
ऑक्सीजनची मागणी चौपट वाढली
रुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सीजनच्या मागणीत अचानक चौपट वाढ झाली असून त्यासाठी ‘हातातोंडाशी घास’ अशी सरकारची अवस्था झाली आहे. जरा रुग्ण वाढले आणि ऑक्सिजन पुरवठ्याची अवस्था बिकट झाली, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रुग्णांना ऑक्सीजनचे प्राधान्य द्या असे राज्य सरकारचे आदेश काढल्यामुळे त्याचा परिणाम उद्योगावर होत आहे तो वेगळाच.
राज्यात दररोज १२०० मेट्रीक टन ऑक्सीजन तयार होतो. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी १५० ते २०० मेट्रीक टन ऑक्सीजन लागतो पण कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज ७०० मेट्रीक टनापर्यंत वाढली आहे. गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढले होते त्यावेळी ही मागणी ६०० मेट्रीक टन पर्यंत गेली होती, ती यावेळी आणखी वाढली आहे असे सांगून जन आरोग्य योजनेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, जर रुग्ण संख्या वाढली आणि रुग्णांना ऑक्सीजनची गरज पडू लागली तर परिस्थिती अडचणीची होऊ शकते.
राज्यात ऑक्सीजन बनवणारे चार ते पाच प्रमुख उत्पादक आहेत, तर ५० च्या आसपास बॉटलिंग प्लॅन्ट आहेत. ते सगळे पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आपल्याकडे स्टील प्लॅन्ट, केमिकल कंपन्या, फोर्जिंग प्लॅन्ट अशा अनेक ठिकाणी ऑक्सीजनची गरज आहे. पण त्या ठिकाणी प्राधान्य न देता हॉस्पीटलसाठी ऑक्सीजन देणे सुरु झाले आहे. त्यामुळे या कंपन्या अडचणीत येऊ शकतात. परिणामी या ठिकाणी काम करणारे कर्मचारी देखील अडचणीत सापडतील असेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान नागपूर बुटीबोरी येथील एक प्लॅन्ट तांत्रिक कारणासाठी बंद ठेवावा लागला. तेथे औरंगाबाद किंवा अन्य कोठूनही ऑक्सीजन पाठवायचा असेल तर त्यात वेळ खूप जाणार होता, शेवटी सरकारने धावपळ करुन मध्यप्रदेशातील भिलाई येथून ४०० मेट्रीक टन ऑक्सीजनची व्यवस्था केली.
मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते जर लोक असेच बेशिस्तपणे बिना मास्कचे फिरत राहीले आणि रुग्णांची संख्या अशीच वाढती राहीली तर सरकारला ऑक्सीजन मिळवणे देखील महाकठिण होऊ शकते. राज्यात अनेक रुग्णांना ऑक्सीजनची गरज आहे, शिवाय अनेक रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. कोरोनाशिवायचे रुग्ण देखील आहेतच. त्यामुळे या अशा संकटकाळी जनतेने शिस्त पाळली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.
Comments