बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

दहा दिवस राबणाऱ्या हजारोंच्या श्रमाला सलाम..!
सफाई कामगारांपासून ते आयुक्तांपर्यंत : सगळे महामुंबईच्या सेवेत

मुंबई डायरी / अतुल कुलकर्णी

मुंबई : दीड दिवसाचे गणपती विसर्जन मुंबई, ठाणे नवी मुंबई परिसरात शांततेत पार पडले. एकट्या मुंबईत दीड दिवसाचे जवळपास एक लाख गणपती विसर्जित झाले. यानिमित्ताने लाखो लोक ठिकठिकाणी गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले. प्रत्येकाने शांततेत विसर्जन केले. गणपती उत्सव साजरा केल्याचा आनंद घेऊन लोक आपापल्या घरी गेले. मात्र पडद्याआड अखंडपणे काम करणारे मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेचे हजारो कर्मचारी विसर्जनानंतर कुठेही भंगलेली मूर्ती किंवा निर्माल्याचे ढीग दिसू नयेत यासाठी २४ तास कष्ट करत आहेत.

या मेहनत करणाऱ्या हजारो हातांना गणपती बाप्पाने आशीर्वाद दिला पाहिजे. आमचे काम म्हणजे ‘थँकलेस जॉब’ आहे. कुठे काही गडबड झाली तर मात्र सगळ्यांच्या टीकेचे बाण आमच्या दिशेने येतील, अशी भावना अधिकाऱ्यांमध्ये असते. मुंबईमध्ये दरवर्षी हजारो गणपतीचे विसर्जन होते. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहू अशा अनेक भागात हजारो, लाखो लोक समुद्रात गणपतीचे विसर्जन करतात. मोठ्या गणेश मूर्तींसाठी तेवढेच मोठे तराफे बनवले जातात. चौपाटीवरील वाळूत लोखंडी प्लेट टाकून मोठे मंडप उभे केले जातात या कामात आजपर्यंत कधीही कुचराई झाली नाही आणि सुदैवाने कसलीही दुर्घटना घडली नाही.

गणपतीचे विसर्जन करताना भाविक जमलेले निर्माल्य घेऊन येतात. ते उचलण्यासाठी ३५० पेक्षा जास्त गाड्या मुंबईत सतत काम करत असतात. दहा दिवसात गोळा होणाऱ्या निर्माल्या मधून ५,५०० किलो खत तयार होते. यावरून किती निर्माल्य जमा होत असेल याचा अंदाज येतो. एकट्या मुंबई महापालिकेचे कंत्राटी आणि इतर मिळून ६ हजारापेक्षा जास्त कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करतात. त्याशिवाय वैद्यकीय अधिकारी, विद्युत विभाग, जंतुनाशक फवारणी करणारे लोक, फायर ब्रिगेड, मेंटेनन्स विभाग, मुंबई महापालिका मुख्यालयात आपत्कालीन कक्षात काम करणारे कर्मचारी, २४ वॉर्डांचे परिमंडळ उपायुक्त, आणि त्यांच्यासोबतचे जवळपास १० ते १५ हजार अधिकारी – कर्मचारी या दहा दिवसात काम करत राहतात. त्याशिवाय ‘एनडीआरएफ’ची टीम देखील मुंबईच्या मदतीला तैनात असते.


सातत्याने जागरूकता निर्माण केली असली तरी पीओपीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर अजूनही बसवल्या जातात. त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. अशा मूर्ती समुद्रातही विसर्जित केल्या जातात. ओहोटीच्या काळात जेव्हा अशा मूर्ती किनाऱ्यावर येतात, तेव्हा त्यातून नको ती परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून किनाऱ्यावर आलेल्या मूर्ती एकत्र करून समुद्रात खोलवर विसर्जित केल्या जातात.

हे सगळे वाचायला चांगले वाटत असले तरी, या काळात अहोरात्र काम करणारे कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कामगार मुंबईला स्वच्छ ठेवण्यासोबत या महामुंबईत शांतता राखत आले आहेत. गणपती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले की श्रेय घेणारे अनेक जण समोर येतात. पण पडद्याआड काम करणाऱ्या या हजारो हातांची आठवण कधीच कोणी काढत नाही. म्हणूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिकांमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *