बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

कॅनडा टूर 4
गलेलठ्ठ भाज्यांच्या देशात..!

 

– अतुल कुलकर्णी

हाताच्या ओंजळीत मावणारा एक टोमॅटो, किंवा हात पसरला की त्यावर बसणारी एकमेव सिमला मिरची, हे असे दृश्य टोरंटो किंवा संपूर्ण कॅनडामध्ये नवे नाही. आकाराने प्रचंड मोठ्या असणाऱ्या भाज्या हे इथल्या लोकांच्या नजरेचा आणि सवयीचा भाग झाल्या आहेत. मिरची असो की फुलकोबी… पत्ताकोबी अथवा पालेभाज्या… प्रत्येक भाजी आकाराने प्रचंड मोठी टम्ब फुगलेली पाहायला मिळते.

(पत्ता कोबी)

आपल्या सारखी पाव किलो कोबी किंवा पाव किलो मिरची असा प्रकार इथे नाही. एक पूर्ण पत्ता कोबी घ्यायची किंवा दोन-तीन सिमला मिरची घ्यायच्या, त्याचे आधी वेगळे वजन करून घ्यायचे आणि नंतर बिलिंग काउंटरवर जाऊन वेगळे बिल करायचे असा प्रकार येथे नाही. जेव्हा तुम्ही बिल द्यायला जाता त्याच ठिकाणी त्याचे वजन केले जाते आणि त्यानुसार तुम्हाला दर लावला जातो. भाज्या तुम्हाला हव्या तेवढ्या वजनाच्या कापून मिळत नाहीत. गाजर देखील येथे चार किंवा सहा असे रबरबँडने बांधून ठेवलेले असतात. ते तसेच घ्यावे लागतात. तुम्हाला छोटे गाजर हवे असतील तर ते बंद पाकिटात ठेवलेले घेता येतात. याठिकाणी गाजर किसून देखील ठेवलेली असतात. गाजर तयार खिसलेला ही तुम्हाला मिळतो. हिरव्या पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथे सहज उपलब्ध होतात. त्या सोबतच बेरी प्रकारातील ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, कॅनबेरी असे अनेक प्रकार येथे स्वस्त आणि मुबलक उपलब्ध आहेत.

(हिरव्या भाज्या आणि लाल रंगाचे छोटे मुळे)

जास्त वजनाच्या व मोठ्या आकाराच्या भाज्या पाहून त्यात सत्व किती असेल असा प्रश्न मला पडला होता. या भाज्या खूप ताज्या टवटवीत दिसतात. मात्र आपल्याकडे भाज्यांना जशी असते तशी चव मात्र त्यात त्यांना येत नाही. हा विषय अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त आणि कृषी विषयाचे अभ्यासक महेश झगडे यांना सांगितला त्यावेळी त्यांनी या विषयाची वेगळी पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, जागतिक बाजार व्यवस्थेमध्ये आपला माल जास्तीत जास्त कसा विकला जाईल याकडे उत्पादकांचे लक्ष आहे. सगळ्यात आकर्षक काय दिसते, ते खरेदी करण्याचा ग्राहकाचा कल आहे. आपल्याकडे आंबा पिवळा धम्मक असेल तरच तो चांगला असा समज कायम झाला आहे. पण अनेकदा तो केमिकलने पिवळा केला जातो. खरं तर ते चुकीचे असते. तसेच सध्या भाज्या आणि फळाच्या बाबतीतीळ बदल जगभरात पहायला मिळत आहेत. भाज्या, फळे जी मोठी दिसतात, ज्यांचे कलर चांगले असतात पण त्यांना चव नसते. ते बेचव असले तरी चालतील पण दिसायला चांगले हवे असा कल असल्यामुळे उत्पादन हायब्रीड केले जाते व जास्तीत जास्त पैसा त्यातून कमावला जातो. भाज्या, फळे हायब्रीड पध्दतीने ब्रिडिंग करण्यास आता जगात मानता मिळाली आहे.

 

(तीन वेगवेगळ्या रंगाचे व जातीचे बटाटे)

अलीकडे विनेगरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात प्रीझर्व्हेटिव्ह टाकून त्याचा नैसर्गिक स्वाद काय होता हेच कळू दिले जात नाही. खूपवेळा अशा हायब्रीड भाज्या आणि फळे जेनेटिकली मॉडिफाइड केलेली नसतात. त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर फर्टिलायझर्स/पेस्टीसाईडस/ग्रोथ हार्मोन्स इ वापरल्यामुळे भाज्यांच्या मध्ये बदल होतात व भाज्या मोठ्या दिसतात. मोठ्या झाल्यामुळे त्यांचे वजनही वाढते. अनेकदा त्याला चव जरी नसली तरी त्याचा शरीरावर थेट विपरीत परिणाम होत नाही. बाहेरच्या अनेक देशांमध्ये कोणती खते किती वापरावीत याचे प्रमाण त्यांच्या अन्न प्रमाणकाप्रमाणे ठरवून दिलेले असते. पण त्याची अंमलबजावणी होते कि नाही त्याच्याकडे यंत्रणेकडून फारसे लक्ष दिले जात नाही. पण यामुळे आपण मूळ हरवून बसलो आहोत हे वास्तव आहे असेही झगडे म्हणाले.

(कांदे)

तर जेनेटिकली मॉडिफाइड लॅब मध्ये केले जाते आणि हायब्रीड पीक शेतामध्ये असे सांगून ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी ऍड. उदय बोपशेट्टी म्हणाले, दोन्हीही अपायकारक नसल्याचे मानले जाते. मात्र चव नसते हे निश्चित ! खरे दुष्परिणाम फर्टिलायझर्स/पेस्टीसाईडस/ग्रोथ हार्मोन्स इ वापरल्यामुळेच होतात… अनेक भारतीय कॅनडामध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील मी हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचेही हेच मत होते. भाज्या खूप सुंदर असतात. पण त्याला आपल्या सारखी चव नसते. मी देखील तो अनुभव घेतला आहे. तिथे एका मोठ्या दुकानात मला ऑरगॅनिक भाज्या म्हणून काही भाज्या विक्रीसाठी दिसल्या. मी उत्सुकतेने पाहिले… पण त्यांचेही आकार तसेच गलेलठ्ठ होते…

येथे चिकन, मटण किंवा अन्य नॉनव्हेज पदार्थ खाताना त्यासोबत मोठ्याप्रमाणावर सलाड घेतले जाते. त्यात प्रामुख्याने पत्ताकोबी, काकडी, टोमॅटो, कांदा, वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या असतात. यात जवळपास सगळ्या भाज्यांना विनेगर आणि मिरपूड लावून ठेवलेले असते. मिठाचे प्रमाण कमी आणि मैद्याचा वापर जास्त असे पदार्थ इथे ठीकठिकाणी खायला मिळतात. महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये देखील गव्हाची तंदूर रोटी मागितल्यावर मैद्याचीच रोटी येते. मात्र तांदळाच्या असंख्य जाती येथे पाहायला मिळतात. भात मोठ्याप्रमाणावर खाल्ला जातो. इंडियन स्टोअर्सची मोठी चेन कॅनडा मध्ये आहे. त्याठिकाणी मात्र गवारीच्या शेंगा पासून ते असंख्य भारतीय पदार्थ मिळतात. श्रीलंकेच्या एका व्यक्तीने मिसीसागामध्ये भारतीय ग्रोसरी स्टोअर उघडल्याचेही पाहायला मिळाले. तर बनारस नावाच्या हॉटेलमध्ये केशरापासून बनवलेली रसमलाई आणि उत्तम दर्जाचे गुलाबजाम, पिस्ता कुल्फी जणू काही आपण महाराष्ट्रातच खात आहोत असा अनुभव देणारे होते. इथे देखील “खई के पान बनारसवाला” म्हणत पानाची काही दुकाने आहे. पण तिथे गेल्यानंतर आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर आपण भारतात आहोत याची जाणीव होते. ठीकठिकाणी पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या आपल्याला भारत विसरू देत नाहीत…! जय हो….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *