
माझी मैत्रीण, सुकन्या…!
(नवरात्रीच्या चौथ्या माळेच्या निमित्ताने)
– अतुल कुलकर्णी

आमची ओळख कुठे झाली, कधी झाली आता आठवतही नाही. मात्र आमच्या मैत्रीला जवळपास ३० वर्षे झाली. सुकन्या नाटकाच्या निमित्ताने औरंगाबादला आली की ती आमच्याकडे थांबायची आणि मी मुंबईत आलो की, तीच्या दादरच्या घरी… घर छोटं असलं तरी मनानं खूप मोठी असणारी माणसं त्या घरात रहात होती. सुकन्याचा दादा माधव, वहीनी, ताई, बाबा आणि प्रेमानं गरम गरम जेवायला देणारी आई. ते सगळे दिवस मला अगदी काल घडल्यासारखे आठवतात. मी आणि दीपा, (माझी बायको) लग्न करणार आहोत हे तीने माझ्या घरी सगळ्यात आधी सांगितलं होतं… आणि संजय सुकन्या लग्न करणार हे देखील सगळ्यात आधी मला माहिती होतं…
आमची मैत्री तीने टिकवली. जपली. अर्थात आमच्या मैत्रीत माझी पत्नी दीपा सहभागी झाली आणि त्यामुळे ती वाढली… म्हणूनच आमच्या दोघातली निखळ मैत्री पुढे दोन परिवाराची झाली. गार्गी, ज्यूलिया, संजय आणि दीपा या फॅमिलीचे भाग झाले. नवरात्रीच्या निमित्ताने चौथ्या माळेच्या दिवशी आज हे सगळं लिहीत आहे. अर्थात विषय आमच्या दोघांच्या मैत्रीचा नाही, पण या एवढ्या काळात मी पाहिलेली सुकन्या, संघर्षाचं मूर्तीमंत उदाहरण आहे.
आलेल्या असंख्य संकटांचा तीने हिमतीने मुकाबला केला. तीला त्यावेळी सगळेजण प्रती स्मिता पाटील म्हणायचे. कुसूम मनोहर लेले नाटकातला तिचा अभिनय पहाताना अंगावर शहारे उभे रहायचे. तिचा सरफरोश सिनेमा आला आणि तीला अनेक ऑफर येऊ लागल्या, पण साचेबंद भूमिकेत मी अडकणार नाही, असे म्हणत तीने सगळ्या भूमिका नाकारल्या.
तीने ५ हिंदी, १२ मराठी सिनेमे केले. मराठी, हिंदी मिळून ३० मालिका केल्या. असंख्य नाटकं केली. आभाळमाया, जुळून येती रेशीमगाठी, या तिच्या गाजलेल्या मालिका. ती ‘शांती’ नावाची त्याकाळी गाजलेली मालिका करत होती. त्या मालिकेत खूप सारे कलाकार होते पण सुकन्या ठळकपणे लक्षात राहीली ती आजपर्यंत. माझ्या मिसेसचा सख्खा लहान भाऊ नरेंद्र राहूरीकर आता खूप मोठा कला दिग्दर्शक आहे. रोहीत शेट्टीच्या सगळ्या फिल्म्स त्याने केल्या आहेत. जवळपास ५० हून अधिक सिनेमे त्याने केले. पण त्याला त्यावेळी समीर चंदा या नामवंत कला दिग्दर्शकासोबत जोडून देण्याचे काम सुकन्याने केले होते. त्याने पुढे त्याच्या मेहनतीने सगळं काही मिळवलं. पण त्याला ब्रेक देण्याचे काम सुकन्याने केले होते.

तीला कधी स्वत:ची दु:ख दुसऱ्याला सांगत बसायची सवय नाही. ती सगळ्या गोष्टी मनातल्या मनात ठेवते. तीला त्याबाबतीत बोलतं करावं लागतं. मनात काही खंत असेल तर तीचा स्वर काहीसा खालच्या पट्टीत लागतो, तेवढीच काय ती तिची नाराजी दाखवून देण्याची सवय. एवढ्या वर्षात तिला थायरॉईडने खूप त्रास दिला. त्यातून वजन वाढले, चिडचिड होणे सुरु झाले, पण तीने त्याही परिस्थितीत स्वत:वर नियंत्रण ठेवले. स्वत:चे कुटुंब, नवरा असलेल्या हरफनमौला कलावंत संजय मोने आणि या दोघांची मुलगी ज्युलिया या सगळ्यांना तीने अत्यंत निगुतीने सांभाळले. संजयला वाढदिवस साजरा करणे आवडत नाही, पण त्याच्या यावर्षीच्या वाढदिवसासाठी तिने चालवलेली अफलातून तयारी कोरोनाने हाणून पाडली. काही हरकत नाही… फिर कभी…
तिच्या पेक्षा मी थोडा मोठा आहे… पण थायरॉईडमुळे वजन वाढलेलं असतानाही तीनं स्वत:चा ५० वा वाढदिवस ‘अरंगेतरम’ करुन साजरा केला होता. पुढे जाऊन अमेरिकेतही त्याचे तीने ११ प्रयोग केले. ती कविता खूप छान करायची. मी त्यावेळी लोकमतच्या चित्रगंधा पुरवणीचे काम पहात होतो. त्या कविता वाचून मी तीला कॉलम लिहायला भाग पाडलं. खूप सुंदर कॉलम लिहीला होता तीने त्या काळात…
आजही मालिकांमध्ये भूमिका करताना तीचे एखादे काम आवडले म्हणून फोन केला तर ती खूष होत नाही, उलट मला तो सीन आणखी वेगळा करुन पहायला हवा होता… मी खूप डिस्टर्ब होते, बरोबर झाला का रे… असं विचारते तेव्हा तिच्यातली अभिनेत्री आजही एवढ्या वर्षांनी नव्याचा ध्यास घेण्यासाठी किती आसुसलेली आहे हे लक्षात येते. तिला तीच्यावरच्या संकटांची उजळणी आवडत नाही, म्हणून ती येथे मी पण देत नाही. पण तीचे काही गूण नक्की सांगतो. ती अत्यंत गुणी कलावंत आहे. मनस्वी आहे. आजही अपार कष्ट घेण्याची तिची तयारी असते. आपल्याच कामाचं ती स्वत:च परिक्षण करत रहाते. रोज नव्याने स्वत:ला आजमावत रहाते. तिच्यात टोकाचे पेशन्स आहेत. आपण नावाजलेल्या अभिनेत्री आहोत, असा अहंपणा तिच्यात नाही… या सगळ्या गुणांमुळेच तर आमची आजही निखळ मैत्री कायम आहे… ऑल द बेस्ट सुकन्या…!

Comments