बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

टीपू सुलतानवर टीका आणि गांधीजींवर प्रेम, ही काय भानगड…?
अधून मधून

– अतुल कुलकर्णी
गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्क वितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योध्दा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्या विरुध्द का बोलत आहेत… काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्व विभागाकडं न्यायचं ठरवलं. तेवढ्यात बाबूरावांच्या सौ म्हणाल्या, तुम्ही थेट न जाता आधी त्या पुरातत्ववाल्यांना पत्र लिहा. तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळं त्यात मांडा, नंतर भेटायला जा… बाबूरावांना सौंचा सल्ला पटला. त्यांनी तात्काळ पत्र लिहायला घेतलं. ते पत्र असं –
माननीय पुरातत्व विभाग प्रमुख,
तुमचा आणि सध्या देशात असणाºया जुन्या पुराण्या वस्तूंचा, बिल्डींगचा, माणसांचा काही संबंध आहे की नाही..? असला तर तुम्हाला काही लिहीण्यात अर्थ आहे, नाहीतर कशाला वेळ वाया घालवू…? सध्या आमच्याकडं टीपू सुलतानवरुन चर्चा, मोर्चा, गदारोळ सगळं काही चालू आहे. मुंबई भाजपाचे नेते, कार्यकर्ते टीपूचे नाव काढलं की अंगावर येतात. मुंबईत एका मैदानाला टीपू सुलतानचं नाव दिलं आहे. तशी मुंबई सात बेटांची होती म्हणे. आता हे मैदान नेमक्या कोणत्या बेटावरचं होतं? की भराव टाकून बनवलं होतं…? त्यामुळे त्या मैदानाचा सातबारा तुमच्या पुरातत्व विभागात कोणाच्या नावाने आहे हे कळू शकेल का? आता टीपूचं नाव का दिलं असं विचारले की आम्हाला लगेच काही जण देशद्रोही वगैरे म्हणतात. असं कोणाचं नाव घेतलं की माणूस देशभक्त किंवा देशद्रोही ठरतो का? पुरातत्व विभागात याचे काही दाखले आहेत का…? बघा काही सापडतात का ते…?
आमच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत. ज्या मुंबईत टीपूच्या नावावरुन वाद सुरु आहे त्याच मुंबईच्या अंधेरी भागात २००१ साली एका रस्त्याला टीपू सुलतानचे नाव दिलं म्हणे… आणि त्यावेळी भाजपचे सगळे नेते हजर होते.. एवढंच कशाला, २०१३ साली गोवंडीत एका रस्त्याला टीपूचं नाव दिलं आणि तो प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकानेच आणला होता म्हणे… तिकडे अकोल्यात सुध्दा महापालिकेत स्थायी सभागृहाला टीपूचे नाव दिलंय… त्यासाठीच्या प्रस्तावाचे सूचक भाजपचेच नगरसेवक होते म्हणे… हे सगळं कुठं तपासून मिळेल… याची काही कागदपत्रे जुनी पुराणी, झाली म्हणून पुरातत्व विभागात पाठवली जातात का…? आमच्या घरी जुने कागद, पुस्तकं, एखादी बाटली सापडली तर लगेच आमच्या सौ. द्या पाठवून पुरातत्व विभागात असं म्हणतात…. म्हणून आपलं विचारलं…
ते जाऊ द्या… २०१२ साली यदुरप्पा यांनी टीपू सुलतानच्या कबरीला भेट दिली होती आणि तिथल्या वहीत हा ग्रेट वॉरीेयर होता असं लिहून ठेवलंय म्हणे… ते तर काहीच नाही… आपले राष्टÑपती २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत आले होते. त्यावेळी त्यांनी टीपू सुलतानचं वर्णन ‘देशासाठी प्राणाची आहूती देणारा योध्दा’ असं केलं होतं. आता हे सगळं जुनं पुराणं कोण तपासून देणार सांगा बरं…?
जाता जाता आणखी एक… आमच्या मुंबईत एक जांबोरी मैदान आहे. तिथं म्हणे महात्मा गांधीजींच्या नावाची पाटी होती… आणि ती शिवसेनेने काढली असं भाजपवाले म्हणत आहेत… त्यामुळे सुध्दा आमच्या मनात काही प्रश्न आले आहेत… आमच्या पत्रात दिलेले सगळे दाखले भाजपवाले टीपू सुलतानवर प्रेम करणारे होते असं सांगणारे आहेत. मात्र तेच आता टीपूवर टीका आणि गांधीजींवर प्रेम करत आहेत… ही काय भानगड आहे…? याचे तपशिल तुमच्या पुराणविभागात आहेत का? जाता जाता एकच शेवटचं सांगा, गांधीजी नेमके कोणाचे होते…? की फक्त सरकारी भिंतीवर लावण्यापुरतेच होते…? सगळं जगं गांधीजींच्या विचारावर चालतोय असं म्हणतं… आपण नेमकं कोणाच्या विचारावर चालतोय… आपला आणि गांधीजींचा काही संबंध आहे का…? तुमच्या पुराण खात्यात त्याच्या काही नोंदी आहेत का..? बघा सापडतात का काही…?
तुमचाच,
बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *