गुरुवार, २३ जानेवारी २०२५
23 January 2025

लालबाग की सिद्धिविनायक,
तू नेमका आहेस तरी कुठे..?

अधून मधून / अतुल कुलकर्णी

प्रिय गणपती बाप्पा,
तू नेमका आहेस तरी कुठे..? दहा दिवसाचे तुझे आगमन… पण या दहा दिवसात हा प्रश्न शंभर वेळा आम्हाला पडलाय… आम्ही उत्साहाने तुला घरी आणतो. कोणी कुंडीतल्या मातीपासून तुला आकार देतो… ज्याला जमेल तसे तुझे रूप आकाराला आम्ही आकाराला आणतो. जगातला तू एकमेव असा देव आहेस ज्याला त्याचे भक्त त्यांना हवा तसा आकार, रंग, रूप देतात… आणि तू देखील तितक्याच आनंदाने त्या रंग, रूपात खुलून दिसतोस. म्हणून तर सारे जग तुझ्यावर जिवापाड प्रेम करतं..! दुःख बाजूला सारून आनंदाने तुझं स्वागत करतो. मित्र, पाहुणे, आप्तेष्ट सगळ्यांना बोलावून तुझ्यासोबत आनंद साजरा करण्याची बातच न्यारी आहे. तुझ्या दर्शनाला येणाऱ्या हजारो लाखो भाविकांना तू कधीही त्रास होईल अशी वातावरण निर्मिती करत नाहीस. श्रद्धेने येणारे भक्त तितक्याच शिस्तीत तुझ्या दर्शनाला येतात. तुझ्या चरणी लीन होतात. तू देखील त्यांच्या मनोकामना पूर्ण करतोस. त्यावेळी तू कोणाच्या घरात असतोस… कोणाच्या मंडपात असतोस… छोट्याशा कॉलनीत असतोस… चिमुकल्यांच्या बाल गणेश मंडळातही तू असतोस ना… भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी अमुक ठिकाणीच येऊन मला भेटा, असा तुझा आग्रह कधीच नसतो. हे दहा दिवस वगळले तर अष्टविनायकाच्या निमित्ताने आठ ठिकाणी तू कायम आहेस… पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात आहेस…. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात आहेस… तरी देखील तुझ्या भक्तांनी तुझ्या नावावर काही ठिकाणी मांडलेला बाजार आता सहन होत नाही…

आस्थेने तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तुझे कार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्यांनी धक्काबुक्की करणे सुरू केले आहे. अनेकांनी तुला अमुक तमुक राजा अशा पदव्या दिल्या आहेत… त्यातल्या त्यात लालबागचा राजा ही तुझी पदवी गेल्या काही वर्षात अचानक उदयाला आली. एखाद्या कार्पोरेट कंपनीचा इव्हेंट असावा अशा पद्धतीने तुझ्या दर्शनाला आधी फिल्मी सितारे बोलावले गेले. त्यांच्यापाठोपाठ राजकारणी आले. तुझी भव्य मूर्ती उभी करून काहींनी लालबागच्या राजाकडे आल्यानंतरच गणपती बाप्पा पावतो अशी तुझी प्रतिमा तयार केली. तुझ्या दर्शनाला जशी गर्दी वाढू लागली तसे राजकारणी आणि चित्रपट सितारे देखील स्वतःच्या प्रमोशनसाठी तिथे येऊ लागले. ज्याचा चित्रपट प्रदर्शित होणार तो त्या चित्रपटाचे नायक नायिका तिथे येऊ लागले. चॅनलवाले देखील दिवसभर तुझे दर्शन दाखवू लागले. भोळी भाबडी जनता नेहमीच अनुकरणप्रिय असते. तुझ्या दर्शनाला सगळी बडी मंडळी येतात हे पाहून त्यांना देखील तुझ्या दर्शनाला यावे वाटू लागले. या सगळ्यात तुझ्या नावाने स्वतःचे दुकान चालवणाऱ्या ठराविक कार्यकर्त्यांनी श्रद्धेचा बाजारच मांडला. त्यातून दर्शनाला येणाऱ्या महिला, लहान मुलं यांच्यावर धक्काबुक्की होऊ लागली. असभ्य वर्तन होऊ लागले. वडीलधारी, म्हातारी माणसं तासंतास रांगेत उभे राहून तुझ्या पायाशी आली की त्यांना ढकलून दिले जाऊ लागले. त्याचवेळी नेते-अभिनेते आले की त्यांच्यासाठी मंडळाचे पदाधिकारी पायघड्या अंथरू लागले. बाप्पा हा सगळा प्रकार तुझ्या नजरेसमोर होताना तू गप्प कसा बसतोस..? मोठमोठे राजकारणी येतात म्हणून पोलीसही हदबलपणे जे काही चालू आहे ते हातावर हात ठेवून पाहत बसतात. काही करायला जावे तर कार्यकर्ते पोलिसांनाही मारायला कमी करत नाहीत. हे काय चालू आहे बाप्पा..?
तू तर विघ्नहर्ता… सुखकर्ता… मग तुझ्या दर्शनाचे सुख हिरावून घेतले जात असताना तू गप्प का बसतोस..? त्याचवेळी राज्यभर अन्य ठिकाणी तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलाही त्रास होत नाही… धक्काबुक्की होत नाही… याचा अर्थ तू लालबाग परिसरात नाहीस असा आम्ही काढायचा का कारण तू जर तिथे असतास, तर तुझ्या दर्शनाला येताना आम्हाला काय दिव्यातून जावे लागते हे तू पाहिले असतेस आणि ते थांबवलेही असतेस..! किमान नतदृष्ट कार्यकर्त्यांना तू सद्बुद्धी तरी दिली असतीस. तू तिथे नाहीस म्हणून कदाचित त्यांना सद्बुद्धी कोणी देत नसेल. मग जिथे तू नाहीस, तिथे तू आमच्या नवसाला कसा पावणार..? संत चोखामेळा यांनी काही वर्ष आधी करून ठेवलेले वर्णन तुझ्या बाबतीतही लागू होते का रे..?
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥
डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़. म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये. फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण. ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण बळी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही. आपले मीलन होणार नाही. म्हणून संत चोखा मेळा म्हणतात, मी जरी वाकडा वाटलो तरी माझा भाव भोळा आहे… सरळ आहे…
बाप्पा तुझे देखील असेच आहे ना घरी दारी आम्ही तुला आणतो तुझी प्राणप्रतिष्ठा करतो आणि तुझी सेवा घरी करायचे सोडून आम्ही लालबागच्या रांगेत दिवस घालवतो. चोखामेळा तर फार वर्षांपूर्वीचे. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. व्हाट्सअपवर एक चित्र खूप व्हायरल झाले आहे. तुला देखील माहिती असावे म्हणून इथे ते देत आहे. त्यात लिहिलेला मजकूर फार मजेशीर आहे. “लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी धक्काबुक्की खाऊन, थकून आलेल्या भक्ताला घरचा गणपती विचारतो, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का..?” बाप्पा ही आजच्या पिढीची भाषा आहे. मात्र भावना थेट भिडणाऱ्या आहेत. त्या तुझ्यापर्यंत पोहोचल्या असतीलच. बघ, जाता जाता तुझ्या नावावर वाटेल तसे वागणाऱ्यांना सद्बुद्धी देता आली तर… पुढच्या वर्षी भेटूच… तेवढ्याच श्रद्धेने… तेवढ्याच आपुलकीने…

तुझाच
बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *