बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४
30 October 2024

बीएमसीत ईडीचा प्रवेश झाला! सहानुभूती कोणाला मिळणार?

अधून मधून / अतुल कुलकर्णी

नेतेमंडळींना नमस्कार

महाराष्ट्रात मान्सून निष्क्रिय झाला असला, तरी ईडी मात्र गेल्या काही दिवसांत सक्रिय झाली आहे. कधी ती महापालिकेचे तत्कालीन सहआयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरी पोहोचते, तर कधी थेट महापालिकेत. त्यामुळे मान्सूनपेक्षाही जोरदार चर्चा ईडीची सुरू आहे. संजीव जयस्वाल आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या घरावर ज्या पद्धतीने छापा टाकला, त्यावरून अख्खी आयएएस लॉबी अस्वस्थ झाल्याच्या बातम्या आहेत. तुम्हालाही त्या कळाल्या असतीलच… याचा अर्थ कोणी कसेही वागावे आणि ईडीने त्याकडे दुर्लक्ष करावे, असा होत नाही. मंत्रालयात काही अधिकाऱ्यांची बैठक झाल्याची बातमी आहे. अधिकारी धास्तावले आहेत. आम्ही सरकारी अधिकारी आहोत….. ..आम्ही कुठे पळून चाललेलो…आम्हाला चौकशीला बोलावले, तर आम्ही येणार नाही का… मात्र, अशा पद्धतीने घरी धाड टाकून तुम्ही काय सांगू इच्छिता… असे प्रश्न त्या बैठकीत उपस्थित झाल्याची खबरबात आहे. थोडक्यात, विरोध जयस्वाल यांच्याकडे ईडी पोहोचण्याचा नाही… तर ज्या पद्धतीने घरी धाड टाकली त्याला असल्याचा निष्कर्ष त्या रस्ता धरला. बैठकीतून निघाल्याचे वृत्त आहे.

या आधी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीने त्यांच्या कार्यालयात चौकशीला बोलावले होतेच ना, मग संजीव जयस्वाल यांनाही चौकशीला बोलवायचे, असा सूर त्या बैठकीतून निघाला, असे एक अधिकारी सांगत होते. आता जयस्वाल यांच्याकडे १०० कोटींची मालमत्ता सापडल्याच्या बातम्या आहेत. ही धाड का पडली, याच्याही कपोलकल्पित कथा मार्केटमध्ये जोरात आहेत. तुम्हा नेते मंडळींना त्या कळाव्यात म्हणून हा पत्र प्रपंच.

महाराष्ट्राच्या एका ज्येष्ठ नेत्याला असे घडू नये, असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याने हे घडवून आणले, असा बार पहिल्या ज्येष्ठ नेत्याच्या गोटातून फुटला आहे. तर दोघांनाही काहीच माहिती नव्हते, ईडीनेच थेट कारवाई केली, असाही एक धमाका हलक्या आवाजात होत आहे. या चर्चेपेक्षा वेगळी चर्चाही मार्केटमध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे आणि जयस्वाल यांचे चांगले संबंध आहेत. कोविड काळात जे काही घडले, त्यासाठी या माध्यमातून अनिल परब यांच्यावर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा आहे. तुम्ही म्हणाल, अनिल परबच का..? उद्या समजा परब यांचे नाव कोणी घेतले, तर त्यांच्यावर कारवाईचा मार्ग मोकळा होईल, असे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात.

अनिल परब हैं उद्धव ठाकरे शिवसेनेचे पडद्याआडचे मास्टरमाइंड आहेत. जवळपास ७० वॉर्डात ते त्यांचे कसब दाखवू शकतात. त्यामुळे त्यांना शांत बसवले की, बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, असा तर्क एक नेता तावातावाने मंत्रालयासमोरील गांधीजींच्या पुतळ्याजवळ उभे राहून दुसऱ्या नेत्याला सांगत होता. दुसरा नेता कदाचित भाजपशी संबंधित असावा. कारण तो सुद्धा तेवढ्याच तावातावाने, ‘आम्ही असे कोणावर अवलंबून नसतो. आमची तयारी किती झाली आहे, हे तुम्हाला माहिती नाही. आमच्याकडे मतदारसंघनिहाय जात, धर्म, स्त्री, पुरुष, तरुण, म्हातारे, भाषा यानुसार सगळी वर्गवारी तयार आहे. निवडणुका तर लागू द्या, मग बघा तुम्हाला नाही पळता भुई थोडी केली तर…’, असे ऐकवू लागला..! दोघांमधील वाद वाढत गेला. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघू लागले, ते लक्षात आल्यानंतर क्षणात दोघांनी महात्मा गांधीजींकडे पाठ करून आपापला रस्ता धरला.

आता ईडीमुळे मातोश्रीची सहानुभूती कमी न होता वाढत चालल्याचे सांगितले जाईल. मध्यंतरी एक सर्वेक्षण आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात लोकप्रिय, असे सांगितले गेले. त्यानंतर दुसरे सर्वेक्षण आले. त्यात शिंदे गटाला विधानसभेत २५ जागा मिळतील, असे दाखवले होते. आता सहानुभूती पुन्हा वाढली, तर या २५ जागा तरी येतील का? असे तिसरे सर्वेक्षण आल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. कोण, कोणासाठी, कुठे, कधी आणि का सर्वेक्षण करत आहेत, हे कळायला मार्ग नाही.

नेते हो, जाता जाता एक विनंती. राज्यभर पाऊस नाही… लोक त्रस्त आहेत… पेरलेलं बियाणे वाया जात आहे…. महागाईने कळस गाठला आहे… मुलांना नर्सरीच्या वर्गात टाकायचे, तर काही लाख रुपये डोनेशन मागितले जात आहे… आजारी पडलेल्या माणसाला वैद्यकीय उपचार परवडेनासे झाले आहेत. हे विषय तुमच्या फायलीत असतीलच, याची आम्हाला खात्री आहे. वेळ मिळाला तर ती फाइल आधी घ्या, एवढीच विनंती. बाकी तुमचे जसे चालले आहे, तसेच चालू द्या.

 

तुमचाच,

बाबूराव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *