वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध
अतुल कुलकर्णी
वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?: काही वर्षांपूर्वी मुंबईत सर्व ६ खासदार काँग्रेसचे होते. विधानसभेच्या ३६ जागा काँग्रेसने लढवल्या होत्या. ती काँग्रेस आघाडीच्या राजकारणात संकुचित झाली. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा प्रवेश झाला. आघाडीचे राजकारण सुरू झाले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीमुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेने मुंबईवर राज्य करायचे आणि उर्वरित महाराष्ट्रावर काँग्रेस-राष्ट्रवादीने असा अलिखित नियम बनला.
२०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप विरोधात एकत्र आले. तो राग मनात ठेवून भाजपने शिवसेनेला कमी करण्याचा चंग बांधला. शिवसेनेतच फूट पडली. एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र लोकसभेच्या निकालाने चित्र बदलले. ज्या शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्या शिवसेनेच्या दोन गटाने ६७ पैकी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. ज्या भाजपसोबत शिवसेनेचा एक गट गेला त्या भाजपचे मात्र अवघे ३४ उमेदवार रिंगणात आहेत.
कोणी, कशासाठी काय केले आणि त्याचे पुढे काय झाले हे समजण्यासाठी एवढा तपशील पुरेसा ठरावा. मुंबई ३६, ठाणे १८, पालघर ६, रायगड ४ आणि मावळ ३ अशा ६७ जागा महामुंबईत येतात. सरकार कोणाचे बनवायचे हे ठरवण्याची क्षमता या ६७ जागांमध्ये आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू झाले तेव्हा या पक्षाची ज्या भागात जास्त ताकद आहे त्या ठिकाणी त्यांना जास्तीच्या जागा द्यायच्या असा निकष ठरवला गेला. त्यातून विदर्भात काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मुंबईसह कोकणात उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जास्तीच्या जागा लढवेल असे ठरले.
त्यानुसार मुंबईत काँग्रेसने ११ जागा घेतल्या तर उद्धवसेनेने २२ जागी उमेदवार उभे केले. ठाण्यातही काँग्रेसने २ जागा घेत उद्धव सेनेला १० जागा दिल्या. काँग्रेसने कमी जागा घेतल्याची टीका होत असतानाही काँग्रेसने स्वतःला छोटे करत उद्धव सेनेला जास्तीच्या जागा दिल्या.
रायगड जिल्ह्यातल्या ४ आणि मावळ मधील ३ पैकी उद्धव सेना आणि शेकापने प्रत्येकी ३ उमेदवार उभे केले. शरद पवार गटाने १ जागा घेतली. तर काँग्रेसने या भागात एकही जागा घेतली नाही.
महायुतीत भाजपने मुंबईत तर शिंदे गटाने ठाण्यात जास्तीच्या जागा घ्यायच्या असा सूर होता. प्रत्यक्षात मुंबईत भाजपने १८ आणि तर शिंदे सेनेने १४ जागी उमेदवार दिले.
ठाण्यातही भाजपने ९ जागा घेतल्या तर शिंदे सेनेला ७ जागा दिल्या. रायगड मावळमध्ये भाजप आणि शिंदे सेनेने प्रत्येकी ३ जागा तर अजित पवार गटाने १ उमेदवार दिला.
पहिल्यांदा मनसेने ६७ पैकी ५० जागी उमेदवार उभे केले आहेत. त्यातील ४९ उमेदवार शिंदे सेना, भाजप आणि अजित पवार गटाच्या विरुद्ध उभे आहेत. मात्र त्या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवारांचेही उमेदवार आहेत.
याचा अर्थ राज यांचे उमेदवार कोणाची, किती मतं घेतील त्यावर भाजप, शिंदे सेनेचे चित्र स्पष्ट होईल. पण भाजप-शिंदेसेनेतल्या वर्चस्वाच्या लढाईत आपला फायदा होईल असे मनसेला वाटते. ते किती खरे किती खोटे हे २३ तारखेला कळेल..!
महाविकास आघाडी अनुकूल बाबी
– मुंबईत ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना लाभ होऊ शकतो.
– मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा कल.
– धारावी पुनर्वसन, महापालिकेच्या ठेवींना लागलेली गळती, डायमंड मार्केट सुरतला जाणे हे मुद्दे फायद्याचे.
– उद्धव सेनेची शाखा निहाय काँग्रेसची बूथ निहाय फळी फायद्याची. महाविकास आघाडी प्रतिकूल बाबी
– ठाणे जिल्ह्यात नेतृत्व असणारा एकही नेता काँग्रेस, उद्धव सेनेकडे नाही.
– रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा उमेदवार नसल्याने काँग्रेस नेते अन्य दाेघांच्या प्रचारात सहभागी दिसत नाहीत.
– मनसेने ५० ठिकाणी उमेदवार उभे केले. महाविकास आघाडीसाठी तो डोकेदुखीचा विषय आहे.
महायुती अनुकूल बाबी
– मुंबईत मनसेच्या उमेदवारीमुळे भाजप शिंदे सेनेला मतविभागणीचा फायदा.
– लाडकी बहीण योजनेचा प्रसार फायद्याचा ठरणार.
– एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी महामुंबई अनेक सभा घेतल्या त्याचा फायदा होईल.
– अजित पवार गटाने चार मुस्लिम उमेदवार दिल्याने महायुतीला आशा. महायुती प्रतिकूल बाबी
– कटेंगे, बटेंगे हा मुद्दा मुंबई ठाण्यात अडचणीचा ठरला आहे.
– सर्व ६७ मतदार संघात एक गठ्ठा मुस्लिम मतदान व त्यात हिंदू मतदान जोडले गेल्यास चित्र बदलू शकते.
– गुजरात मध्ये उद्योग नेण्याला सक्षम उत्तर न देत आल्याचा विपरीत परिणाम.
चित्र असे बदलत गेले
२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर अशा ६७ विधानसभा पैकी ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. आघाडीच्या राजकारणात काँग्रेस दिवसेंदिवस संकुचित होत गेली. २०२४ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
२०१४ च्या विधानसभेत ६० जागा, २०१९ च्या विधानसभेत ४४ जागा आणि २०२४ ला काँग्रेसच्या वाट्याला १५ जागा आल्या.
ज्या काँग्रेसचे एकेकाळी मुंबईत ६ खासदार निवडून आले होते, ती काँग्रेसची आघाडीच्या राजकारणामुळे हळूहळू कमी होत गेली. २०२४ मध्ये त्याच काँग्रेसचा मुंबईत फक्त १ खासदार निवडून आला.
काँग्रेस सारखी बिकट अवस्था शिवसेनेची झाली नाही. २०१४ मध्ये शिवसेनेने ६१ उमेदवार उभे केले होते. २०१९ मध्ये ती संख्या ३८ वर आली. आता २०२४ मध्ये उद्धव ठाकरे गटाने ३७ जागी उमेदवार उभे केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यांनी ६७ पैकी २६ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. याचा दुसरा अर्थ, ज्या शिवसेनेला संपवण्यासाठी सगळे राजकारण केले गेले. ती शिवसेना दोन गटांच्या माध्यमातून २०२४ च्या विधानसभेत ६७ पैकी ६३ ठिकाणी निवडणूक लढवत आहे. भाजप मात्र ६७ पैकी फक्त ३४ जागा लढवत आहे.
ज्या मनसेने २०१४ मध्ये मुंबई ठाण्यात ४५ उमेदवार उभे केले होते त्यांनी आता ४१ उमेदवार उभे केले आहेत.
मुंबईत मनसेला २००९ ला मिळालेले यश नंतर मिळवता आले नाही. ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’ या घोषणेत बदल झाला नाही.
महाराष्ट्रावर राज्य करणारी शरद पवारांची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी देशाच्या आर्थिक राजधानीत मात्र स्वतःचे स्थान इतक्या वर्षांनी ही तयार करू शकली नाही.
इथे उमेदवारी नाही
शिवडी मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिला नाही. त्यांनी तेथे मनसेचे बाळा नांदगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांची लढत उद्धव सेनेचे उमेदवार अजय चौधरी यांच्या सोबत होईल.
या मतदारसंघात बंडखोरी
पनवेल आणि पेण या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.
या मतदारसंघात बंडखोरी
पनवेल आणि पेण या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील शेकापच्या उमेदवाराविरुद्ध ठाकरे सेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.
अशा होताहेत लढती
महायुतीचे उमेदवार
– भाजपचे उमेदवार ३४
काँग्रेस विरुद्ध १२
राष्ट्रवादी शपविरुद्ध ०५
उद्धवसेने विरुद्ध १४
शेकाप विरुद्ध ०२
माकप विरुद्ध ०१
– शिंदेसेनेचे उमेदवार २६
काँग्रेस विरुद्ध ०३
उद्धव सेना विरुद्ध २१
सपा/शेकाप विरुद्ध प्रत्येकी ०१
– अजित पवार गट उमेदवार ०६
राष्ट्रवादी शपविरुद्ध ०५
सपाविरुद्ध ०१
महाआघाडीचे उमेदवार
– काँग्रेसचे उमेदवार १५
भाजप विरुद्ध १२
शिंदे सेना विरुद्ध ०३
राष्ट्रवादी अप विरुद्ध ००
– उद्धवसेनेचे उमेदवार ३७
भाजप विरुद्ध १५
शिंदे सेना विरुद्ध २०
राष्ट्रवादी अप विरुद्ध ०१
– शरद पवार गटाचे उमेदवार ०९
भाजप विरुद्ध ०५
राष्ट्रवादी अप विरुद्ध ०४
मनसेचे उमेदवार ५०
शिंदे सेना विरुद्ध १९
भाजप विरुद्ध २४
राष्ट्रवादी अप विरुद्ध ०६
काँग्रेस विरुद्ध ०८
उद्धवसेने विरुद्ध २९
राष्ट्रवादी शप विरुद्ध ०९
सपाविरुद्ध ०२
माकप विरुद्ध ०१
शेकाप विरुद्ध ०१
महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मधून उभे आहेत. त्यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे उद्धव ठाकरे गटाकडून उभे आहेत.
उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य वरळी मधून आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित माहीम मधून मैदानात आहेत. या दोन्ही लढतीकडे देशाचे लक्ष आहे.
ठाकरे गटाविरुद्ध निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा मधून नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे हिरा देवासी उभे आहेत.
मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, आदिती तटकरे महायुतीचे हे तीन मंत्री महामुंबईतून निवडणूक रिंगणात आहेत.
Comments