शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४
27 December 2024

सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपल काय?

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

 

गेल्या आठवड्यात बोरिवलीत एक दुर्दैवी घटना घडली. ७८ वर्षांच्या एक म्हाताऱ्या आजी, हृदयविकाराच्या धक्क्याने घरात गतप्राण झाल्या. ८० वर्षांचे त्यांचे पती. त्यांना अर्धांगवायूचा आजार आणि संवेदनाच कमी झाल्यामुळे आपली आयुष्यभराची जोडीदार शेजारी मरून पडल्याचे दोन दिवस त्यांना कळाले नाही. शेजारी राहणाऱ्या बाई आल्या. त्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली म्हणून त्यांनी पोलिसांना बोलावले. तेव्हा झालेली घटना कळाली. अजस्त्र पसरलेल्या, दीड कोटी लोकसंख्या असणाऱ्या मुंबई शहराचे हे विदारक वास्तव आहे. मुंबईत चाळ संस्कृती होती. तेव्हा लोक एकमेकांच्या घरात डोकावून जायचे. खायचे पदार्थ एकमेकांकडे पाठवले जायचे. चाळीची जागा टॉवर्सनी घेतली आणि एकाकीपणाला सुरुवात झाली. वाढती महागाई, मुलांना वाढविण्यासाठी सोसावा लागणारा आर्थिक भार झेपेनासा झाला. नवरा, बायको, मुलगा, मुलगी असे चौकोनी कुटुंब वाढीस लागले. हळूहळू अनेक कुटुंब एकाच अपत्यावर समाधानी राहू लागले. त्रिकोणी कुटुंबात लोक आपला आनंद शोधू लागले. मुलं मोठी होऊ लागली तशी ती आपापल्या कामधंद्याला लागली. काहींची मुलं परदेशात गेली. ती तिकडच्याच संस्कृतीत रमून गेली. म्हातारा, म्हातारी इकडेच राहिले. त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवला, आठवड्यातून दोनदा फोन केला की आपले कर्तव्य संपले, असे मुलांना वाटू लागले. त्यातून या शहराचे एकाकीपण दिवसेंदिवस जीवघेणे होत गेले. बोरिवलीची घटना याच एकाकीपणाचा भयावह आरसा आहे.

मुंबईत पोलिसांच्या रेकॉर्डवर आजमितीला ३,६०० लोक एकाकी जीवन जगत आहेत. कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, म्हणून आलेले एकाकीपण आहे. अशा कुटुंबांची जबाबदारी घ्यायची कोणी ?, असे प्रश्न निर्माण झाले. परदेशात राहणाऱ्या मुलांनी स्वतःच्या आई-वडिलांसाठी ठेवलेल्या केअरटेकरनेच म्हातारा, म्हातारींना मारून त्यांची इस्टेट हडप करण्याचे प्रकार घडू लागले. तेव्हा अशा वृद्ध नातेवाईकांची जबाबदारी मुंबई पोलिसांवर येऊन पडली. पोलिस तरी काय काय करणार? मुंबईतल्या अशा एकाकी कुटुंबांच्या मदतीला पोलिस धावून जातात. त्याच्या ना कधी बातम्या होतात, ना कधी त्याचे फोटो छापून येतात… मध्यंतरी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त सत्यनारायण यांनी अशा वृद्धांना आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणले. त्यांच्याशी संवाद साधला. आपल्याला मानसन्मानाने कोणी बोलावत आहे… कौतुक करत आहे… गप्पा मारत आहे… फोटो काढून घेत आहे… ही जाणीव त्या वृद्धांच्या आयुष्यात जगण्याचे काही दिवस नक्कीच वाढवून गेली असेल.

पोलिस दलात एक आजी सगळ्यांच्या मम्मी झाल्या आहेत. त्या स्वतः उच्चशिक्षित. त्यांना दोन मुले, एक मुलगी असा परिवार. पतीचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी कष्टाने आपल्या मुलांना वाढवले. केमिकल इंजिनियर, एमबीए केले. मोठा मुलगा व मुलगी नोकरीसाठी अमेरिकेत गेले. तिसरा मुलगा स्वतःच्या बायकोसोबत बंगळुरूला गेला. सगळे आपापली मुलं वाढवण्यात मग्न झाले. ज्या आईने आपल्याला वाढवले त्या आईलाच हे तिघे विसरून गेले. हा धक्का त्या मातेला सहन झाला नाही. स्वतःचा भरलेला परिवार परका झाला, हे पाहून त्यांना गळ्याच्या आजाराने ग्रासले. आता बोलता येत नाही. त्यांच्या मदतीला माटुंगा पोलिस धावून आले. काहीही मदत लागली की, त्या माटुंगा पोलिस स्टेशनला फोन लावतात. फोनसमोर घंटी वाजवतात. पोलिसांना लगेच कळते की, मम्मीला मदतीची गरज आहे. पोलिस त्यांच्यासाठी धावून जातात. आपल्या पोरांनी बाजूला लोटलेल्या या मम्मीला पोलिस दलातील प्रत्येक शिपाई स्वतःच्या आईसारखा सांभाळतो.

बोरिवलीच्या घटनेतही कस्तुरबा पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्या वृद्ध दांपत्याच्या घरी जाऊन आले होते. त्यांना काही मदत हवी का, विचारून आले होते; मात्र त्यानंतर ही घटना घडली. पोलिसांचा राऊंड दर सात दिवसांनी होतो. मधल्या सात दिवसांत त्या म्हाताऱ्या आजीला तिच्या पोटच्या मुलीने फोन केला की नाही ? केला असेल आणि आपली आई फोन उचलत नाही, हे कळाल्यानंतर तिने काही प्रयत्न केले की नाही ? याची उत्तरे आता मिळून काय उपयोग..? मुंबईत मोठमोठे टॉवर्स आले. एकाच टॉवरमध्ये एका मजल्यावर कोणाचे निधन झालेले असते. दुसऱ्या मजल्यावर कोणाच्या घरी पार्टी, तर आणखी कुठल्या मजल्यावर कोणी स्वतःचा वाढदिवस साजरा करत असतो. हे सगळे एकाच दिवशी, एकाच बिल्डिंगमध्ये घडते. एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची आपली संस्कृती हे शहर हळूहळू विसरत चालले की काय असे वाटावे, इतपत भयानक स्थिती आहे. मुंबईत एकाकी व्यक्ती किती आहेत, याची अधिकृत आकडेवारी गोळा करण्याचा प्रयत्न सरकारने कधी केला नाही. पोलिसांना जेवढे लोक एकाकी असल्याचे समजले त्यांना गोळ्या, औषध आणून देण्यापासून ते त्यांचे आजारपण, दवाखान्यापर्यंतच्या गोष्टी पोलिस करतात. माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते हे करत असतीलही. त्यासाठी त्यांना सलाम..! मात्र हे त्यांचे काम आहे का..? समाज म्हणून आमची काही जबाबदारी नाही का? ज्या बिल्डिंगमध्ये आपण वर्षानुवर्षे राहतो, त्या ठिकाणी आजूबाजूला काय घडते याची माहिती जर आपण ठेवत नसू तर आपली माहिती कोण ठेवणार..? उद्या आपल्याला काही लागले तर कोण मदतीला धावून येणार..? विचार करा. या महानगराचे एकाकीपण घालवण्यासाठी आपण काही हातभार लावू शकत असू तर, तो लावण्याचा प्रयत्न करा… अन्यथा या एकटेपणाच्या गर्दीत एक दिवस आपणही सामील होऊन जाऊ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *