बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025
Ajit Pawar: Latest News, Biography, Facts, Photos, Videos ...

साहेबांनी दादांची केलेली नक्कल
आठवून मन:स्ताप करुन घेऊ नका

अधून मधून / अतुल कुलकर्णी

प्रिय मनसैनिकांनों
नमस्कार.

साहेबांचे भाषण ऐकले ना. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत काय करायचे हेही तुम्हाला समजले असेल. आता जोरात काम करायचे आहे. आपले साहेब याआधी अजित पवार गटाविषयी काय बोलत होते, त्यांची कशी नक्कल करत होते, हे सगळं सगळं आता विसरून जायचं आहे. आता एकच लक्षात ठेवा. साहेबांचा आदेश पाळायचा आहे. याआधी साहेबांनी “लाव रे तो व्हिडिओ…” म्हणत अनेकांना सळो की पळो करून सोडले होते. आता ते सगळे व्हिडिओ एकत्र करा, आणि तुम्ही एकटेच घरात पहात बसा. कुणालाही दाखवू नका. जर कोणी ते व्हिडिओ दाखवत असेल, तर त्याला आपल्या पद्धतीने समजावून सांगा. जर तो समजून घेत नसेल, तर त्याला खळळ खट्याक पद्धतीची सविस्तर माहिती द्या, म्हणजे त्याला आपोआप समजेल.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रचार सभेत, विधानसभेच्या तयारीला लागा… असे सांगणारा एकमेव आपला नेता आहे हे विसरू नका. त्यामुळे आत्तापासून विधानसभेच्या तयारीला लागा. त्यावेळी आपल्या विरोधात कोण असेल, याचा विचार करू नका. महाभारतातही युद्धाच्या वेळी अर्जुनाला जो प्रश्न पडला होता तो तुम्हाला पडेल. समोर सगळे नातेवाईक दिसत आहेत मी कशी लढाई करू असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता. तेव्हा कृष्णाने जे उत्तर अर्जुनाला दिले, तसेच उत्तर आपल्या साहेबांनी आता दिले आहे. हे मी सांगत नाही. साक्षात प्रकाश महाजन यांनीच हा दृष्टांत जनतेला सांगितला आहे. त्यांचे विधान ऐकल्यावर हातात चक्र घेतलेले, हसऱ्या चेहऱ्याचे कृष्णरुपी साहेब तुम्हाला स्वप्नात येतील. ती प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा आणि साहेबांचा संदेश विसरू नका.

साहेबांनी विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेश दिला आहे. एवढे पक्के लक्षात ठेवा. विधानसभेला कोण किती जागा मागणार? कोणाला किती जागा मिळणार? याचे आराखडे आत्ताच बांधू नका. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणाला किती जागा मिळतील याचे उत्तर आपोआप मिळेल. आपल्याला किमान १०० जागा मिळाल्या पाहिजेत, असे वाटणाऱ्यांना दहा तरी जागा मिळतील की नाही, याचे उत्तर लोकसभेचे निकाल देतील. तेव्हा उगाच मनात मांडे फोडू नका. दादांच्या पक्षाला आणि ठाण्यातल्या साहेबांना विधानसभेच्या वेळी शंभर शंभर जागा मिळतील असेही काही जण तुम्हाला सांगतील. पण साहेब दिल्लीला ज्यांना भेटून आले ते काय फक्त ८८ जागा घेतील का? याचा विचार करा..! त्यात पुन्हा आपल्या साहेबांना किती जागा मिळतील? याचा अंदाज बांधा आणि मग विधानसभेच्या तयारीला लागा… उगाच तुम्ही विधानसभेची तयारी कराल, आणि आयत्या वेळी तुमची जागा भलत्याच कोणाला दिली जाईल. केलेली मेहनत वाया जाईल. तेव्हा घाई करू नका. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. आपल्या साहेबांनी आता बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याचे रिटर्न गिफ्ट नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. जरी विधानसभेच्या तयारीला लागा असे साहेबांनी सांगितले असले तरी तुम्हाला अमुक ठिकाणी काम करा असे व्यक्तिगत बोलवून साहेबांनी सांगितले का? तसे सांगितले असेल तर आणि तरच कामाला लागा. म्हणजे तुमचा आनंद वाढणार की कमी होणार हे लक्षात येईल.

जाता जाता आणखी एक फुकटचा सल्ला देतो. बारामतीचे दादा वेगात आहेत. त्यांनी तर लगेच वहिनी साहेबांच्या निवडणूक बॅनरवर आपल्या साहेबांचा फोटो पण छापला आहे. आता ठिकठिकाणी आपल्या साहेबांचे फोटो छापून येतील. कधी दादांच्या शेजारी त्यांचा फोटो छापून येईल. तेव्हा साहेब दादांविषयी काय बोलले होते हे आठवत बसू नका. जुने व्हिडिओ काढून पाहत बसू नका. त्याने मनस्ताप शिवाय काहीही मिळणार नाही. विनाकारण जीवाला त्रास करून घेऊ नका. आपल्या साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तेव्हा उगाच चिंता करू नका. आपले प्रेम आपल्या साहेबांवर आणि त्यांच्या निर्णयावर आहे. परवाच्या सभेत एक कार्यकर्ता बॅनर घेऊन आला होता. त्यावर लिहिले होते, सरणावर जाईपर्यंत साहेब सांगतील तेच ऐकणार… अशी श्रद्धा प्रत्येकाने ठेवायला हवी.

याआधी आपल्या साहेबांनी वरच्या दोन साहेबांविषयी काय सांगितले होते याचे व्हिडिओ तुमच्याकडे येतील. ते पाहत बसू नका. चुकून जर असे व्हिडिओ पाहिले तर साहेबांचे भाषण पुन्हा पुन्हा ऐका. फक्त वीस मिनिटांचे तर भाषण होते. ऐकायला जास्त वेळ लागणार नाही. भाषा आहे का आणि लोकसभेचे निकाल लागेपर्यंत शांत रहा. साहेबांनी आधी विरोधात लढायला सांगितले होते. नंतर पाठिंबा दिला होता. पुन्हा लढायला सांगितले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. तेव्हा विधानसभेला साहेब आणखी काही वेगळं सांगतील ते ऐकण्यासाठी कान तयार ठेवा. मतदानाला नक्की जा साहेबांचे भाषण आठवून ज्याला कोणाला मतदान करायचे त्याला करा पण मतदान करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुमचाच बाबुराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *