बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकींच्या गोळ्या झाडून हत्या

मुंबई/अतुल कुलकर्णी

माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्वमधील खेरवाडीत सिद्दिकी यांचा मुलगा आ. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते. त्याच वेळी बाबा सिद्दिकींवर तीन जणांनी गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या छातीला लागली. त्यानंतर सिद्दिकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

दोन बंदुकींमधून सिद्दिकी यांच्यावर सव्वानऊच्या सुमारास चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या सहकाऱ्याच्या पायावर गोळी लागली आहे. घटनेनंतर झिशान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता संजय दत्त, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तातडीने रुग्णालयात पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनेची माहिती घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात बाबा सिद्दिकी हजर होते. त्यांना कोणापासून धोका होता वगैरे माहिती त्यांनी दिली नव्हती, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.

कायदा कोणी हातात घेऊ नये. गँगवाॅरने डोके वर काढता कामा नये. मुंबई पोलिस सक्षम आहेत. तिघांनी हा हल्ला केला. एक हल्लेखोर हरयाणा आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. दाेघांना अटक केली आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

बिश्नोई गँग कनेक्शन? बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे खास मित्र होते. त्यामुळे या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचे काही लागेबांधे आहेत का, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.

अलिकडील गोळीबाराच्या घटना -भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. -उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. -अभिनेता सलमान खान यांच्या घरावर लॉरेन बिष्णोई गँगकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. -काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सचिन मुन्ना कुर्मी यांच्यावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

नगरसेवक ते राज्यमंत्री -१९९३ आणि १९९८ मध्ये सलग दोन वेळा ते महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढविली. २००० मध्ये त्यांच्याकडे मुंबई म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. २००४ मध्ये ते अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार विभागाचे राज्यमंत्री होते.

२०१४ मध्ये काँग्रेसने त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तर २०१९ मध्ये त्यांचा समावेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळात करण्यात आला होता. मात्र, ८ फेब्रुवारी रोजी ते काँग्रेस साेडून अजित पवार गटात गेले हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *