शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४
23 November 2024

बॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..!

 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची लोकमतशी बाततिच

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आत्मनिर्भर भारत ही संकल्पना चांगली आहे. आपण ५९ चायनीज अ‍ॅप वर बंदी घातली हे चांगले झाले. त्यातून पाच नवे भारतीय स्टार्टअप् उभे राहीले. पण काही गोष्टी अशाही आहेत की त्यावर आपण ‘बायकॉट चायना’ म्हटले तर ते आत्महत्या केल्यासारखे होईल, असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ व सीएसआयआरचे माजी अध्यक्ष रघुनाथ माशेलकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

आपल्याकडे आत्मविश्वास असल्याशिवाय आत्मनिर्भर होता येणार नाही. त्यासाठी आत्मसन्मान हवा आणि म्हणून आता मेक इन इंडियाची व्याख्याच बदलावी लागेल. आपण बाहेरुन वस्तू आणून त्या इथे असेंबल करणे म्हणजे मेक इन इंडिया नाही. आपल्याला घाम गाळून मेहनत करणारेही हवे आहेत आणि नवनवीन शोध करुन पैसा उभे करणारे देखील. त्या दृष्टीने मेक इन इंडियाची व्याख्या करावी लागेल असेही माशेलकर म्हणाले.

जेनरिक उत्पादनात आपण जगात एक नंबर आहोत, पण फार्मा उद्योगाला लागणारे एपीआय (अ‍ॅक्टीव्ह फार्मासिटीकल इन्ग्रीयन्टस्) ७० टक्के चायनामधून येते. उद्या जर आपण बायकॉट चायना केले तर आपली फार्मा इंडस्ट्री शुन्यावर येईल. त्यासाठी आपण ‘कमीत कमी चायना’ ही भूमिका घ्यावी. भारत सरकारने एपीआय बद्दलची नवीन धोरणे आखली आहेत. ती चांगली आहेत. ती राबवली गेल्यास दोन अडीच वर्षात त्यातून आत्मनिर्भर होऊ पण त्यासाठी आपल्याला ‘स्ट्रॅटेजीक पेशन्स’ ठेवावा लागेल असेही माशेलकर म्हणाले.

जगाच्या तुलनेत आपण इनोव्हेशन्समध्ये कुठे आहोत? आपली तयारी किती आहे?
‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये आपण सहा वर्षापूर्वी जगात ८१ व्या नंबरवर होतो आज आपण ५२ वर आलो, पण चायना पहिल्या ३० मध्ये गेला. कारण सतत नवनवीन शोध करणे त्यांनी सुरु ठेवले आहे. आपण सकाळी उठून २१ वर्षाच्या मुलाला तू आता इनोव्हेशन कर असे सांगून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी मुलांची तयारी शाळेपासून करुन घ्यावी लागेल.

नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या क्रियेटीव्हीटीवर भर दिला आहे. आपल्याकडे तसे शिक्षक तयार करावे लागतील त्याचे काय?
नवे शिक्षक नव्या पध्दतीने तयार करावे लागतील. शिक्षकांचे कामच येत्या काळात बदलून जाणार आहे. शिक्षकांच्या भूमिका पूर्णपणे बदलतील. येत्या काळात डिजीटल आणि फिजीकल शिक्षण मुलांना द्यावे लागेल त्यासाठीचे शिक्षण तयार करणे हा अत्यंत महत्वाचा भाग त्यात असेल. आपण गुगलवर अवलंबून आहोत, मात्र ज्ञानसंवर्धन, बुध्दीसंवर्धन, व्यक्तीसंवर्धन, विचार संवर्धन हे गुगलच्या माध्यमातून होईलही पण मुल्य संवर्धन गुगलकडून होणार नाही. त्यासाठी डिजीटल आणि फिजीकल अशा दोन्ही गोष्टींची येत्या काळात गरज पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *