चला, केबिन तोडू, नवे सोफे आणू, सगळे चकाचक करू!
अधून मधून / अतुल कुलकर्णी
आपण मंत्री झालात. आपल्याला आवडी-निवडीचे खाते मिळाले. झाले गेले गंगेला मिळाले… आता आपण लवकरात लवकर मंत्रिपदाचा पदभार घ्या. काही जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण काम सुरू केले नाही. विरोधक त्यावरून तुमच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. पण, तुम्ही चिंता करू नका. विरोधकांचे काम टीका करण्याचेच असते. आपण मंत्री होताच नागपूरचे अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनात मंत्री म्हणून काय करावे लागते, याचा अनुभव मिळावा, म्हणून आपण सगळे आठवडाभर बिन खात्याचे मंत्री राहिलात. केवढा हा त्याग. आपल्यावर थेट कुठलीही जबाबदारी आली नाही. तरीही, आपण कोणत्याही विभागाच्या, कुठल्याही प्रश्नावर सभागृहात उत्तरे दिली. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा दुखावटा जाहीर झाला. या काळात कोणी मंत्रिपद स्वीकारते का ? आपली दुःख विरोधकांना काय माहिती ?
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
आपल्याला काय करायचे होते?, आपण काय केले?, कशाची अपेक्षा होती?, काय मिळाले? याची आपल्यालाच टोटल लागत नाहीय. त्यात हे विरोधक टीका करत आहेत. पण, तुम्ही लक्ष देऊ नका. अजूनही प्रयत्न करा. एखादे खाते बदलून मिळू शकते का ते बघा. त्यासाठी देवाभाऊंचा धावा करा. तुमच्या जुन्या आठवणींचा संदर्भ द्या. देवाभाऊ पावले, तर चांगलेच आहे. नाही तर राग ठेवू नका, देवाभाऊ के पास देर हैं अंधेर नहीं. मी पुन्हा येईन, असे ते म्हणाले होते. आले ना परत. एकदा त्यांनी शब्द दिला, तर ते नक्की मदत करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला दुसरा कुठला पर्याय आहे का?
काहीजण कसे उत्साहाने कामाला लागले आहेत ते बघा. त्यांनी आपल्या मंत्री कार्यालयाची रचना बदलण्याचेही काम सुरू केले आहे. त्यासाठीच मंत्रालयात काही वास्तुतज्ज्ञ फिरत आहेत. या बाजूने खुर्ची ठेवा. त्या बाजूने व्हिझिटर्स बसवा. या बाजूला पत्रकारांना बसवा, म्हणजे आपल्या विरोधात बातम्या येणार नाहीत. अशा सूचना ते देत असल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाचे काही अधिकारी या वास्तुतज्ज्ञांना घेऊन येतात, अशी माहिती आहे. कोणत्या पद्धतीचे फर्निचर केले, म्हणजे मंत्री कार्यालय लाभदायक होईल, यासाठी ते दोघे अभ्यास करून सगळा रिपोर्ट देतील. त्यावर विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेल्या बिलावर चुपचाप सही करून टाका. तसेही ते पैसे तुमच्या खिशातून जाणार नाहीत.
जुन्या सोफ्यांना, नवीन कापड लावले की सोफे नवीन दिसतात. जुन्या खुर्च्यांना पॉलिश केले, कापड बदलले की, खुर्च्या नवीन दिसतात. मात्र, जुन्याच फर्निचरला नवीन केले आणि नव्याचे बिल लावले, असे विरोधक बोलतील. त्याकडे लक्ष देऊ नका. बांधकाम विभागाचे अधिकारी आणि विरोधक काय ते बघून घेतील. तुम्ही त्यात पडू नका. तुम्हाला जो पीए, पीएस हवा आहे, त्याचे नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठवताना सगळ्यात शेवटी ठेवा. पहिलेच नाव ठेवले, तर ते नाकारले जाण्याची शक्यता असते. चुकून मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्याला हव्या असणाऱ्या पीएसबद्दल विचारले, तर पटकन चांगले मत देऊ नका. नाहीतर तिकडून चटकन त्याचे नाव कट होईल. सगळा स्टाफ बदलला, म्हणून विरोधक नावे ठेवतील. कोणत्याही मंत्री कार्यालयाला इन्स्टिट्यूशनल मेमरी असते. तेथे काम करणाऱ्या ऑपरेटरला, शिपायाला तेथे येणारे पत्रकार, अधिकारी, नेते, बिल्डर माहिती असतात. त्यामुळे त्यांना बदलू नका, असे काहीजण सल्ले देतील. त्यांचे ऐकू नका. तुम्ही कोणाशी काय बोलता?, काय करता? ही माहिती त्यांनी विरोधकांना दिली, तर आपली पंचायत होईल. सगळे नवीन असले की, काही चुकले तरी नव्या माणसाच्या नावाने बिल फाडता येते किंवा मुद्दाम केलेल्या चुकाही नव्या माणसाच्या नावावर ढकलता येतात. त्याला ही मंत्री कार्यालयात राहायचे असते. त्यामुळे तो खाली मान घालून ऐकून घेतो. हे गुपित फक्त तुमच्या जवळच ठेवा. तुम्ही आपले आहात म्हणून तुम्हाला सांगितले!
आता तुमच्या विभागाचे अधिकारी तुम्हाला ब्रीफिंग करतील. एक किस्सा सांगून ठेवतो. असेच एक नेते मंत्री झाले. अधिकारी ब्रीफिंगला आले, तेव्हा त्यांनी थेट विषयाला हात घातला. ‘आपल्याला कुठून, कसे आणि किती प्रमाणात ‘गांधी’दर्शन होऊ शकते? हे पटकन सांगा. बाकीच्या गोष्टी नंतर बघू’, मंत्रिमहोदयांनी थेट विचारले. त्या अधिकाऱ्यानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांनी लगेच ‘गांधी’दर्शनाचे मार्ग सांगितले. त्या नेत्याची पुढची वर्षे आनंदात गेली. पुढे त्या नेत्याची एक सीडी ‘ईडी’कडे गेली. नेते हुशार होते, त्यांचा लगेच पक्षांतराचा सोहळा झाला. आता ते आनंदात आहेत. यातून तुम्हाला जो बोध घ्यायचा तो घ्या. नाहीतर तुम्हीच म्हणाल, एवढ्या जवळचे असून, तुम्ही या गोष्टी का सांगितल्या नाहीत. छान काम करा. आपल्या पुढच्या पिढ्यांना गांधी दर्शनाची गरज पडू नये, इतका ‘गांधी’विचार आत्मसात करा. आपल्याला खूप-खूप शुभेच्छा.
– आपलाच बाबूराव
Comments