दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान..! पुढे काय..?
अतुल कुलकर्णी
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८वा वर्धापन दिन, मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन शिवसेनांनी साजरा केला. दोघांनीही मेळाव्यात आपापले शक्तिप्रदर्शन केले असले तरी खरे शक्तिप्रदर्शन लोकसभा निवडणुकीत झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत नऊ जागांसह १६.७२ टक्के मते मिळाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागांसह १२.९५ टक्के मते मिळाली. या दोन्ही शिवसेनेच्या एकत्रित मतांची बेरीज २९.६७ टक्के होते. लोकसभेत भाजपला मिळालेल्या २६.१८ टक्के मतांपेक्षा ही बेरीज जास्त होते. याचा अर्थ शिवसेना संपवण्यासाठी केलेली फोडाफोडी शिवसेनेच्या दोन्ही गटांना मजबूत करण्यात झाली. भाजपने दोन्ही शिवसेनांना एकमेकांसमोर उभे केले; पण त्याचा फारसा फायदा भाजपला झाला नाही.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या बेरजेतील फरक १.१८ टक्के आहे. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट या सगळ्यांच्या मतांची एकत्रित बेरीज ४२.७३ टक्के होते. ठाकरे शिवसेना, शरद पवार गट आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या मतांची एकत्रित बेरीज ४३.९१ टक्के होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले सांगलीचे विशाल पाटील यांच्या मतांची टक्केवारी मिळवली तर महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज ४५ टक्क्यापर्यंत जाते. महाविकास आघाडीची भाषा आज तरी सलोख्याची आणि एकमेकांच्या सोबत जाण्याची आहे. त्या उलट महायुतीची भाषा ‘मीच मोठा भाऊ’, ‘आमच्यावर अन्याय झाला’ अशा पद्धतीची आहे.
त्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे दोघांनीही मेळाव्यातून एकमेकांना आव्हान दिले आहे. शिंदे गटातील अनेक आमदार परत येण्याची भाषा करत आहेत; पण त्यांच्यासाठी आपले दरवाजे बंद असल्याचे ठाकरे यांनी त्या दिवशी जाहीर केले. शिंदे गटात मात्र आमच्याकडे अजूनही इनकमिंग चालू आहे, हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या निकालात शिंदे गटाच्या ४० पैकी जवळपास २० ते २२ आमदारांच्या मतदारसंघांत मताधिक्य घटले आहे. तेथे विरोधी उमेदवाराला जास्त मते आहेत. मात्र वेगळ्या पद्धतीचे परसेप्शन तयार करून आपणच मजबूत आहोत, हे दाखवण्यासाठीची झलक मेळाव्यात दिसली. काँग्रेसच्या व्होट बँकेने उद्धवसेनेचे भले केले, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचे उमेदवार जिंकल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला होता. त्या उलट उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे चोरलेले नाव आणि चिन्ह बाजूला ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरा; मग कोणाची शिवसेना खरी हे कळेल, असे थेट आव्हान शिंदेसेनेला दिले. त्याविषयी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
शरद पवारांचे फोटो वापरण्यावर अजित पवार गटाला बंधने आणण्याचे काम शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केले. उद्धव ठाकरे यांना मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरण्यावर तसे बंधन मिळवता आले नाही. धनुष्यबाणाच्या विरुद्ध मशाल हे चिन्ह घेऊन उद्धव ठाकरे लढले. मात्र निवडणुकीत मशालसदृश चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा फटकाही ठाकरे यांना बसला. तुतारीसदृश चिन्ह शरद पवारांच्या विरोधातील अपक्ष उमेदवारांना मिळाले. असे झाले तरीही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनी चांगली कामगिरी केली. जर चिन्हांमध्ये असे गोंधळ झाले नसते तर निकाल काय लागला असता, याची जाणीव महायुतीतील नेत्यांना आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभेचे रणशिंग फुंकताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही, असे सांगितले. त्यामागे एक कारण सांगितले जाते. जर त्या लोकांना पुन्हा घेतले आणि निकालानंतर या लोकांनी पक्षांतर केले, तर पक्ष म्हणून कोणाला भीती राहणार नाही. ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती होईल. दरवेळी पक्ष फुटून लोक जाऊ लागले तर पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यापेक्षा नवे तरुण चेहरे घ्यायचे आणि मैदानात उतरायचे, ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. ती या मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केली आहे. शरद पवार यांचा पक्ष ‘सुभेदारांचा पक्ष’ म्हणून ओळखला जातो. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना आणि ज्यांनी आपला मतदारसंघ घट्ट बांधून ठेवला आहे, अशांना आजपर्यंत राष्ट्रवादीत स्थान होते. मात्र लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी ती भूमिका बदललेली दिसते. तरुण चेहरे विधानसभेच्या निमित्ताने मैदानात उतरवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे, दोघांची ही भूमिका विधानसभेच्या निवडणुकीचे गणित बदलू शकते.
आपले काही योद्धे पराभूत झाले. तो पराभव आपल्या जिव्हारी लागला असून, त्याचा वचपा काढण्याची भाषा ठाकरेंच्या भाषणात होती. मी हिंमत हरणार नाही आणि तुम्हालाही हरू देणार नाही, अशी आश्वासकता ठाकरेंच्या भाषणात होती. तर, दलित आणि मुस्लिमांमध्ये भीती पसरवली गेली. खोटे नरेटिव्ह खोडून काढण्यात आपण कमी पडलो, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यात व्यक्त केली. आपले मंत्रिपद काढून आदित्य ठाकरेंना दिले, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी मेळाव्यात केला. आपणच मोठे भाऊ आहोत. जागावाटपात सर्व्हेची भीती दाखवून भाजपने अनेकांची तिकिटे कापली. तसे आता होऊ देऊ नका, अशी भाषाही या मेळाव्यात झाली. भाजप आणि शिंदेसेनेत खदखद चालू असल्याचा मेसेज या मेळाव्यातून गेला आहे.
जाता जाता : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आले तिथे ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना ३,८०,००० मते मिळाली. सहापैकी तीन विधानसभेत त्यांना मताधिक्य मिळाले. त्या ठिकाणचे हे चित्र असेल तर विधानसभेत काय होईल हे तुम्हीच ठरवा असेही ठाकरे गटाचे नेते मेळाव्यानंतर बोलत आहेत. घोडा मैदान जवळच आहे.
Comments