उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी
उद्धव ठाकरे यांना १० जागी यश कसे मिळाले? काँग्रेस फक्त ३ जागांवरच का थांबली? आणि भाजपने मुंबईत भरघोस यश कसे मिळवले? याचे विश्लेषण येत्या काळात वेगवेगळ्या प्रकारे होत राहील. मात्र, आता निवडणुकीच्या निकालानंतर उद्धवसेनेला आणि काँग्रेसला काही कटू गोष्टी नुसत्या ऐकाव्या लागतील, असे नाही तर त्यानुसार स्वतःमध्ये बदलही घडवून आणावे लागतील. ही निवडणूक जिंकण्यासाठी लढवली की फक्त स्वतःच्या दोन-तीन लोकांना तिकिटे मिळवून देण्यासाठी, याचे उत्तर सगळ्यात आधी मुंबई काँग्रेसला द्यावे लागेल.
निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागितला आहे. भाई जगताप यांच्या मनातली खदखद आजची नाही. मुंबई काँग्रेसला शापच आहे जो अध्यक्ष होतो, त्याचे पाय ओढण्यासाठी माजी आणि भावी अध्यक्ष काम करू लागतात. अध्यक्षाने सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. ती कधीच कोणत्या अध्यक्षांनी अंमलात आणली नाही. विद्यमान अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी तर ‘मी, माझी बहीण, माझे कुटुंब’ एवढी मर्यादित भूमिका घेतली. नेते, कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात अर्थ नाही.
मुंबईतल्या ११ पैकी किती उमेदवारांसाठी वर्षा गायकवाड यांनी बैठका घेतल्या? त्या त्या ठिकाणी सभा घेतल्या? त्यांच्यासाठी पूर्ण वेळ दिला..? तन-मन-धनाने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा मैदानात उतरले आहेत, असे चित्र किती मतदारसंघात दिसले? मुंबईतल्या अनेक नेत्यांना सोबत घेण्याची भूमिका त्यांनी बजावली का? रवी राजासारखा नेता सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडून येऊ शकत असताना त्यांनी पक्ष सोडण्याची टोकाची भूमिका घेतली. त्यावर ते गेल्याने काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली होती. अशाने पक्ष कसा वाढणार? विनोद यादव हे गेल्या निवडणुकीत पराभूत झाले होते, त्यांना पुन्हा तिकीट देण्याऐवजी रवी राजा यांना उमेदवारी दिली असती तर ती जागा निवडून आली असती. हे सगळ्यांनी सांगून पाहिले. मात्र, वर्षा गायकवाड यांनी ते ऐकले नाही. कारण, यादव सायन कोळीवाडा आणि त्याला लागून असणाऱ्या धारावी परिसरात वर्षा गायकवाड यांचे होर्डिंग लावतात. नेत्यांच्या मागेपुढे करतात, असा आक्षेप इतर अनेक नेत्यांनी जाहीरपणे घेतला होता. तरीही त्यांनाच उमेदवारी दिली गेली.
वर्सोवा आणि भायखळा हे दोन मतदारसंघ उद्धवसेनेने भांडून मागून घेतले. त्या ठिकाणी त्यांचे दोन उमेदवार निवडून आले. वर्षा गायकवाड पूर्ण वेळ धारावी नाहीतर मातोश्री एवढ्या मर्यादित राहिल्या. मुंबई काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरेंना शरण गेली होती, असे आक्षेपही नेत्यांनी घेतले. मात्र, ते खोडून काढत स्वतःची वेगळी मोठी लाईन ओढण्याचे काम वर्षा गायकवाड यांना करता आले नाही. जागावाटपाची किंवा निवडणूक प्रचाराच्या तयारीची बैठक ३ वाजता होणार असेल तर आम्हाला पावणेतीनला बैठकीला या, असा निरोप यायचा. याचा अर्थच आम्ही बैठकीला पोहोचू नये, असाच असायचा. अशा शब्दांत भाई जगताप यांनी स्वतःची नाराजी बोलून दाखवली. मुंबईत ११ पैकी किमान ६ तरी जागा आपल्याला जिंकायच्याच आहेत, अशी जिद्द एकाही नेत्यांमध्ये नव्हती. आम्हाला कोणी कामच सांगत नाही, असे म्हणून अनेक नेते घरी बसून राहिले.
संतांची काही बोलकी उदाहरणे सांगायची झाली तर अमीन पटेल आणि अस्लम शेख स्वतःच्या ताकदीवर निवडून आले. ज्योती गायकवाड यांच्यासाठी धारावीचा मतदारसंघ परंपरेने त्यांच्या कुटुंबात असल्यामुळे त्या निवडून आल्या. वरुण सरदेसाई वांद्रे पूर्वमधून निवडून आले. त्यांना मुस्लीम समाजाची मते मिळाली. मात्र, त्याला लागून असणाऱ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांना फक्त मुस्लीम समाजाची मते मिळाली. हिंदू मते त्यांना मिळालीच नाहीत. चांदिवली मतदारसंघात नसीम खान यांच्याही मतदारसंघात तसेच झाले. मात्र, त्या ही ठिकाणी असणारी उद्धव ठाकरेंची हिंदुत्ववादी मते नसीम खान यांना मिळाली नाहीत. काँग्रेसकडे दलित, मुस्लीम मते गेली; पण त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांची मते काँग्रेसला मिळालीच नाहीत. ती मिळावी म्हणून काँग्रेसने जाणीवपूर्वक कसलेही प्रयत्न केले नाहीत.
दुसरीकडे ओबीसी समाज पूर्णपणे भाजपसोबत राहिला त्यामुळेही काँग्रेसचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांनी ३६ पैकी २२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १० उमेदवार मुंबईत विजयी झाले. एवढेही यश काँग्रेसला मिळवता आले नाही. नव्या वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील. वर्षानुवर्ष मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राज्य होते. १० आमदार निवडून आले तरीही मुंबई महापालिका ठाकरे यांना मिळेलच, असे कोणतेही चित्र आज तरी दिसत नाही. या निकालानंतर स्वतःला झोकून देत उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघांनी मुंबई पिंजून काढली आणि आपल्या स्वभावाला मुरड देत संपर्क वाढवला तर हेही दिवस बदलू शकतात; पण त्यांना स्वभावाला मुरड घालता येईल का, हा खरा प्रश्न आहे. ईव्हीएम मशीनला दोष देणे सोपे आहे. मात्र, एक बोट ईव्हीएमकडे दाखवताना बाकीची चार बोटे आपल्याकडे आहेत, याचे भान मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना आले तरी पुरेसे आहे.
Comments