जे जे करावे लागेल ते आम्ही मिशन मोडवर करणार आहोत. दर्जेदार शाळा म्हणजे मुंबई पब्लिक स्कुल अशी ओळख राज्यभर झालेली आपल्याला पहायची आहे, असेही ते म्हणाले. महापालिकेचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी लोकमतशी बोलताना या संकल्पनेची माहिती दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबतच मराठी माध्यमासह प्रादेशिक भाषेतील अन्य सर्व शाळांमध्ये एकसुत्रता यावी व समाजामध्ये महापालिकेच्या शाळाचा दर्जा एकसारखा रहावा यासाठी सगळ्या शाळांचे नामकरण महापालिकेच्या शाळा या ऐवजी ‘मुंबई पब्लिक स्कूल’ असे करण्यात येत आहे. त्या नावापुढे ती शाळा ज्या भागातली आहे त्या भागाचे नाव जोडले जात आहे. या नावाचा समावेश असलेले विशेष सांकेतिक बोधचिन्ह तयार करुन ते वापरण्यासही सुरुवात झाली आहे. सर्व शालेय इमारतीचे आकर्षक प्रवेशद्वार व त्यावर बोधचिन्हासह ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाचा आकर्षक नामफलक करण्याचे कामही सुरु झाले आहे.
प्रादेशिक भाषेतील शिक्षकांच्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी ब्रिटीश कौन्सील या आंतरराष्ट्रीय संस्थमार्फत विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्गही सुरु करण्यात आले आहेत. प्रथम भाषेसाठी इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे दोन विषय ठेवून बहुतांश शाळा द्विभाषिक करण्यात आल्या आहेत.
असे असतील बदल :
– पालिकेच्या सर्व शाळांची रंगसंगतील एकच असेल.
– बालवाडी, पहिली, दुसरीच्या वर्गांमध्ये आकर्षक शैक्षणिक चित्रांचा समावेश असणारी रंगरंगोटी.
– डिजिटल वर्ग, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, लघू विज्ञान केंद्र, व्हर्च्यूअल क्लासरुम, पब्लीक अॅड्रेस सिस्टिम, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशिन, पिण्याचे शुध्द पाणी, आरटीई नियमानुसार पायाभूत सुविधा.
– खेळाच्या मैदानात सुधारणा, स्वतंत्र कला कक्ष, मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगर मधील प्रत्येक विभागात एक विज्ञान कुतुहल भवन, आधूनिक सभागृह उभारणार.
महापालिकेच्या शाळांचा पसारा :
– मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलगू, तामिळ व कन्नड अशा आठ माध्यमाच्या ९६३ प्राथमिक शाळांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
– २२४ माध्यमिक शाळांमधून जवळपास ४१ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण.
– विशेष मुलांसाठी देखील १७ शाळा.
– पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आठ माध्यमातील ८१४ शाळा.
– त्याशिवाय, महापालिकेमार्फत ३९९ खाजगी अनुदानित शाळांमधून पहिली ते चौथीच्या जवळपास १ लाख मुलांना शिक्षण.
– ११ सीबीएसईच्या व १ आयसीएसई अशा १२ शाळांमधून अंदाजे ४५०० विद्यार्थी.
Comments