रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

आता एकच टार्गेट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड


मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले. मात्र महाराष्ट्रात महायुतीचा घोडा अडला. केवळ १७ जागांवर महायुती थांबली. महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या. याचा अर्थ आता महाविकास आघाडीला विधानसभा नजरेच्या टप्प्यात आली, असा कोणी काढणार असेल तर तो मोठा गैरसमज ठरेल. पराभवाच्या धक्क्याने भाजप नेते खडबडून जागे झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विजयामुळे आनंदून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या आनंदाला ब्रेक लावून तात्काळ विधानसभेच्या कामाला लागले पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ जागा आहेत. त्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मिळून ६७ विधानसभा मतदारसंघ येतात. एवढ्या जागांवर एकत्रितपणे जो पक्ष स्वतःचे लक्ष केंद्रित करेल त्याला विधानसभेचे दार खुले होईल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडी २० ठिकाणी, तर १६ ठिकाणी महायुती आघाडीवर दिसली. ठाणे जिल्ह्यात १४ विधानसभेत महायुती आणि ४ विधानसभेत महाविकास आघाडी पुढे आहे. पालघरमध्ये महायुती ५, आघाडी १, रायगडमध्येही महायुती ५ आणि आघाडी २ अशी दोघांची ताकद दिसून आली आहे. ६७ जागांचा हिशोब लावला तर ४० ठिकाणी महायुती आणि २७ ठिकाणी महाविकास आघाडीने विधानसभा मतदारसंघात आपली ताकद दाखवली आहे.

याचा अर्थ महाविकास आघाडीला मुंबई काबीज करणे दिसते तेवढे सोपे नसले तरी अशक्य नाही. मुंबईच्या ३६ विधानसभा मतदारसंघापैकी ७ विधानसभेत भाजप मायनस आहे. २ विधानसभेत उद्धव ठाकरेंचे उमेदवार मायनस आहेत. भाजपच्या १६ आमदारांपैकी ३ आमदारांच्या मतदारसंघात लीड कमी झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, अमित साटम यांच्या मतदारसंघात भाजपची समाधानकारक कामगिरी नाही. काँग्रेसचा परफॉर्मन्स मुंबईतल्या चार मतदारसंघांत चांगला झाला. उद्धव ठाकरे गटाच्या ८ पैकी २ तर शिंदे गटाच्या ६ पैकी ४ विधानसभा आज अडचणीत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांच्या दिंडोशी मतदार संघात कीर्तिकर यांना केवळ १,७०१ मतांचा लीड मिळाला होता. याचा अर्थ विधानसभेच्यावेळी असेच चित्र राहील आणि पुन्हा महाविकास आघाडीलाच चांगल्या जागा मिळतील असे नाही.

लोकसभेची निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत कुठल्याही निवडणुका झाल्या नव्हत्या. लोकांच्या मनात विद्यमान व्यवस्थेविषयीचा राग होता. तो मतदानातून प्रकट झाला. त्यांच्या भावनांचा निचरा आता झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेवर आले. अशावेळी विधानसभेत त्याच भावना पुन्हा उफाळून येतील, असे नाही. महाविकास आघाडीला मुंबईत ४ जागा मिळाल्या. पाचवी जागा नाममात्र मतांनी गेली. ठाणे जिल्ह्यात याच्या उलट स्थिती झाली. त्या ठिकाणी महाविकास आघाडीला १ लोकसभा मिळाली असली तरी विधानसभेत त्यामुळे फार फरक पडेल असे चित्र नाही. गेल्या काही महिन्यांत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे महाराष्ट्रात झालेले दौरे, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रात केलेले नेतृत्व, त्यांच्या शिवसेनेसाठी त्यांनी केलेला प्रचार, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयीची लोकांच्या मनातली सहानुभूती आणि मुस्लिम, दलित मतदारांनी महाविकास आघाडीवर टाकलेला विश्वास, या जमेच्या बाजू होत्या. या गोष्टी रिपीट होतील का? याचा विचार महाविकास आघाडीने करायचा आहे. जर विधानसभेला असे घडणार नसेल तर आघाडीच्या नेत्यांच्या हातात तीन महिने आहेत. त्यांना दिवस-रात्र एक करावा लागेल. काँग्रेसने अंतर्गत मतभेद, एकमेकांचे पाय खेचण्याचा मूळ स्वभाव मुंबईच्या समुद्रात बुडवून टाकावा लागेल. रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न हाताळावे लागतील. राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांमध्ये न्यावा लागेल. चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्या पुराव्यानिशी मतदारांना दाखवून द्याव्या लागतील. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने केंद्र सरकारच्या विरोधात जे वातावरण तयार केले, तसे वातावरण राज्यात करावे लागेल. तरच एमएमआर क्षेत्रातल्या ६७ जागा महाविकास आघाडीसाठी फायद्याच्या ठरू शकतील.

भाजप आणि शिंदे गट लोकसभेतील पराभवानंतर खचून जाईल, असा गैरसमज करून घेऊ नये. उलट ते आता उसळून वर येतील. त्यांच्याकडूनही जोरदार हल्ले होतील. विधानसभेची निवडणूक भाजपसाठी जीवन मरणाचा प्रश्न असेल. येत्या काही दिवसांत फोडाफोडीचे राजकारण वेग घेईल. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या जातील. अजित पवार यांना सोबत घेऊन राज्यभर झालेल्या नुकसानीचा अंदाज भाजप नेत्यांना आला आहे. त्यामुळेच अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही. शिंदे गटाच्या कोणत्या उमेदवारांना आपल्यामुळे फायदा झाला याचाही भाजपकडे पेपर तयार आहे. कुठे मोदी फॅक्टर चालला आणि कुठे नाही याचे गणित भाजपने मांडून ठेवले आहे. त्यामुळेच एकमेकांच्या चुका आणि आरोप-प्रत्यारोप तातडीने बंद करा, असे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना सांगावे लागले. यातच सगळे काही आले.

विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसे पक्षीय संघर्ष टोकाचे होतील नेत्यांनाही एकमेकांचे हिशोब चुकते करण्याची संधी मिळेल. २०१९ ला शिवसेना आणि भाजपने अनेक ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम केले होते. त्याची पुनरावृत्ती आता कोणत्या शिवसेनेसोबत होईल याची चर्चा आताच सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये काही नेते आत्ताच आक्रमकपणे बोलू लागले. त्यांना पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी लगेच लगाम लावला आहे. पण लगाम लावण्याची वेळच का यावी, हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, हे उगाच म्हटले जात नाही. लोकसभेच्या निकालानंतर त्याचा ट्रेलर दिसला आहे. विधानसभेत अंतर्विरोधाचा सिनेमा रिलीज होऊ द्यायचा नसेल तर काँग्रेस नेत्यांना स्वतःपेक्षा पक्ष मोठा आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या दोघांचे कार्यकर्ते लोकसभेच्या निमित्ताने जवळ आले. ही जवळीक विधानसभेसाठी जेवढी वाढेल, तेवढा दोघांचा फायदा होईल. मुंबईत उद्धव ठाकरे आणि ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी मजबूत स्थान निर्माण केले आहे. त्याचा फायदा काँग्रेसला मुंबईत घेता येईल. पण त्यासाठी पाय जमिनीवर ठेवावे लागतील. कोण कसे वागेल हे लवकरच दिसू लागेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *