एका आईची अस्वस्थ आत्मकथा…!
एका आईची अस्वस्थ आत्मकथा…!
– अतुल कुलकर्णी
काही वर्षापूर्वीची ही गोष्ट. पण आजही मनावर तितकीच खोलवर दडून बसलेली. प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलीग्राफीचे प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत भरले होते. सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. मी त्यावेळी तेथे होतो. अच्यूतनी केशरी रंगात ओम् हा शब्द एका मोठ्या कॅनव्हॉसवर चितारला होता. शंकर महादेवन आले, त्याच्या समोर उभे राहून कितीतरी वेळ तो ओम् पहात होते. नंतर ते त्याच कॅनव्हॉस शेजारी उभे राहून गाऊ लागले. माईक नव्हता… हॉलमध्ये फक्त श्वासांचे आवाज ऐकू येत होते… शंकरनी मोबाईलवर पेटीचे सूर लावले आणि
तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज…
दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज…
हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज…
कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती,
अमृतकण परि होऊनी, अणुरेणु उजळती…
तेजातच जनन – मरण, तेजातच नवीन साज,
हे दिनमणी व्योमराज….
तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज…
शंकर गाता गाता थांबले… सगळ्या हॉलभर त्यांचे सुरु रेंगाळत होते… काही क्षणांनी सगळे भानावर आले तेव्हा कळाले की गाणं संपलयं… तो अनुभव अलौकिक होता. मनाला तृप्त करणारा जसा होता तसाच तो आपण किती क्षुल्लक आहोत हे सांगणाराही होता… खूप काही होतं त्या अनुभवात…
हा सगळा प्रसंग मला परवा आठवला तो ‘ओडिसी’ या चित्रप्रदर्शनाच्यावेळी…. ओडिसी म्हणजे प्रवास… वकिली करता करता, कोर्टरुममधून आपल्या अशिलाची बाजू मांडता मांडता ब्रशच्या सहाय्याने रंगाची बाजू कोऱ्या कॅनव्हॉसवर मांडणाऱ्या चित्रकार नितीन पोतदार यांचा हा प्रवास आहे. तसाच तो गावाकडच्या धूर सोडत धावणाऱ्या रेल्वेगाडीपासून ते आपलं जग व्यापणाऱ्या मोनो, मेट्रो या रेल्वेच्या अनोख्या प्रवासाचे अनुभवविश्व सदाशिव कुलकर्णी यांनी उभं केलयं… अनुभवाचे गाठोडे जवळ असले की जगण्यात जी सफाई येते त्या सफाईदार प्रवासाचा आलेख आप्पा गडकरींच्या चित्रांमधून दिसतो आणि स्पेशल चाईल्डची आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका बजावताना होणाऱ्या घुसमटीचा प्रवास मांडलाय दीपाली वैद्य यांनी. या चौघांच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरीत २५ जून पर्यंत भरलेले आहे. (आपण जाऊन पाहू शकता)
वरती लिहीलेला प्रसंग आवर्जून आठवला असं म्हणालो ते दीपाली वैद्य यांच्या चित्रांना पाहून. दीपाली मूळच्या ठाण्याच्या. एका खाजगी संस्थेत त्या नोकरी करतात. फिलॉसॉफी मधून बीए आणि सोशियॉलॉजीमधून एमए करत असतानाच त्यांच्यात चित्रांची आवड निर्माण झालेली. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव सानिका. ती अडीच वर्षाची असताना त्यांना कळालं की ती ‘स्पेशल चाईल्ड’ आहे. काही वर्षे तिला वाढवण्यात गेली. या काळात कोणत्याही मध्यमवर्गीय घरात जे होतं तेच इथंही झालं. गेल्या तीन वर्षापासून सानिकाची सगळी जबाबदारी दीपालीकडेच आली. तेव्हापासून दीपालीच्या चित्रांची भाषा बदलली…
या प्रदर्शनात त्यांची १५ पेन्टींग्ज आहेत. आधी ती पहाताना मला त्यात काही तरी सांगायचं राहून गेलयं असं सारखं वाटत होतं. न राहून मी त्यांना विचारलंही… त्यावर त्यांनी त्यांची ही सगळी आपबिती सांगितली. त्यानंतर ती चित्र समजायला काहीच वेळ लागला नाही. एखाद्या शब्दामुळे अडलेल्या शब्दकोड्याचा एक शब्द सापडावा आणि नंतर ते कोडं लगेच सुटत जावं तसं काहीसं झालं. ही चित्रं साधी सोपी नाहीत. यात एका आईचं अस्वस्थ मन आहे. आपल्या ‘स्पेशल चाईल्ड’ ला मोठं करतानाचे त्रास आहेत, अस्वस्थता आहे, कोणाशी तरी आपण मन मोकळं करायला जावं आणि बोलता बोलता आपणच गप्प बसून जावं… ती जी तगमग आहे ती या चित्रांमध्ये पावलोपावली ठसठशीतपणे समोर येताना दिसते…
एक चित्र आहे ज्यात तीन फिगर आहेत. एक धूसर आहे, एकीच्या सर्वांगाला काटेरी झालर आहे आणि दुसरी काळी पण ठाम… आयुष्यात आलेल्या प्रत्येकाच्या भूमिका दीपालींनी एकही शब्द न वापरता मांडल्या आहेत. एका चित्रात एक काळी जाड रेघ… कोठूनतरी सुरु होते… कुठेतरी जाऊन थांबते पण त्या प्रवासात दुसरी एक रेषा मधेच येते आणि पहिल्या रेषेची लय बिघडवून निघूनही जाते… मात्र या प्रवासात पहिल्या रेषेच्या मधे एक आश्वासक लाल रंगाचा ठिपका कायम आहे… जगण्याची आशा त्या एका ठिपक्याने कायम ठेवलीय…
खेळण्यातली एक बाहुली असते. जम्पींग डॉल म्हणतात तिला. कितीही, कसेही ठोसे मारले तरी ती परत मूळ जागेवर येऊन थांबते… इथेही एका चित्रात एक जम्पींग डॉल आहे, पण तिला बसलेल्या ठोश्याने ती सैरभैर झालीय… खाली अनोळखी चेहऱ्यांचा महासागर आहे, ती त्यावर पडते की काय असे वाटत असताना तिला कोण सावरणार हा प्रश्न आहे. त्यावेळी दोन रेषा समांतर जाताना दिसतात पण त्यातली एक मधेच लूप्त होते… आयुष्यातले रंग संपल्यासारखी…
या सगळ्या १५ चित्रांची एक खूप वेगळी गोष्ट आहे, म्हटले तर प्रत्येकाची वेगळी गोष्ट किंवा म्हणाल तर १५ चित्रांची मिळून एक गोष्ट… दीपालींनी जे.जे. आर्टस् स्कूलचे नाव फक्त जाता येताच वाचलेले… कोणतेही शास्त्रशुध्द शिक्षण न घेता त्यांनी ही जी काही अनुभव चित्रं रेखाटली आहेत ती कमालीची आहेत. आपल्या मुलीला वाढवताना जे काही अनुभवले त्याला त्यांनी चित्ररुप देऊ केलं. त्यामुळं ही सगळी चित्र म्हणजे या मायलेकीची आत्मकथाच आहे असं म्हटलं तर…?
– अतुल कुलकर्णी
वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
www.atulkulkarni.in
Comments