बुधवार, ३० ऑक्टोबर २०२४
30 October 2024

निवडणूक जिंकायची तर आतापासून हे नक्की करा

अधून मधून / अतुल कुलकर्णी

नेते हो,

ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, त्या लोकसभेच्या निवडणुका या आठवड्यात जाहीर होतील. ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे, त्यांना खासगीत तयारीचा मेसेजही आला असेलच. त्यांनी आपापली कागदपत्रे गोळा करायला सुरुवात केली असतील. काही नेत्यांनी आपल्या नावावर असलेली थकबाकीही भरून टाकली असेल. असे असले तरी ‘आता हीच ती वेळ, हाच तो क्षण’, असे म्हणत कामाला लागा. पाच वर्षे आपण आपल्या मतदारांसाठी काय कमी कष्ट केले…? सतत त्यांना भेटत राहिलात… त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यांच्याशी प्रेमाने वागलात… त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा एकही प्रसंग आपण सोडला नाही… प्रत्येक मतदाराला पाच वर्षांत आपण कितीतरी वेळा भेटलात… त्यांची व्यक्तिगत कामेही उदार मनाने आपण करून दिली… तरीही मतदार तुम्हाला काही गोष्टी ऐकवतील. पाच वर्षे कुठे गेला होतात…? आता बरी आमची आठवण आली…? आम्ही काम सांगितले तर तोंड फिरवून गेलात…! असेही आपल्याला ऐकवतील. आमचे खासदार हरवले, अशा पाट्या गावात लावतील. मात्र, त्याकडे लक्ष देऊ नका. अशा पाट्या लावणारे शोधा आणि त्यांना ‘गांधी विचार’ ऐकवा. त्यांचे नक्की मतपरिवर्तन होईल. पण, डोक्यावर बर्फाची लादी ठेवा. सगळ्यांचे सगळे ऐकून घ्या. शेवटी आपल्याला जे करायचे आहे तेच आपण करणार आहात.

तरीही काही टिप्स आपल्याला द्याव्यात म्हणून हे पत्र लिहिण्याची हिंमत करत आहे. आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांशी कडक शब्दांत वागा. त्यांना साहेब, साहेब म्हणू नका… आमचे खासदार मतदारांशी कसे वागतात ते एकदा येऊन बघा. तुम्ही देखील तसेच वागायला शिका. पोलिस अधिकारी असो की, अन्य कोणता अधिकारी… वयाने लहान असो की मोठा… आजूबाजूला कितीही लोक असोत… येणारे अधिकारी आमच्या साहेबांना वाकून नमस्कार करतात. (पाया पडतात… हा शब्द इथे लागू होतो की नाही, माहिती नाही) जे अधिकारी, पत्रकार आमच्या साहेबांचे ऐकत नाहीत, त्याला आमचे साहेब जाहीरपणे, ‘ए, कोण आहे रे तू… चल हट बाजूला हो…’, असे ऐकवतात. चारचौघांत समोरच्याचा असा काही पाणउतारा करतात की, पुन्हा तो आमच्या साहेबांना खेटायला येत नाही… एकदम टेचात राहतात आमचे साहेब. आमच्या साहेबांचे साहेब, मोठ्या साहेबांच्या जवळचे. मोठे साहेब त्यांच्या मोठ्या साहेबांच्या जवळचे… त्यामुळे आमचे साहेब कुणाला घाबरत नाहीत… हा गुण तुम्ही आमच्या साहेबांकडून घ्या… वाटल्यास एक दिवस त्यांच्यासोबत दौरा करा. म्हणजे अधिकारी, पत्रकार, नागरिक यांच्याशी कसे वागायचे याचा वस्तुपाठ तुम्हाला मिळून जाईल. या गोष्टी तुम्हाला तुमच्या मतदारसंघात फिरताना कामाला येतील.

सगळ्या गोष्टी पैशांनी विकत घेता येतात यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, ‘गांधी विचार’ कायम मदतीला येतात, असे आजपर्यंतचे सगळे नेते सांगत आले आहेत. निवडून यायला मतं लागतात तरी किती…? ५० हजार मतं कशी मिळतील याचा हिशेब करून ठेवा. त्यासाठी ‘गांधी विचारां’वर श्रद्धा ठेवा. गांधीजींचे पाच-पंचवीस कोटी फोटो छापा आणि वाटा… शेवटी तेच मदतीला येतात हे लक्षात असू द्या… लोकांना असे फोटो फार आवडतात. लोक गांधीजींचे फोटो जपून ठेवतात. वेळप्रसंगी ‘गांधी विचार’च कामाला येतात, यावर मतदारांचा ठाम विश्वास असतो. म्हणून तुम्हीसुद्धा विश्वास ठेवा. ५० हजार मतांसाठी गांधीजींचे प्रत्येकी ५ हजार फोटो वाटा. हे गणित लक्षात ठेवा. मतदार, पत्रकार, अधिकाऱ्यांशी टेचात वागा… गांधीजींचे फोटो छापून घ्या… या दोन गोष्टी ‘टॉप प्रायोरिटी’ने करा. तसेही आता दिवस कमी आहेत. जिथे ‘दादा’ शब्दाचा वापर केल्याने काम सोपे होईल, तिथे तो शब्द वापरा… जिथे ‘वादा’ केला तरी काम भागते तिथे नुसताच ‘वादा’ करा… जिथे प्रत्यक्ष ‘गांधी विचार’ ऐकवावे लागतील तिथे गरजेनुसार गांधी विचारांची व्याख्याने ठेवा. या तीन गोष्टींचे नीट बारकाईने नियोजन करा.

आपण विरोधात असा किंवा सत्ताधारी बाजूने… मात्र, महागाई, बेरोजगारी, विकासकामे अशा मुद्द्यांचा या निवडणुकीत किती उपयोग होतो ते तपासून बघा. काही जण जात, धर्म, पंथ या विषयांभोवती निवडणूक झाली पाहिजे, असे सांगतील. कोणाला काय सांगायचे ते सांगू द्या. तुम्ही जो ज्या धर्माचा भेटेल, त्याला त्याचा धर्म किती महान आहे हे सांगा… जो ज्या जातीचा असेल त्याला त्याची जात किती चांगली आहे हे सांगा… थोडक्यात सगळ्यांना चांगलं म्हणा… तुम्ही बेस्ट…! तुमच्यासारखे दुसरे कोणीही बेस्ट नाही…!! हे समोरच्याला सतत सांगत राहा. कोणालाही वाईट म्हणू नका. चांगलं किंवा वाईट म्हणायला ‘गांधी विचारांची’ गरज नसते. मात्र, शेवटच्या दोन रात्री वेगवेगळ्या वाड्या, वस्त्यांवर, सोसायट्यांमध्ये ‘गांधी विचारांची’ मजबूत व्याख्याने ठेवा. शेवटच्या त्या दोन ते तीन रात्री अत्यंत महत्त्वाच्या. एकदा का आपण जिंकलो की, पुन्हा पाच वर्षे कोणीही, कुठेही बोलावले तरी पुढच्या वेळी नक्की येतो… हे सांगा…! पुढची वेळ कधी ते मात्र सांगू नका… एवढे केले की तुम्ही मोठे नेते झालाच म्हणून समजा. अनेकांना या मोफत सल्ला केंद्राची गरज नसेलही… मात्र, आम्ही रिकामटेकडे आहोत… बसल्या बसल्या फुकाचा सल्ला द्यायला काय लागते… म्हणून हा सल्ला दिला आहे… पटला तर घ्या, नाहीतर तुम्हाला जसे वागायचे तसे वागा…

तुमचाच

बाबूराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *