जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
अतुल कुलकर्णी / लोकमत
महाविकास आघाडीच्या जागावाटपात निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी सोमवारी पडद्याआड अनेक बैठका झाल्या. दुपारी उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्वतः दिल्लीत फोन केला आणि चर्चेचे दरवाजे पुन्हा खुले झाले. मंगळवारी दुपारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उद्धवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट घेतील आणि दिल्लीत झालेली चर्चा त्यांना सांगतील.
काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीने ९६ जागा निश्चित केल्या. केंद्रीय निवडणूक समितीने ५५ उमेदवारही निश्चित केले. मात्र मविआचा फॉर्म्युला एकत्रितपणे जाहीर केल्यानंतरच यादी जाहीर करा, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सूत्रांनी लोकमतशी बोलताना सांगितले. नागपूर दक्षिण विधानसभेची जागा काँग्रेसला हवी होती, त्या बदल्यात वणी मतदारसंघ उद्धवसेनेला देण्याचे प्राथमिक चर्चेत मान्य झाले असून आमच्यात कुठलेही वाद नाहीत दोघेही बसू व मंगळवारी हा विषय संपुष्टात येईल असेही सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत झालेल्या जागा वाटपात काँग्रेस ९६, उद्धव सेना ८५ व शरद पवार गटाच्या वाट्याला ८५ जागा आल्या आहेत. २६१ जागांचे वाटप पूर्ण झाले असून उरलेल्या २७ जागांपैकी विदर्भ आणि मुंबईतील तीन ते चार जागांवरच आता चर्चा बाकी आहे. राहुल गांधी-ठाकरे फाेनवर चर्चा दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची उशिरापर्यंत बैठक झाली. रविवारी रात्री पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राहुल गांधी यांची ही भेट घेतली. त्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती सांगितली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोनवरही संवाद झाल्याचे वृत्त आहे.
आमच्यात एकवाक्यता :
‘लोकमत’शी बोलताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, दोन्ही पक्षात जिवंतपणा आहे. म्हणूनच लोकशाही पद्धतीने चर्चा करत आहोत. मविआचे सरकार आणायचे आहे. आमच्यात एकवाक्यात आहे, नाराजी नाही. काँग्रेसची ९६ जागांवर चर्चा : नाना महाराष्ट्रातील काही नेत्यांनी काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी दोघे मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ असा प्रस्ताव ठेवला होता, मात्र तो स्पष्टपणे नाकारण्यात आला. मविआने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जायचे आहे या शब्दात त्यांना सांगितले गेले.
चर्चेसाठी देसाई आघाडीवर
राऊतांची नरमाईची भाषा चर्चेची सूत्रे दिवसभर खासदार देसाई यांनी हाती घेतली. खा. राऊत यांनीही नरमाईची भाषा केली. ज्या पक्षांचे श्रेष्ठी दिल्लीत असतील त्यांचे नेते दिल्लीतच जाऊन बोलतील. आमचे तिथे असते तर आम्हीही तेच केले असते, असे राऊत म्हणाले. यासाठी पडद्याआड बरीच फोनाफोनी झाली.
महायुतीतील धुसफूस भाजपची पहिली ९९ उमेदवारांची यादी आल्यानंतर काही मतदारसंघांमध्ये महायुतीत नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. त्यातच पहिल्या यादीत नाव न आल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपच्या आमदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठून अस्वस्थतेला वाट करून दिली.
उमेदवारीबाबत खात्री नसलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यात काही विद्यमान आमदारांचा समावेश होता. फडणवीस यांचे ‘मिशन समजूत’ सहा तास सुरू होते. वर्सोवा, मुंबईच्या आमदार भारती लव्हेकर, बोरीवलीचे आमदार सुनील राणे, खडकवासलाचे (जि. पुणे) आमदार भीमराव तापकीर या पहिल्या यादीत नसलेल्या आमदारांनी त्यांना पुन्हा संधी द्या, असे साकडे फडणवीस यांना घातले. पक्षनेतृत्वाशी चर्चा करू असे आश्वासन फडणवीस यांनी दिले पण पक्षासाठी त्यागाची तयारी ठेवा असा सल्लाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भातील दोन विद्यमान आमदारांसह पाच-सहा इच्छुकही फडणवीस यांना भेटले. मावळ, (जि.पुणे) येथील माजी आमदार बाळा भेगडे यांनी मावळची जागा भाजपकडे घ्या अशी मागणी केली. तेथे अजित पवार गटाचे सुनील शेळके आमदार आहेत व ही जागा या गटाला जाणार हे निश्चित मानले जाते. अंधेरी पूर्वमध्ये उमेदवारीसाठी मुरजी पटेल हे भेटले.
बाळ माने यांचे बंडखोरीचे संंकेत रत्नागिरीत शिंदेसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांना उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असताना माजी आमदार भाजपचे बाळ माने यांनी बंडखोरीचे संंकेत दिले आहेत. पुढे कोणते पाऊल उचलले पाहिजे यासाठी त्यांनी मतदारांची मते मागविली आहेत.
सत्यजीत तांबे, देवयानी फरांदे: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे हेही फडणवीस यांना भेटले. नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे समर्थकांसह फडणवीस यांना भेटल्या.
शिंदेसेनेचे पदाधिकारी नाराज कल्याण पूर्वमध्ये भाजपची उमेदवारी आ. गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना जाहीर होताच शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, आम्ही त्यांचे काम करणार नाही असा इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे कथित भेटीच्या चर्चेने खळबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची कथित गुप्त भेट झाल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खा.संजय राउत यांनी हे वृत्त खाेटे असल्याचे म्हटले आहे.
Comments