बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

कुठे गेल्या त्या सगळ्या हिरॉईन…
ज्यांना दीदींनी आवाज दिला होता…!

अतुल कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई – लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या जोरावर अनेक अभिनेत्रींंना नालौकिक मिळाला. त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे अनेक अभिनेत्रींची कारकिर्द बहरली, फुलली. आपल्यासाठी एक गाणे दीदींनी गावे म्हणून वाट्टेल ते करण्यासाठी तयार होणा-या अनेक अभिनेत्रींनी दीदींच्या अंत्यसंस्कार आणि अंतीम दर्शनाकडे मात्र पाठ फिरवली. दिल दिवाना बिन सजना के… या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या भाग्यश्रीने दिदींच्या घरी भेट दिली. उर्मिला मातोंडकर, विद्या बालन, श्रध्दा कपूर आल्या. मात्र बाकीच्या आल्याच नाहीत याची चर्चा प्रत्येकजण करत होता.
अमिताभ बच्चन स्वत:च्या मुलीसह आले. जया बच्चन कोरोनामुळे आजारी आहेत. एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रीत झाले आहे हे पटकन आठवतही नाही मात्र हे गाणे लता मंगेशकर यांचे आहे असे सांगणारे लाखो सापडतील. अनेक अभिनेत्रींचे नाव केवळ गाण्यामुळे इतिहासात लिहीले गेले. अमूक एखाद्या अभिनयासाठी लक्षात राहीलेल्या अभिनेत्री किती आणि गाण्यासाठी लक्षात राहीलेल्या किती? असा प्रश्न केला तर फार कमी अभिनेत्रींची नावं समोर येतील. हे केवळ लता मंगेशकर यांच्या जादूभ-या अनवट सुरावटींमुळे शक्य झाले. ऐकेका गाण्यासाठी त्यावेळी संगीतकार आणि गायक जी मेहनत घेत होते त्यामुळे हे साध्य झाले होते.
दीदी तेरा देवर दिवाना, दिल तो पागल है, अशी सुंदर गाणी माधुरी दीक्षितला मिळाली. तर मेरे ख्वाबो में जो आये… तुझे देखा तो ये जाना सनम या गाण्यांनी काजोलची कारकिर्द बहरली. काजोलचे नाव झाले. आजा पिया तोहे प्यार दूं… गाण्यामुळे आश पारेख, कांटोंसे खींच के ये आँचल गाण्यासाठी वहिदा रहेमान, होठों में ऐसी बात में दबाके चली आयी या गाण्यामुळे वैजयंतीमाला, नाम गूम जायेगा गाण्यासाठी हेमा मालिनी लक्षात रहाते.
गापूजी गापूजी गमगम – पुनम ढिंल्लोन, आ जाने जा, इस दुनिया में जीना हो तो – हेलन, नीला आसमां सो गया…, तेरे बीना जिया जाये ना…, आजकल पाँव जमीं पर… – रेखा, शीशा हो या दिल हो – रीना रॉय, रिमझिम गिरे सावन.., मुझे छु रही है – मौसमी चॅटर्जी, ए री पवन ढुंढे तुझे मेरा मन – राखी अशी कितीतरी गाणी आणि अभिनेत्रींची नावे देता येतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यात व्यस्त असणारी व्यक्ती. ते आवर्जून आले. मात्र ज्यांच्यासाठी लता मंगेशकर यांनी स्वत:चा आवाज दिला त्यातील एकाही अभिनेत्रीला रविवारी लता मंगेशकर यांच्या अंतीम दर्शनाला यावे वाटले नाही. यातल्या अनेक अभिनेत्री विविध चॅनलवर चालणा-या गाण्यांच्या रिएलिटी शो अनेकदा दिसल्या. तिकडे जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळतो त्यांना इकडे मात्र फिरकावे वाटले नाही यासारखे दुर्देव कोणते अशा शब्दात अनेकांनी आपली खंत बोलून दाखवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *