शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

कितीही सफरचंद खा…
घरी जाताना पिशवी भरून सोबतही न्या..!

अतुल कुलकर्णी

कॅनडा टूर 3

सफरचंदाच्या उत्पादनात जगात 33 व्या नंबरवर असणारा कॅनडा “ऍपल पीकिंग फेस्टिवल” भरवतो… आणि लोक उत्साहाने त्यात सहभागी होतात…! हे या देशाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. केवळ एवढेच नाही तर भोपळे, द्राक्षे, पिच, स्ट्रॉबेरी गोळा करण्याचे ही उत्सव या देशात होतात. तसे ऍपल पिकिंगचे उत्सव अमेरिकेत ही अनेक ठिकाणी होतात. मात्र जगातला सगळ्यात जास्त आंबा भारतात पिकतो, पण आपण आंब्यांच्या प्रसार आणि प्रचारासाठी असे काहीच का करत नाही..?

शुक्रवार, शनिवार, रविवार हे तीन दिवस यासाठी लोक खास राखून ठेवतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ऍपल पिकिंग सीजन जोमात असतो. शेतात गेल्यानंतर तुम्हाला दोन प्रकारच्या कॅरी बॅग दिल्या जातात. एक दहा डॉलरला आणि एक पंधरा डॉलरला… तुम्ही कितीही जण असा, तुम्हाला जेवढे सफरचंद तिथे बसून खायचे असतील तेवढे तुम्ही खाऊ शकता… आणि जाताना तुम्हाला दिलेल्या कॅरीबॅगमध्ये जेवढे बसतील तेवढे सफरचंद सोबतही नेऊ शकता..! त्याशिवाय एप्पल साइडर विनेगर, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स देखील तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.

मुळात कुटुंबासह किंवा मित्रपरिवारासह शेतात जाणे, सफरचंदांच्या बागांमधून फिरणे, झाडाला लागलेले सफरचंद तोडून खाणे हा जो आनंद तुम्हाला मिळतो तो 10 आणि 15 डॉलर्स पेक्षा कितीतरी जास्त असतो. अनेक कुटुंब केवळ त्यासाठी आपल्या मुलांना शेतात घेऊन येतात. सफरचंदाची गोष्ट सांगतात. झाड कसे असते, सफरचंद कसे लागतात, वेगवेगळ्या जातीची सफरचंद नेमकी कशी असतात, ती ओळखायची कशी…? याची माहिती देतात. ग्रीन एप्पल आणि लालचुटुक रंगाची वेगवेगळी सफरचंद मुलांना आईला आणि खायला मिळतात. ज्या शेतात आपण जातो त्या ठिकाणचे लोक त्यांच्या शब्दात कोणत्या जातीची सफरचंद आहेत हे आधीच सांगतात. त्याची लागवड कुठे केली आहे, तेही सांगतात. प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ एक विशिष्ट रंगाचा झेंडा लावलेला असतो. त्यानुसार कोणती सफरचंद तुम्ही तोडू शकता आणि कोणती तोडता येणार नाहीत हे देखील सांगितले जाते. मिळालेल्या सूचनांचे लोक तंतोतंत पालन करतात हे विशेष…!

कॅनेडियन जिओग्राफिक जर्नलच्या 1938 च्या अंकात एम.बी. डेव्हिस आणि आर.एल. व्हीलर यांनी त्यावेळी लिहिले होते की, “अनावश्यक निराशावादाशिवाय, कॅनेडियन सफरचंद उत्पादक वस्तुस्थितीला गंभीरपणे तोंड देतात,” हे वाक्य आजही इथल्या सफरचंदाच्या बागांमध्ये फिरताना जाणवते. फेडरल सरकारने त्यावेळी सफरचंदाच्या लागवडीसाठी मोहीम सुरू केली आणि आज फक्त ओंटारियोमध्ये जवळजवळ 20 वेगवेगळ्या प्रकारच्या सफरचंदांची लागवड केली जाते. नोव्हा स्कॉशिया कॅनडाच्या सुरुवातीच्या सफरचंदाशी निगडित इतिहासावर स्वतःचा दावा करू शकतो, परंतु न्यू ब्रंसविक, क्यूबेक, ओंटारियो आणि ब्रिटिश कोलंबिया हे देखील या उद्योगातील प्रमुख खेळाडू बनले आहेत.

 

सफरचंदांची लागवड करण्याची सुरुवात कॅनडात फ्रेंच वसाहतींनी केली होती. पहिली लागवड केलेली झाडे 1633 च्या आसपास नोव्हा स्कॉशियाच्या ऍनापोलिस व्हॅलीमध्ये दिसली होती. पुढे सीमेच्या दक्षिणेकडील वाण बाजारात येऊ लागले. नंतर अमेरिकेने त्यांच्याकडे उत्पादित होणारे सफरचंदाचे वाण कॅनडा आणले आणि येथे वेगवेगळ्या जातीची सफरचंदे पाहायला मिळू लागली. सफरचंद उत्पादनात चीन जगात नंबर एकचा देश आहे. 2020 पर्यंत, चीनमध्ये सफरचंदाचे उत्पादन 40.5 दशलक्ष टन होते. जे जगातील सफरचंद उत्पादनाच्या 63.63% आहे. तुलनेने सफरचंद उत्पादनात 33 व्या नंबरवर असणाऱ्या कॅनडामध्ये यावरून उत्सवी माहोल पहायला मिळतो.

भारत हा आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक असला तरी आंतरराष्ट्रीय आंब्याच्या बाजारपेठेत आपला वाटा 1% पेक्षा कमी आहे. भारतात आंब्याचे जेवढे उत्पादन होते ते सगळेच्या सगळे भारतात वापरले जाते. आपल्याकडे आंब्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आपला हापूस आंबा हा जगात प्रसिद्ध असला तरी तो भारतीय बाजारपेठेच्या बाहेर फारसा जात नाही. आपण देखील किंवा आपले सरकारही आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन देणारे निर्णय घेताना दिसत नाही. आपल्याकडे जर आंब्यांच्या बागांमधून “आंबा पीकिंग फेस्टिवल” सारखे उपक्रम सुरू केले तर एकटा कोकणात या माध्यमातून एक वेगळे आर्थिक वातावरण घडताना दिसेल. पण त्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेत सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. माध्यमांना अशा उपक्रमांसाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. विदर्भात संत्रा फेस्टिवल, कोकणात आंबा महोत्सव, आणि नाशिक सारख्या भागात द्राक्ष महोत्सव जर अशा पद्धतीने साजरे होऊ लागले, तर एक वेगळे चित्र सहज पाहायला मिळेल..! तुम्हाला काय वाटते…?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *