मोडकळलेल्या इमारती आणि ‘तोडी मिल ‘फँटसी’
मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी
काही वर्षांपूर्वी मुंबईत एका प्रशस्त संकुलासाठी काही झोपड्या पाडायच्या होत्या. ज्या जागेवर झोपड्या होत्या तिथल्या लोकांना बोलावण्यात आले. त्यांच्या झोपड्यांची किंमत दिली गेली. पैसे घेऊन घरी जाताना तुम्ही तुमची झोपडी पाडून जायचे, असे सांगितले गेले. अवघ्या काही दिवसांत सगळ्या झोपड्या पाडल्या गेल्या. त्या जागी आज एक उत्तुंग इमारत उभी आहे. याचा अर्थ त्या झोपड्या कायमच्या गेल्या का? तर बिलकुल नाही. त्याच लोकांनी आपल्या झोपड्या दुसऱ्या जागेवर उभारल्या. मुंबईत हे सतत होत गेले. मुंबईत १९९५ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन धोरण आणले गेले. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर चाळी आणि झोपडपट्टवा हटवून तेथे मोठमोठे टॉवर उभे करण्याच्या कामाने गती घेतली.
सुरुवातीच्या काळात अशा टॉवर्सना विरोधही झाला. मात्र चाळीत, झोपडपट्टीत राहणाऱ्यांनाच हाताशी धरून, त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवत झोपड्या हटवल्या गेल्या. चाळी पाडल्या गेल्या. या सगळ्याचा राग त्यावेळी त्या तरुण पिढीमध्ये होता. पुढे ती पिढीही टॉवरमध्ये जाण्याची स्वप्ने पाहू लागली. टॉवरमध्ये राहणाऱ्यांनी झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू केले, तर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना टॉवरमध्येच काम मिळत असल्यामुळे मनातल्या मनात चरफडत का होईना त्यांचाही विरोध थंडावला. मुंबईच्या राजकारण्यांचे नफा-तोट्याचे गणित झोपडपट्टी आणि टॉवरने पूर्णपणे बदलून टाकले. ज्या गिरणगावात आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या मनातून ‘तोडी मिल फँटसी’सारखे नाटक जन्माला आले, त्याच तरुणांनी गिरणगावातच उभारलेल्या अण्णा भाऊ साठे एसी नाट्यगृहात आपल्या अनुभवांचे भीषण वास्तव मांडले… हा कोणी कोणावर उगवलेला सूड म्हणायचा? आजही सुमारे ६० लाख लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, जवळपास अडीच लाख लोकांचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन केले गेले.
घरकूल योजना, पीएम आवास योजनेतून घरे दिली गेली. या सगळ्यांची उलाढाल कमीत कमी ३० ते ४० हजार कोटींची झाली. मात्र, आपल्याच विदारक अनुभवांचा पेटारा खोलून दाखवण्यासाठी ‘तोडी मिल फँटसी’ सारखे नाटक करणाऱ्या क्युरेटर अमेय मोंडकर, लेखक सुजय जाधव आणि दिग्दर्शक विनायक कोळवणकर यांना लाख दोन लाख रुपयांसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अंकुश चौधरीसारखा एखादा संवेदनशील अभिनेता पुढे आला म्हणून शनिवारी या नाटकाचा प्रयोग तरी झाला. या नाटकाने उपस्थितांच्या भावनेला हात घातला. मात्र, हे महानगर भावनेवर चालत नाही. पैसा, पैशातून पैसा, त्यातूनही पैसा हे या शहराचे तितकेच जीवघेणे वास्तव आहे. झोपडपट्टी, चाळींच्या पुनर्वसनाची जागा आता मोडकळीस आलेल्या इमारतींनी घेतली आहे. त्यातही मोठा पैसा आहे. त्यामुळे पावसाळा आला की मोडकळीस आलेल्या इमारतींची चर्चा होते. याच काळात जाणीवपूर्वक काही इमारती रिकाम्या केल्या जातात. त्या जागी टॉवर उभारण्यास मंजुरी दिली जाते. ठरावीक मुदतीत टॉवर उभे करणे अपेक्षित असताना त्यात अनेक वर्षे जातात.
घराच्या आशेने त्याच जागेवर घिरट्या मारणारे लोकही हळूहळू थकून तिकडे फिरकणे सोडून देतात. आणि कधी तरी अख्खे टॉवर त्यावेळी असणाऱ्या मार्केट रेटने विकायला काढले जाते. यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई महापालिकेने १८८ इमारती धोकादायक असल्याची माहिती जाहीर केली आहे. यातील ११४ इमारती अतिधोकादायक आहेत. त्यात मालाड, बोरीवली, मुलुंड, अंधेरी या भागातल्या इमारतींची संख्या जास्त आहे. लोक या इमारती सोडायला तयार नाहीत. कारण त्यांना याच जागी पुन्हा आपल्याला कधी घर मिळेल याची कसलीही शाश्वती नाही. जी अवस्था मुंबई महापालिकेची तीच म्हाडाची. इंग्रजांनी बांधून ठेवलेल्या इमारती आजही शाबूत असताना म्हाडाच्या इमारती अवघ्या काही वर्षांत अतिधोकादायक कशा होतात हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. याही वेळी मुंबईत २० इमारती अतिधोकादायक असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.
धोकादायक इमारतीतील लोकांना संक्रमण शिबिरात व्यवस्था केल्याचे सांगितले जाते. मात्र, संक्रमण शिबिरांची अवस्था गुरांच्या कोंडवाड्यांपेक्षा भयंकर आहे. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात आहेत. त्यांना त्यांची स्वतःची हक्काची घरे मिळाली नाहीत. त्यामुळेही अनेक जण अशा धोकादायक इमारतीतून बाहेर पडायला तयार होत नाहीत. ठाण्यामध्येही वेगवेगळ्या चार प्रकारांतल्या ४४०७ इमारती धोकादायक आहेत. त्यातल्या सर्वाधिक धोकादायक इमारतींची संख्या ९६ आहे. या प्रत्येकाला ‘तोडी मिल फैटसी’सारखे कुठलेही नवे स्टार्टअप करायचे नाही किंवा ते आज जगत असलेल्या दुःखाचा कुठलाही आविष्कार त्यांना मांडायचा नाही. मात्र, स्वतःच्या हक्काच्या चांगल्या घरात जायचे आहे. त्याची शाश्वती देणारा एकही नेता आजपर्यंत या लोकांना भेटलेला नाही. मोडकळीस आलेल्या इमारती पाडल्याच पाहिजेत. मात्र तिथे राहणाऱ्या लोकांना टाइम बाउंड कार्यक्रम आखून स्वतःची घरे दिली पाहिजेत. नाहीतर ‘तोडी मिल फँटसी’ सारखी नाटके येतील. एसी नाट्यगृहात बसून आपण त्याचे कौतुक करू… आणि पुन्हा आपापल्या टॉवरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर हवे ते बघायला मोकळे होऊ.. हे सगळे अस्वस्थ करणारे आणि भयंकर आहे…
Comments