बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर;
गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात

मुंबई डायरी/ अतुल कुलकर्णी

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या बारा लोकसभा मतदारसंघांपैकी आजमितीला फक्त एका ठिकाणी भाजपचा उद्धवसेनेसोबत थेट सामना होणार आहे. पालघरची जागा जर राजेंद्र गावित भाजपच्या तिकिटावर लढणार असतील, तर ती लढत थेट भाजपसोबत होईल, अन्यथा सगळ्या ठिकाणी भाजपची लढाई काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत आहे. भाजपने जाणीवपूर्वक थेट उद्धवसेनेसोबत लढण्याचे टाळले का? अशीही चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. दुसरीकडे जे शिवसैनिक अनेक वर्षे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते, ते आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. भाजप मात्र ही लढाई दुरून बघत आहे.

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेचा यांची लढत उद्धवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यासोबत होणार आहे. संजय दिना पाटील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, नंतर ते शिवसेनेत आले. शिवसेनेच्या फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. ११ लोकसभा मतदारसंघांपैकी एवढी एकच लढत भाजप उद्धवसेनेची होत आहे. पालघरची जागा जर बहुजन विकास आघाडीला सोडण्यात आली, तर तिथे भाजपची उद्धवसेनेसोबत लढत टळेल, पण तसे दिसत नाही. पालघरमध्ये ठाकरे गटाने भारती कांबळी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, ही जागा विद्यमान खासदार राजेंद्र गावित किंवा संतोष जनाठे यांच्यासाठी भाजपने मागितली असली, तरी गावित बाजी मारतील असे दिसते. तसे झाले, तर १२ पैकी २ जागी उद्धव ठाकरे आणि भाजप आमने-सामने येतील.

मुंबई दक्षिणमधून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे गटाने यामिनी जाधव यांना मैदानात उतरविले आहे. त्यांचे पती यशवंत जाधव हे एके काळी मातोश्रीचे बॅकबोन होते. रवींद्र वायकरही उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मात्र ईडीच्या भीतिपोटी ते शिंदेसेनेत गेल्याची चर्चा आहे. आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांची लढाई उद्धवसेनेचे अमोल कीर्तिकर यांच्यासोबत होईल. ईडी विरुद्ध ईडी अशी लढाई असल्याची या मतदारसंघात लोक गमतीने चर्चा करत आहेत. मुंबई दक्षिण मध्य मध्ये अनिल देसाई आणि राहुल शेवाळे या दोन शिवसैनिकांमध्ये टक्कर होईल. ठाण्यामध्ये विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश म्हस्के या दोघांमध्ये थेट लढत होईल, तर मनसेमार्गे उद्धवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांचा सामना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत होईल. हे सर्व पूर्वाश्रमीचे शिवसैनिक अशा पद्धतीने एकमेकांना भिडतील.

मुंबई उत्तर मध्य मध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम, तर मुंबई उत्तरमध्ये केंद्रीय मंत्री, भाजप नेते पीयूष गोयल यांची लढाई काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यासोबत होईल. भिवंडीमध्ये भाजप नेते, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा सामना शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यासोबत होणार असून, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची लढाई उद्धवसेनेचे अनंत गीते यांच्यातील बिग फाइट रायगडमध्ये रंगेल.

महाराष्ट्रात आणखी तीन ठिकाणी भाजप आणि उद्धवसेनेचा सामना होणार आहे. त्यात जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भाजपचे नारायण राणे यांची लढाई ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे. सांगलीत भाजपचे संजय पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील अशी लढत होईल. या तीन जागा वगळल्या, तर भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढणे पसंत केले आहे. दोन शिवसैनिकांमधील लढतीत जे विजयी होतील, ते कोणासोबत राहतील, हे निकालच सांगेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *