![](https://www.atulkulkarni.in/wp-content/uploads/2025/02/sanjay-raut-anthane-naresh-mhaske_2025021393374-1.jpg)
संजय राऊत, नरेश म्हस्के यांना एकत्रित डॉक्टरेट दिली तर..?
अधून मधून / अतुल कुलकर्णी
श्री. संजय राऊत, जय महाराष्ट्र आपण गेल्या काही दिवसांत जी विधाने करीत आहात, त्यामुळे आम्हाला मराठी असल्याचा प्रचंड अभिमान वाटत आहे. आपण देत असलेल्या वेगवेगळ्या उपमा, अलंकारांमुळे मराठी भाषेचा वटवृक्ष नव्याने फोफावला आहे. भाजपच्या गोटात तर आपल्याविषयी प्रचंड प्रेम वाढले आहे. आपण जेवढी विशेषणे लावाल, तेवढा भाजपचा फायदा होईल असे त्यांना कोणी तरी सांगितलेले दिसते. आपल्याकडून धारदार शब्दांचे बाण सुटले, की शिंदे गटातून मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत यांच्याकडूनही जोरदार फटकेबाजी सुरू होते. आपल्या दोघांमधील हा प्रेमसंवाद असाच चिरंतन राहावा असे साकडे भाजपच्या काही नेत्यांनी वेगवेगळ्या देवांना घातल्याचे वृत्त आहे. कारण सोपे आहे. भाजपमध्ये काय सुरू आहे, याची चर्चाच होत नाही… आपण तेवढी स्पेस त्यांना देतच नाही…
परवा तुम्ही म्हणालात, वर्षा बंगल्यावर गुवाहाटीवरून आलेल्या रेड्याची शिंगे पुरून ठेवली आहेत. त्यावर रामदास कदम, शंभूराज देसाई यांनी आपल्यावर केवढा शब्दहल्ला चढवला… तुम्हाला काही इजा तर झाली नाही ना… तुमचा हा वाद सुरू असताना बांधकाम विभागाच्या लोकांना नेमकी शिंगे कुठे पुरून ठेवली आहेत असा प्रश्न पडला आहे..! खोदायला कुठून सुरुवात करायची यावर त्यांच्या बैठका सुरू असल्याचेही समजते…सगळ्यात भारी जुगलबंदी काल-परवा ऐकायला मिळाली. शिंदे आणि ठाकरे शिवसेनेत ‘ऑपरेशन टायगर’वरून इंग्रजीमिश्रित मराठी भाषेचे जे काही आदानप्रदान झाले त्याला तोड नाही. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कमळ असे जे काही व्हायचे ते होईल; पण शिंदेसेनेचा आधीच ऑपरेशन रेडा झाला आहे, शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे, असे आपण बोललात आणि समस्त वैद्यकीय क्षेत्र हादरून गेले. अपेंडिक्स पोटात उगवतो याचा अर्थ त्याचे बी कुठे तरी मिळत असणार. सगळे डॉक्टर त्याचाच शोध घेण्यात गुंतले आहेत.
आपल्या या विधानाला ‘ठाणे नरेश’ खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर दिले नसते तर नवल. त्यांनी तर तुम्हाला थेट महामंडलेश्वर अशी पदवी देऊन टाकली. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर जो वाद झाला, तसा वाद आपल्या या पदवीदानावरून होऊ देऊ नका. ‘आपण बांडगूळ आहात, आपल्या पक्षाला घरघर लागली आहे’, असे आपले निदानही नरेश म्हस्के यांनी केले आहे. इतकी दिव्यदृष्टी नरेश म्हस्के यांना लाभली. त्याविषयी त्यांना एखाद्या विद्यापीठाची डॉक्टरेट देण्याची शिफारस करायला हवी. अपेंडिक्स पोटात कसा उगवतो, त्याला किती खतपाणी घालावे लागते, त्याचे बीज नेमके कुठे मिळते? याविषयी आपण आपला रिसर्च पेपर सादर केला तर आपल्यालाही डॉक्टरेट मिळेल. तुम्हा दोघांना एकत्रित डॉक्टरेट देण्याचा सन्मान आपण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर केला तर कसे होईल…? या निमित्ताने तरी दोघे एकत्र येतील.
खरे-खोटे माहिती नाही, पण गेल्या वर्षी आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळाला चोरमंडळ आणि गुंडामंडळ असे म्हटल्याची बातमी होती. भाजपकडून आता प्रभू श्रीरामाला निवडणुकीत उभे करण्याची घोषणा बाकी आहे, अशी शोध पत्रकारिताही आपण केली होती. देशातील लोकशाही आता शेवटची घटिका मोजत आहे, लोकशाही आयसीयूमध्ये आहे, असा निष्कर्ष आपण संसदेत बोलताना मांडला होता. तो निष्कर्ष ज्या संशोधनाद्वारे काढला ते संशोधन देशातल्या जनतेला खुले करून दिले पाहिजे. इतके अभ्यासपूर्ण संशोधन तुमच्यापुरतेच मर्यादित राहू नये म्हणून हा प्रेमाचा सल्ला…महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. जागा वाटपाच्या विलंबामुळे काही जागा गमवाव्या लागल्या, असे आत्मचिंतनही आपण जनतेसमोर मांडले. त्यामुळे तुमच्या प्रामाणिकपणाविषयी कोणाच्याही मनात तीळमात्र शंका उरलेली नाही.
जाता जाता : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटात मोठी फूट पडेल, उदय सामंत २० आमदारांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट सोडतील, नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी कोणालाही माहीत नसलेली स्टोरी आपण उघड केल्याचे कोणीतरी सांगत होते. त्याचे पुढे काय झाले? हे देखील आपण तितक्याच प्रामाणिकपणे सांगायला हवे. यापुढे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपला पक्ष स्वबळावर लढवील असे उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्याचे, आपणच जनतेला सांगितले. या निर्णयाचे पुढे काय झाले तेही सांगून टाका. म्हणजे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील. आपल्यासारखा नेता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे याचा त्यांना रोज अभिमान वाटत असेल… याविषयी उद्धवजींना भेटून विचारण्याची अस्मादिकांची तीव्र इच्छा आहे. आपण वेळ घेऊन दिली तर बरे होईल…
– आपलाच बाबूराव
Comments