बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

लातूर ते मुंबई : एका धडपड्या महिलेची कहाणी
(नवरात्रीच्या पाचव्या माळेच्या निमित्ताने)

– अतुल कुलकर्णी

ज्योती लातूरच्या एका स्थानिक दैनिकात काम करायची. मी देखील लातूरला एका स्थानिक दैनिकात काम करत होतो. आमच्या दोघांचीही घरे एकाच कॉलनीत होती. ज्योती तेव्हापासून दृढनिश्चयी होती. एखादी गोष्ट तिच्या मनाला पटली की त्यासाठी झोकून देऊन काम करायची. पुढे ती औरंगाबादला लोकमतमध्ये आली आणि मी लातूर लोकमतमध्ये रिपोर्टर म्हणून काम सुरु केले. त्यावेळी अजय आंबेकर देखील लोकमतमध्येच कामाला होता. तो आमचा प्रादेशिक विभागाचा प्रमुख. अजयकडे बातमी दिली की अत्यंत सजवून ती बातमी लावायचा. रिपोर्टरला सगळं श्रेय मिळालं पाहिजे यासाठी त्याचा आग्रह असायचा पण त्याचवेळी बातमीत काही चुकीचे आढळले तर लगेच दाखवूनही द्यायचा. तेथे अजय आणि ज्योतीने लग्न करायचे ठरवले. दोघेही नंतर माहिती खात्यात लागले. उच्च पदापर्यंत गेले.

ज्योतीने सह्याद्री वाहिनीवर न्यूज रिडर म्हणून कामाला सुरुवात केली आणि पुढे ती येथेच न्यूज एडिटरही झाली. कोरोना सुरु होण्याच्या काही दिवस आधी तिने या नोकरीचा राजीनामा देऊन सेवानिवृत्तीही घेतली. स्वत:च्या मनासारखं करता यावं म्हणून.

हा तिचा काही मोजक्या शब्दातला प्रवास. मात्र हा प्रवास म्हणजे ज्योती नाही. अत्यंत सालस, मेहनती आणि अपार कष्ट करण्याची तयारी ही तीची बलस्थानं. ज्योती ने पुढे सुत्रसंचालक म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. हे करताना त्यासाठी काय लागते, आवाजाचे चढउतार कसे असले पाहिजेत. शब्दांची रचना कशी असावी, यासाठी तीने स्वत: आधी मेहनत घेतली आणि आता ती आवाजासाठीचे क्लासेसही घेऊ लागलीय. कोणत्याही कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करायचे असेल तर ती आधी त्यांना भेटते. त्यांच्याशी चर्चा करते. मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना नेमकं काय हवयं ते काढून घेते आणि मग स्वत:ची स्क्रीप्ट तयार करते. ती त्यांना दाखवून घेते. काही बदल हवे आहेत का असेही विचारते, एवढी सगळी सिध्दता झाल्यावर ती जेव्हा स्टेजवर जाते तेव्हा हमखास कार्यक्रम संपल्यानंतरही सगळ्यांच्या लक्षात रहाते.

लातूर सारख्या छोट्या शहरातून (३० ते ३५ वर्षापूर्वीचे लातूर) ती मुंबई पर्यंत आली, मुंबईत स्वत:चे नाव तयार केले. स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. स्वत:चे असे हक्काचे क्षेत्र निवडले आणि त्यात प्राविण्य मिळाल्यानंतर सरकारी नोकरी सोडून स्वत:च्या मनासारखे जगायला ती मोकळी झाली. हे जेवढ्या साधेपणाने लिहीण्याजोगे आहे तेवढे सोपे नाही. असे स्वत:ला तयार करायला, मुंबई सारख्या महाकाय शहरात स्वत:चे वेगळे टींब बनवायला मोठी ताकद लागते, कमिटमेंट लागते आणि पाय जमिनीवर पाहीजे असतात. हे सगळे गूण तिच्याकडे आहेत म्हणून आज तीची स्वत:ची अशी ओळख आहे.

माझी आणि ज्योतीची ओळख ही तीच्या लातूरच्या पत्रकारितेपासूनची. अनेकदा मी गमतीने म्हणतो देखील की, अजयच्या आधीपासूनची माझी ज्योतीची ओळख आहे. आम्ही दोघे भेटतो तेव्हा आमची बोलण्याची सुरुवातच भांडणाने होते आणि अजय ती भांडणे शांतपणे बघत बसतो. दुसरं करु तरी काय शकतो म्हणा तो, आमच्या दोघांमध्ये…? तिचा फटकळपणा तिला अनेकदा अडचणीचा ठरल्यासारखा होतो खरा, पण त्याची पर्वा करेल तर ती ज्योती कसली…?

गंमतीचा भाग सोडा, पण कोणालाही अभिमान वाटावा अशी ही बिनधास्त आहे अशी माझी खूप जुनी मैत्रीण आहे. तिच्या मेहनतीला अजयची साथ मिळाल्याने तीचे व्यक्तीमत्व फुलून आले हे ही तेवढेच खरे आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात पण हे वाक्य या दोघांनाही उलट सुलट करुन लागू आहे. जयती, त्यांची मुलगी, ती देखील तेवढीच गुणी मुलगी आहे. आज नवरात्रीच्या पाचव्या माळेच्या निमित्ताने एका धडपड्या, धाडसी आणि मेहनती महिलेचा सन्मान करताना मला विशेष आनंद होत आहे. ऑल द बेस्ट ज्योती…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *