
मुंबई सुरक्षित कशी? सरकार बदललंय, हे दाखवून देण्याची हीच योग्य वेळ!
संपादकीय / अतुल कुलकर्णी
मावळत्या वर्षात बाबा सिद्दिकी यांचा वांद्रे परिसरात खून झाला. यावर्षी जानेवारीचे पंधरा दिवस पूर्ण झाले नाहीत तोच अभिनेत्री पूनम धिल्लोन यांच्या घरी चोरी झाली. सैफ अली खान यांनी चोरट्याला एक कोटी रुपये दिले नाहीत म्हणून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मार्च २०२३ मध्ये शाहरूख खान यांच्या बंगल्यावर दोन तरुण थेट तिसऱ्या मजल्यापर्यंत गेले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मे २०२३ मध्ये सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या खार येथील घरातून दागिन्यांची चोरी करण्यात आली. जून २०२४ मध्ये बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयावर दरोडा टाकत कैदी पसार झाले.
काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. मुंबईत गेल्या ११ महिन्यांत जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याच्या ४८,३४३ घटना घडल्या. याच कालावधीत १०१ लोकांच्या हत्या झाल्या. २८३ जणांच्या हत्येचा प्रयत्न झाला. एकेकाळी स्कॉटलंड यार्ड पोलिसांची ज्या मुंबई पोलिस दलासोबत तुलना व्हायची त्या पोलिस दलाचे हे भीषण वास्तव आहे. मुंबईत पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त असे दोन प्रमुख अधिकारी मुंबईसाठी आहेत. तरीही अशा घटना थांबलेल्या नाहीत. असंख्य अधिकारी अनेक वर्षे मुंबईतच ठाण मांडून आहेत. मुंबईच्या बाहेर त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. असे असतानाही मुंबईत त्यांचे खबऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे फेल गेले आहे. आपल्याला क्रीम पोस्टिंग कशी मिळेल यासाठीच मधल्या काही काळात पोलिस दलात मोठे लॉबिंग झाले.
काही जागांसाठी करोडो रुपयांचे व्यवहार झाले. जो अधिकारी कोट्यवधी रुपये देऊन एखादी पोस्ट मिळवतो तो त्या पदावर निष्ठेने काम करेल अशी अपेक्षा करणेच मूर्खपणाचे आहे. डान्स बारवर बंदी असताना मुंबईत राजरोस डान्स बार सुरू आहेत. ड्रग्ज, नाफ्ता या संदर्भात मोठमोठे आर्थिक व्यवहार होत आहेत. यासाठीचे एक मोठे नेटवर्क मुंबई पोलिस दलात निर्माण झाले आहे. किती डीसीपी नाइट राउंडला स्वतः जातात? किती डीसीपी सामान्य नागरिकांचे फोन घेतात? या प्रश्नाचा मुख्यमंत्र्यांनीच एकदाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. सामान्य माणसाला पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्याचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, याची खात्री एकही पोलिस स्टेशन देऊ शकत नाही.
फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रार दाखल करून घेण्यासाठी सामान्य नागरिकांना दोन-दोन महिने लागतात. प्रत्येक गोष्टीत वरून फोन आल्याशिवाय खालची यंत्रणा हलत नाही, ही परिस्थिती कधी बदलणार याचे उत्तर मुंबईच्या दोन्ही पोलिस आयुक्तांनी दिले पाहिजे. सैफ अली खानवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ज्या इमारतीत चोर शिरला तिथे कसलीही सुरक्षा यंत्रणा नव्हती. सैफच्या घरात जाण्यासाठी स्वतंत्र लिफ्ट होती. मग चोर तिथे गेला कसा? यामागे दुसरे काही कारण आहे का?.. याची उत्तरे संशयकल्लोळ वाढण्याआधीच पोलिसांनी द्यायला हवीत. जेवढा दोष पोलिसांचा आहे, तेवढाच मुंबईतल्या अनेक बड्या सोसायट्यांचा आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधून सुरक्षारक्षक होण्यासाठी लोंढेच्या लोंढे येतात. स्टेशनवर उतरताच त्यांना सुरक्षारक्षकाचा गणवेश मिळतो.
कुठे नोकरी करायची हे सांगितले जाते. ज्या बिल्डिंगमध्ये नोकरी त्याच ठिकाणी हे लोक राहतात. तिथेच जेवण बनवतात. तिथेच झोपतात. वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय नेते अशा सुरक्षा एजन्सीज चालवत आहेत. सुरक्षारक्षक म्हणून येणाऱ्यांची कसलीही राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी तपासली जात नाही. पोलिसही कधी त्यांची तपासणी करत नाहीत. मुंबईत होणाऱ्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नेहमी परप्रांतीय सुरक्षारक्षकच का असतात? असा प्रश्न कधीही पोलिसांना पडलेला नाही. मुख्यमंत्र्यांनीच आता वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडून बसलेल्या पोलिस दलात समूळ बदल करण्याची गरज आहे.
अनेक चांगले अधिकारी कधीच मुंबईत येत नाहीत. हे थांबवायचे असेल तर मुंबई पोलिस दल ढवळून काढावे लागेल. दुसरीकडे मुंबईतल्या सोसायटीच्या सुरक्षेसाठी कठोर नियमही करावे लागतील. रस्त्यावर दबा धरून बसल्यासारखे वाहतूक पोलीस एका कोपऱ्यात उभे राहतात. येणाऱ्या दुचाकी स्वाराकडून चिरीमिरी घेतात. तिथे मोठ्या पदावरचे अधिकारी काय करत असतील याचाही कधीतरी सरकारने विचार करावा. सरकार बदलले आहे, हे दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.
Comments