उद्धव संन्यास घेणार का..? शेलार राजीनामा देणार का..?
अधूनमधून / अतुल कुलकर्णी
नमस्कार.
लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि कोण काय बोलले होते, याचे व्हिडीओ सगळीकडे फिरू लागले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘महाविकास आघाडीला एकत्रित मिळून १८ जागा जरी मिळाल्या तरी आपण राजकीय संन्यास घेऊ,’ अशी घोषणा केली होती. ते शब्दांचे पक्के आहेत. त्यामुळे त्यांनी जर राजीनामा दिला तर आपले कसे होणार? या चिंतेने त्यांच्या चाहत्यांना रात्री झोप येत नाही, अशी बातमी आहे. तुम्ही राजीनामा देणार का? असे त्यांना विचारायचे तरी कसे…? समजा विचारले आणि त्यांनी आपल्याच हातात राजीनामा ठेवला तर तो घेऊन आपण जायचे तरी कुठे…? तुम्ही हा राजीनामा का आणला? असे जर कोणी विचारले, तर काय उत्तर द्यायचे…? असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे कोणी विचारण्याची हिंमत करत नाही. तरीही काही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी हिंमत करून काही पत्रकारांना पुढे केले… ‘तुम्हीच शेलार यांना विचारा,’ असा आग्रहही केला. असा आग्रह करणाऱ्यांमध्ये ज्यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद हवे आहे, अशा काही नेत्यांचा समावेश होता, अशीही बातमी आहे. असो.
पत्रकारांना तर बातम्याच हव्या असतात. काहींनी विचारले की, तुम्ही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. आता तुम्ही राजीनामा देणार का…? त्यावर शेलार यांनी हा प्रश्न आपल्यासाठी नाही, असा चेहरा केला खरा… पण ते म्हणाले, ‘माझे विधान अर्धवट दाखवले गेले. एनडीएला देशात ४५ जागासुद्धा मिळणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. जर त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन,’ असेही त्यांनी सांगितले होते. त्यावर मी ‘महाविकास आघाडीच्या १८ जागासुद्धा येणार नाहीत,’ असे उत्तर दिले होते. त्यांनी आधी संन्यास घ्यावा, असे उत्तर शेलार यांनी दिले आहे.
त्यामुळे काही पत्रकार दिवसभर वांद्र्यातच ‘मातोश्री’ ते शेलार यांचे घर अशा चकरा मारत आहेत. कोण आधी संन्यास घेतो आणि कोण आधी राजीनामा देतो… त्याची सगळ्यांत पहिली ब्रेकिंग न्यूज कोणाकडे येते…? याचीही स्पर्धा लागल्याचे वृत्त आहे. ‘जर मी आधी न्यूज ब्रेक केली नाही तर मी पत्रकारिता सोडीन,’ असा दावा अजून तरी कोणी केल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी संन्यास घेण्याची भाषा कुठे केली होती, त्याही व्हिडीओचा शोध सुरू आहे, अशी माहिती आहे. हा व्हिडीओ शोधून देणाऱ्याला वेगळे बक्षीस देऊ, असे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्याने सांगितल्याची खात्रीशीर बातमी आहे. असो.
पण या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील माझ्यासारख्या छोट्या माणसाला काही प्रश्न पडले आहेत. त्यांची उत्तरे कोण देणार…? भाजपला एवढ्या कमी जागा मिळाल्या, त्यात भाजप नेत्यांनीच एकमेकांचा कार्यक्रम केला का? काँग्रेसचे नेते एकमेकांचे असे कार्यक्रम करण्यात माहीर होते. त्यातले अनेकजण सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांना शांत झोपही लागत आहे. त्यामुळे अशा काहींनी हा कार्यक्रम केला नसेल कशावरून…? आमच्या पक्षात मूळ भाजपचे कोण आणि बाहेरून आलेले भाजपवाले कोण याच्या एकदा याद्या करा; कारण जुन्या लोकांना आपण भाजपमध्ये आहोत की नाही हा प्रश्न आहे; तर नव्याने भाजपमध्ये आलेल्यांना आता कुठल्या पक्षात जायचे की इथेच राहायचे? असा प्रश्न पडलेला आहे. तसेही याद्या करणे, सर्व्हे करणे, चिंतन करणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या आधी करा.
सध्या निबंध लिहायला लावण्याचे दिवस आहेत. आपल्या पक्षातही एखादी निबंध स्पर्धा घ्या. आम्ही काही विषयही काढून ठेवले आहेत. तुम्हाला चालतील का बघा… अजित पवार यांना भाजपसोबत घेण्याचे फायदे-तोटे, मुनगंटीवार यांच्या भाषणाचे फलित, अशोक चव्हाण – एक आदर्श नेतृत्व, विधानसभेचे नेतृत्व कोणाकडे… किरीट सोमय्या यांचे फायदे जास्त की तोटे जास्त..? आपल्या पक्षात येण्यामुळे कोणाची रात्रीची झोप व्यवस्थित सुरू झाली आहे, याचाही अंदाज घेणारी यंत्रणा उभी करता येईल का..?
बसल्या-बसल्या काही सूचना डोक्यात आल्या. त्या तुम्हाला सांगतो. पटल्या तर अंमलात आणा. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, आपल्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीचा भारी कार्यक्रम झाला. शिवसेनेमध्ये फूट पडली. आपल्या सोबत न येणाऱ्यांनी चांगले यश मिळवले. काँग्रेस फुटली नाही म्हणून ते सगळ्यांत पुढे गेले. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत काँग्रेसमध्ये फूट पाडता येईल का…? उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडून आले. त्यांच्या पुन्हा दोन शिवसेना करता येतील का..? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तीन शिवसेना लोकांसमोर जातील… लोकसभेला दोन शिवसेनेमध्ये मस्त लढत लावून दिली. तशीच आता उद्धवसेना आणि मनसे म्हणजे दोन ठाकरेंमध्ये लढाई लावू शकतो का? मुंबईत आपण तीन जागा लढवल्या; त्यांत दोन जागा गुजराती नेत्यांना दिल्या. तिसरी जागा मुंबईबाहेरच्या नेत्याला दिली. विधानसभेलाही असेच काही करता येईल का… आपण कोणालाही उमेदवारी दिली तरी मराठी मतदान आपल्यालाच पडते. त्यामुळे फार चिंता करू नका.
जाता-जाता… ज्यांनी काम केले नाही, अशा नेत्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्यावर उगाच रागावू नका. लोकसभेला ज्यांनी कोणी आपल्यासाठी सर्व्हे केले होते त्यांच्याकडूनच विधानसभेचेही सर्व्हे करून घ्या. अजितदादांच्या गटाला जागा देण्यापेक्षा आख्खा गटच आपल्या पक्षात विलीन होतो का? ते बघा. तसे झाले तर बरे होईल, असे दादा कुणालातरी म्हणत होते, अशी चर्चा आहे… असाच फॉर्म्युला शिंदे गटासोबत वापरता येईल का? त्यांच्यातले अनेकजण हल्ली देवाला रोज कमळाचे फूल वाहतात, अशी माहिती आहे; तर काहीजण देवापुढे मशालही पेटवतात, असे वृत्त आहे. आपल्याला सगळी माहिती असतेच म्हणा… आपलाच गुणी आणि शांतपणे सहन करणारा मतदार म्हणजे….
– तुमचाच,
बाबूराव
Comments