बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे आणि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार

अधूनमधून / अतुल कुलकर्णी

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले तिघांची मैत्री काल महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिली. उद्धव ठाकरे यांनी ‘हातात’ ‘मशाल’ धरा आणि विजयाची ‘तुतारी’ वाजवा, असे म्हणत तिन्ही पक्षांच्या चिन्हांचा प्रचार करण्याचे आवाहन केले. शरद पवार यांनी लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे. आपण सगळे एकजुटीने लढू, असे सांगितले, तर नाना पटोले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मोदी-शहांवर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीची ही एकी बघून सर्व्हे करणाऱ्या तमाम एजन्सीज त्रस्त झाल्या असतील; मात्र खरी चर्चा सुरू झाली ती मुख्यमंत्रिपदी कोणाचा चेहरा जाहीर होणार त्याची. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचेही नाव जाहीर करावे, मी जाहीर पाठिंबा देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याच वेळी त्यांनी ज्याच्या जागा जास्त तो मुख्यमंत्री होईल असे करू नका, हेही जाहीरपणे सुनावले आहे.

उद्धवजी, बरे झाले तुम्ही हे सांगून टाकले. भाजप-शिवसेना युती असताना हाच फॉर्म्युला होता. त्यात दोघांनीही एकमेकांचे उमेदवार कसे पाडले, हेही तुम्ही सांगून टाकले; पण काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन पक्ष वेगळ्या मुशीतले आहेत. ते काही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाहीत. आधी राज्यात सरकार बदलणे महत्त्वाचे आहे. तो एककलमी कार्यक्रम करू. मग बघू… असे शरद पवारांनी सांगून टाकले, तर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवणे तुमचे-आमचे काम नाही, असे सांगत नाना पटोले यांनी चेंडू दिल्लीच्या दिशेने भिरकावला आहे. अशी भिरकवा-भिरकवी करण्यात काँग्रेस नेते पटाईत आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल. जी गोष्ट होणार नाही तो मुद्दा तुम्ही परत का काढला माहिती नाही; पण यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर पडणार नाही ना..?

भाजपसह एकही पक्ष मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल यावर बोलायला तयार नाही. तुम्ही हा विषय लावून धरला तर काय होईल..? आपल्या पक्षाचे सतत बोलणारे नेते संजय राऊत यांच्या बोलण्यावर जरी आपण मर्यादा आणल्या, तरी आपल्या मनात जे आहे ते लवकर साकार होऊ शकेल, असे काँग्रेसचे नेते खासगीत सांगत होते. आपण दिल्लीत गेला होता, तेव्हा त्या चर्चा मुंबईत पोहोचल्या आहेत.. काँग्रेसने एक सर्व्हे केला आहे, त्यात आपल्या पक्षाला म्हणाव्या तेवढ्या जागा मिळतील असे दिसत नाही. आपण मुख्यमंत्रिपदासाठी फार ताणून धरू नये. दोन-चार जागांसाठी बोलणी होईल. आज गरज भाजप-शिवसेनेला सत्तेवरून हटवण्याची आहे, असे आपल्याला राहुल गांधींनी सांगितल्याची चर्चा मुंबईत चालली आहे. खरे खोटे माहिती नाही…

दुसरी एक चर्चा आहे. त्याच सर्व्हेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ६० ते ६५ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे करायचे, ही चर्चाही आता सुरू झाली आहे. हे खरे की खोटे माहिती नाही; पण अशा चर्चा हळूहळू नरेटिव सेट करत असतात, हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नसावी. तुमच्या सुदैवाने भाजप-शिंदेसेनेला अजूनही महाराष्ट्रात नरेटिव्ह सेट करता आलेले नाही; पण ‘लाडकी बहीण’ योजना जर कामी आली, तर तुमची अडचण होऊ शकते.

विषय सर्व्हेचा निघाला म्हणून आमच्या हाती आलेले काही सर्व्हे आपल्याला सांगतो. भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये भाजप ७०, शिंदेसेना ४५, अजित पवार ३५ असा निकाल आला आहे, तर काँग्रेस ८०, शरद पवार राष्ट्रवादी ६० आणि उद्धव ठाकरे ३५ ते ४० असा काँग्रेसचा सर्व्हे आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील एक सर्व्हे केला आहे. त्यात उद्धव ठाकरे ७०, काँग्रेस ६० आणि शरद पवार ५५ जागांचा अंदाज आहे. अजित पवार गटाने सर्व्हे केलाय; पण त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतांची एवढी सरमिसळ झाली आहे की, कोणाची मते कोणाला कळत नाही… काहीही असले तरी, आता येणारे सर्व्हे आणि प्रत्यक्षात निकाल यात जमीन-आसमानचे अंतर असेल हाच निष्कर्ष खरा माना…

निवडणुका दर पाच वर्षांनी का येतात? त्या दरवर्षी आल्या पाहिजेत. म्हणजे सर्व्हे करणारे, तसेच माध्यम सल्लागार यांना चांगले दिवस येतील. अजित दादांचे बघा. त्यांनी गुलाबी रंग घालायला सुरुवात केला आणि सगळीकडे गुलाबी रंगाचे अचानक शॉर्टेज झाले आहे. अजित दादांच्या गटाने राज्यात जिथे जिथे गुलाबी रंग उपलब्ध आहे, तो सगळा विकत घेतल्याची माहिती आहे. पुढच्या वेळी आणखी वेगळ्या रंगाला चांगले दिवस येतील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. तुम्ही देखील एखादा रंग निवडा… हा उगीच जाता-जाता फुकाचा सल्ला…

तुमचाच 

बाबुराव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *