शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

व्हिडिओ गेम खेळून जग जिंकणारा अवलिया

कॅलिडोस्कोप / अतुल कुलकर्णी

लहानपणापासून सतत व्हिडिओ गेम खेळणारा एक तरुण मुलगा वयाच्या २१ व्या वर्षी दुबईत झालेल्या कार रेस मध्ये भाग घेतो. अनेक कार रेस मध्ये खेळून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. व्हिडिओ गेम खेळता खेळता व्यावसायिक रेस कार ड्रायव्हर होणारा पहिला तरुण ठरतो. त्याचे नाव जान मार्डेनबरो. इंग्लंडमधील डार्लिंग्टन येथे १९९१ साली जन्माला आलेल्या या तरुणाचे मोटर स्पोर्ट्स मधील स्थान म्हणूनच अनोखे आहे. Gran Turismo “ग्रॅन टुरिस्मो” व्हिडिओ गेम मधून खऱ्या मोटर्स स्पोर्ट्सच्या जगात प्रवेश करणारा एक तरुण मुलगा कशा पद्धतीने व्यावसायिक रेस कार ड्रायव्हर बनतो, याची रोमहर्षक कथा म्हणजे ग्रॅन टुरिस्मो याच नावाने आलेला चित्रपट.

हा चित्रपट याच जान मार्डेनबरो या तरुण मुलावर आणि त्याच्या आयुष्यात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. २००८ मध्ये, निसान आणि सोनी प्ले स्टेशनने Gran Turismo गेमवर आधारित एक अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. ज्याचे नाव GT Academy होते. या स्पर्धेचा उद्देश व्हिडिओ गेम खेळणाऱ्या लोकांना व्यावसायिक रेसिंग कार ड्रायव्हर बनवण्याची संधी देणे हा होता. वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकल्यानंतर, जानने निसानच्या सहाय्याने व्यावसायिक रेसिंग कार ड्रायव्हर म्हणून प्रचंड मेहनत आणि चिकाटीने प्रशिक्षण घेतले. २०१२ मध्ये त्याने “दुबई २४ तास रेस” मध्ये भाग घेतला. पुढे त्याने युरोपियन फॉर्म्युला तीन, GP3 आणि Le Mans यांसारख्या प्रतिष्ठित रेसिंग स्पर्धांमध्ये ही सहभाग घेतला. २०१४ मध्ये Le Mans 24 Hours या जगप्रसिद्ध रेसमध्ये जानने तिसरे स्थान मिळवले, त्याच्या करिअर मधले ते मोठे यश होते. त्याच्या वेगवान प्रगतीमुळे आणि धाडसी शैलीमुळे तो रेसिंग जगात कसा प्रसिद्ध झाला याची रोमहर्षक कथा “ग्रॅन टुरिस्मो” या ऍक्शन-ड्रामा चित्रपटातून पाहायला मिळते. दिग्दर्शन नील ब्लोमकॅम्प यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून, त्यात ऑर्लांडो ब्लूम, डेव्हिड हार्बर आणि आर्ची मॅडेकवे यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. संपूर्ण चित्रपट “ग्रॅन टुरिस्मो” या लोकप्रिय रेसिंग व्हिडिओ गेमवर आधारित आहे. जगभरात या चित्रपटाचे कौतुक झाले. एक सामान्य गेमर ते एक व्यावसायिक रेस कार ड्रायव्हर असा विलक्षण प्रवास करणाऱ्या जान मार्डेनबरो नावाचा हा तरुण मोटर स्पोर्ट्स च्या जगात कसा इतिहास घडवतो हे सिनेमात पाहणे तितकेच रोमहर्षक आहे. व्हिडिओ गेम खेळता खेळता आयुष्यात कसा वेगळाच बदल घडतो हे या चित्रपटातून अनुभवता येते. चित्रपटातील थरारक रेसिंग सिक्वेन्स, रेसिंगची दृश्य आपल्याला आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जातात. पाहिलेले स्वप्न कसे पूर्ण करायचे याचा वस्तूपाठ म्हणजे हा सिनेमा आहे.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. जो तो मोबाईल मध्ये गेम खेळत बसलेला दिसतो. यात आपण किती तास वाया घालवतो याचेही अनालिसिस गुगल आपल्याला देत असते. दिवसातले पाच पाच तास व्हिडिओ गेम मध्ये घालवणाऱ्या तरुणांसाठी हा चित्रपट निश्चित दिशा देणारा आहे. आजच्या काळात नवरा, बायको, दोन मुले असे छोटे कुटुंब सर्वत्र पाहायला मिळते. आई वडील दोघेही नोकरी. मुलगा काय करत आहे यावर लक्ष ठेवण्यास आई-बाबांना वेळ नाही.

24 तास व्यस्त राहणारे पालक आपल्या मुलाने काय व्हावे हे आपण आपल्या मित्रांना सांगतात… आणि आपले आई-बाबा कसे आहेत हे ती मुलं त्यांच्या मित्रांना सांगतात. मात्र आई बाबा आणि त्यांची मुले एकमेकांविषयी एकत्र बसून आपापसात बोलतच नाहीत. दोघांमध्ये संवादच न उरलेली अनेक घरे आपल्याला पाहायला मिळतील. आपण डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकलो नाही, म्हणून आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण करावे असे आईबापांना वाटते. स्वतःच्या स्वप्नांचे ओझे ते मुलांच्या खांद्यावर टाकतात. मात्र मुलांना काय व्हायचे आहे याचा विचारही अनेक आई वडील करत नाहीत. अशी मुले मग व्हिडिओ गेमच्या आहारी जातात. काही गेम खेळता खेळता मुलांनी आत्महत्याही केल्याच्या घटना नव्या नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर “ग्रॅन टुरिस्मो” हा चित्रपट स्वप्नांच्या पाठलागाची आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिलेल्या मेहनतीची अनोखी गोष्ट सांगतो. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत हा सिनेमा बघावा इतका तो उत्तम दर्जाचा बनला आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि अनेक दृश्ये तांत्रिकदृष्ट्या अतिशय उच्च दर्जाची आहेत. रेसिंग दृश्ये जितकी रंजक आहेत तितकीच ती वास्तववादी देखील आहेत. विशेषतः, ग्रॅन टुरिस्मो गेमचे व्हिज्युअल्स आणि खऱ्या रेसिंग जगतातील तंत्रज्ञान याचे वेगळे मिश्रण या चित्रपटातून पाहायला मिळते. संगम या चित्रपटात दिसतो.

जाता जाता : हा चित्रपट बघितलेली स्वप्ने सत्यात कशी आणावीत हे तर सांगतोच शिवाय आई-वडील आणि मुलांमधला संवाद किती गरजेचा आहे हे देखील अधोरेखित करतो. या चित्रपटातील मुलगा आणि बाप यांच्यातला एक प्रसंग अतिशय बोलका आहे. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला नसेल तर जरूर बघा या मतांशी तुम्ही देखील नक्की सहमत व्हाल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *