बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

महाविकास आघाडीची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर


मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मावळचे तीन असे अशा ६७ मतदार संघापैकी तब्बल ३७ जागी उमेदवार उभे करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर महाविकास आघाडीची सगळी भिस्त आहे. कधीकाळी मुंबईच्या ३६ विधानसभेत उमेदवार देणाऱ्या काँग्रेसने ६७ पैकी फक्त १५ जागी उमेदवार दिले आहेत. जागा वाटपाच्या तहात काँग्रेसने स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा या बेल्ट मधला परफॉर्मन्स पूर्णपणे शिवसेनेच्या भरवशावर आहे. काही ठिकाणी ठाकरे गटाने निष्कारण आग्रह करून जागा पदरात पाडून घेतल्या खऱ्या पण जर त्या जिंकल्या नाहीत, तर महाविकास आघाडीलाच त्याचा फटका बसेल असे आता काँग्रेसचे नेते बोलू लागले आहेत. मात्र मुंबई, कोकणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, विदर्भात काँग्रेस, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी प्रबळ असल्यामुळे त्यांना त्या त्या ठिकाणी जास्तीच्या जागा द्यायच्या असे सूत्र ठरले होते. त्यानुसारच हे जागावाटप झाल्याचे ठाकरे गटाचे नेते सांगत आहेत.

मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ मिळून ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी ठाकरे गट २२, काँग्रेस ११, शरद पवार राष्ट्रवादी २ तर समाजवादी पक्ष एका जागेवर नशीब आजमावत आहे. तर मुंबईत भाजपने १८, शिंदे गटाने १४ आणि अजित पवार गटाने ३ अशा ३५ जागी उमेदवार उभे केले आहेत. शिवडीच्या जागेवर महायुतीचा निर्णय न झाल्यामुळे तिथे उमेदवारच दिला गेला नाही. त्यामुळे त्या जागी मनसेचे बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याचे महायुतीने जाहीर केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघ मिळून १८ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी ठाकरे गट १०, काँग्रेस २, शरद पवार राष्ट्रवादी ५ तर समाजवादी पक्ष एका जागेवर नशीब आजमावत आहे. तर भाजपने ९, शिंदे गटाने ७ आणि अजित पवार गटाने २ जागी उमेदवार उभे केले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीचे हे चित्र असताना राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ५० जागी उमेदवार उभे केले आहेत. भाजप, उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना आणि काँग्रेस या सगळ्यापेक्षा जास्त उमेदवार मनसेचे आहेत. एकट्या मुंबईत ३६ पैकी २७ ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले आहेत. मनसेने हे उमेदवार कोणाच्या फायद्यासाठी उभे केले की स्वतः निवडून येण्यासाठी उभे केले याचे उत्तर २३ तारखेला निकालानंतर मिळेल. मात्र एकमेकांशी ज्या लढती होणार आहेत, त्या पाहिल्या तर वेगवेगळी राजकीय समीकरणे समोर दिसू लागतील. मनसेचे उमेदवार किती मतं घेतात, त्याहीपेक्षा ते उद्धव ठाकरे यांची मते कमी करतात की शिंदेसेनेची हा कळीचा मुद्दा आहे.

ठाकरे शिवसेना / भाजप / मनसे : अशी लढत मुंबईतल्या ८ विधानसभा मतदारसंघात होत आहे. त्यात वडाळा, घाटकोपर पश्चिम, कलिना, विलेपार्ले, वर्सोवा, गोरेगाव, दहिसर आणि बोरिवली या मतदारसंघांचा समावेश आहे. अशीच लढत ठाण्यातल्या ठाणे, ऐरोली आणि उरण या तीन मतदारसंघात होत आहे. अशीच लढत उरण विधानसभेतही होत आहे. याचा अर्थ मनसेचे उमेदवार १२ मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारावर थेट परिणाम करू शकतात. जर मनसेचे उमेदवार निवडून आले तरी ठाकरे शिवसेनेचा पराभव आहे. तसेच भाजपचे उमेदवार निवडून आले तरीही ठाकरे सेनेचाच पराभव आहे. त्यामुळे या १२ जागा पैकी किती जागा ठाकरेंची शिवसेना जिंकेल यावर भाजप, मनसेचे चित्र अवलंबून असेल.

ठाकरे शिवसेना / शिंदे शिवसेना / मनसे : अशी लढत मुंबईतल्या ९ मतदारसंघात होत आहे. त्यात वरळी, माहिम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे यांचा समावेश आहे. अशीच लढत ठाण्यातल्या ४ मतदारसंघात होत आहे. ज्यात ओवळा माजीवडा, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम यांचा समावेश आहे. त्याशिवाय पालघर, बोईसर आणि कर्जत या ३ मतदारसंघातही यांच्यात लढत होईल. याचा अर्थ १६ मतदारसंघांमध्ये ठाकरे सेना, शिंदे सेना आणि मनसे लढत होईल. इथेही मनसेचे उमेदवार किती मतं घेणार यावर दोन्ही शिवसेनेचे भवितव्य अवलंबून असेल.

गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे सातत्याने भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि त्यात मनसेची महत्वाची भूमिका असेल असे सांगत आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदे सेनेच्या सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी असा आग्रह अजूनही भाजपने सोडलेला नाही. मात्र कोणतीही चर्चा न करता मनसेने परस्पर माहीमची उमेदवारी जाहीर केली असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माहीमच्या जागेचे काय होणार यावर महामुंबईतल्या जवळपास २८ जागांच्या बाबतीत ‘घडले बिघडले’ होऊ शकते.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही. ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड आणि लोकसभेला निवडून आलेले सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे वगळता राष्ट्रवादीला फारसा स्कोप नाही. काँग्रेसची अवस्था फार वेगळी नाही. अशा स्थितीत काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांना सोबत घेऊन, रायगड जिल्ह्यात शेकापची साथ घेत ठाकरे यांना जागा जिंकून दाखवाव्या लागतील. दुसरीकडे अजित पवार गटाचीही महामुंबई विशेष ताकद नाही पण भाजप आणि शिंदे गटांमध्ये प्रचारात समन्वय दिसून येत आहे. दोघांचीही मते एकमेकांना व्यवस्थित ट्रान्सफर होतील अशी आजची स्थिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महा मुंबईचे निकाल काय लागतील हे पाहणे महाराष्ट्रासाठी उत्सुकतेचे असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *