सोमवार, ३० डिसेंबर २०२४
30 December 2024

लॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..!

हाताला काम नाही, खिशात दाम नाही, तरीही ३९०० कोटी रुपये चार महिन्यात दारुवर खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनच्या चार महिन्यात तळीरामांचे घसे कोरडे पडलेच नाहीत. या काळातही तब्बल ३९०० कोटी रुपयांच्या देशी, विदशी दारु आणि बियरने हजारोंची साथसंगत केली. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात १५०२.५२ लाख लिटर दारुने अनेकांचे घसे कोरडे होण्यापासून वाचले. २०१९ मध्ये याच चार महिन्यात महाराष्ट्रातील मद्यप्रेमींनी ३१४८.२५ लाख लिटर दारुने आपली तहान भागवली होती हे विशेष.

‘हाताला काम नाही, शिखात दाम नाही, असे चित्र राज्यभर असतानाच्या काळात ३९०० कोटी रुपयांची दारु विकली जाण्याचा पराक्रम महाराष्ट्राच्या नावावर जमा तर केलाच शिवाय, या सगळ्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेत चार महिन्यात २३६२.१३ कोटी रुपये महसुलापोटी जमा करुन राज्याच्या विकासाला हातभार लावण्याचे काम केले आहे. राज्याची अर्थव्यवस्था संकटात असताना १ एप्रिल ते ३१ जुलै या चार महिन्यात देशी दारु पिणाऱ्यांनी ६८२.२८ कोटी, विदेशी प्रेमींनी १५६८.६३ कोटी आणि बियर प्रेमींनी १११.२३ कोटी रुपयांचा असा एकूण २३६२.१३ कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा केला. ”अर्थव्यवस्था वाचवण्याचे कामही आम्हालाच करावे लागत आहे” असे मिम्स या काळात खूप व्हायरल झाले होते. पण वस्तूस्थिती देखील तशीच असल्याचे समोर आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्यावर्षी २०१९-२० मध्ये राज्याच्या तिजोरीत १५,४२८ कोटींचा मिळवून दिले होते. यावर्षी मात्र हे प्रमाण खूप कमी झाले आहे. गेल्यावर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात ४८७५.२७ कोटी रुपये अबकारी करापोटी विभागाने जमवले होते. यावेळी मात्र त्याच्या अर्धेच पैसे जमा होऊ शकले असे विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *