मध्यमवर्गीय मानसिकतेच्या संघर्षावर मात करणारी गायिका !
माझी मैत्रीण, वैशाली सामंत
(नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या निमित्ताने)
– अतुल कुलकर्णी
मुंबईत पार्ल्यासारख्या सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत श्रीमंत भागात राहणारी ती. तीच्या आईने कधी तिला चूल आणि मूल एवढेच कर असा आग्रह कधीही धरला नाही. तिच्या आजीने तिला कधी किचनमध्येही येऊ दिले नाही. तीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडीलांनी तीला पूर्ण मोकळीक दिली. अट एकच होती की आधी शिक्षण पूर्ण कर. तीने ते केले देखील. वडीलांनी जबाबदारीची जाणीव दिली. तिच्या आईला वाटायचे की, हीला जे करीयर करायचे आहे त्यात तिला कोणी फसवणार तर नाही ना… अर्थात कोणत्याही आईला जी भीती असते तीच तीच्या आईला पण होती, मात्र ती खूप धाडसी निघाली. मरिन बायॉलॉजिस्टची ती पदवीधर झाली. प्रोफेसर पदाची चालून आलेली ऑफर असताना तीने गायिका होण्याचे पक्के ठरवले. मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी गायिका कशी होणार? हाच तिच्यापुढे खरा संघर्ष होता. त्यावर मात करत तीने आपली वाट निवडली. थोडी खडतर होती, पण मेहनतीच्या जोरावर आणि घरच्यांच्या पाठींब्यावर तीने प्रवास केला आणि आपल्या आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रच नाही तर देशात आणि जगभरात स्वत:चे वेगळे नाव तयार केलं. ती आहे, मराठी घरातून पुढे आलेली तुमची आमची; आवडीची गायिका वैशाली सामंत…!
वैशालीची आणि माझी ओळख औरंगाबादेत एकदा ती नवरात्रीच्या कार्यक्रमात आली तेव्हाची. त्याला आता २० वर्षे होऊन गेली. मैत्री झाली आणि ती तीने देखील टिकवली. या मैत्रीतून आमची पारिवारिक मैत्री कधी झाली तेही कळाले नाही. वैशालीचा नवरा राजू, माझी पत्नी दीपा असे एक पारिवारिक मैत्र तयार झाले. आज वैशालीच्या संघर्षाची कहाणी नवरात्रीच्या सहाव्या माळेच्या निमित्तानं.
तीला गायिका व्हायचे होते. घरात कलेचे वातावरण होते. कोणी कविता करायचे, कोणी गायचे, पण व्यावसायिक पध्दतीनं कोणी गाणारे नव्हते. ती कमी वैशालीने दूर केली. नंदू होनप संगीतकार, अलका कुलब यांचा ‘त्याग’ हा पहिला चित्रपट. त्यात वैशालीने ‘साथ तुझी ही जन्मोजन्मी’ हे गाणं गायलं. ते तिचं सेव्हन्टी एमएम स्क्रीनवरचं पहिलं गाणं. या काळात स्वत:ला आर्टिस्ट म्हणून सिध्द करताना तीचा स्वत:शीच मानसिक झगडा सुरु होता. आपल्या इतर गायिकांसारखे एक व्हायचे आहे की स्वत:ची वेगळी वाट निवडायची आहे हा प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. तो काळ कॅसेट आणि अल्बम ऐकण्याचा काळ होता. लोक कॅसेट विकत घेऊन ऐकायचे. त्यावेळी वैशालीने मुंबईत नव्यानेच सुरु झालेल्या सागरिका कंपनीसाठी गाणी गायला सुरु केले.
सागरिका ही मुळची कलकत्याची कंपनी. सागरिका दास ही कंपनीची सर्वेसर्वा. १९९६ पासून वैशालीने या कंपनीसाठी गाणी गायला सुरुवात केली होती. तेव्हा वैशालीचा आवाज ऐकून सागरिकाने तीला तुझा आपण अल्बम करु असे सांगितले. पण त्यासाठी तुला काही गोष्टी टाळाव्या लागतील असे तिला सांगण्यात आले. त्यातली पहिली आणि शेवटची महत्वाची अट होती ती म्हणजे अल्बम येईपर्यंत कोणतेही दुसरे गाणे गायचे नाही. थोडक्यात काय तर गाण्याचा अल्बम येईपर्यंत गायचं नाही. २००० ते २००३ या काळात वैशाली फक्त आणि फक्त एकाच अल्बमवर काम करत राहीली. त्यावेळी तीची ओळख अवधूत गुप्ते सोबत झाली. तिची स्वत:ची आठ गाणी असलेला अल्बम २००३ साली आला आणि त्या अल्बमने वैशालीला, सागरिका कंपनीला आणि अवधूत गुप्तेला घराघरात नेले. तो अल्बम होता, ‘ऐका दाजिबा’.
त्या एका अल्बममुळे महाराष्ट्राला नवी गायिका मिळाली. तीन वर्षे मौन पाळले त्याचा फायदा झाला. संगीतकार वैशालीसाठी गाणी लिहू लागली. त्यातून, चमचम करता है ये नशिला बदन, कोंबडी पळाली.., ती गुलाबी हवा… अशी वैशालीची अनेक गाणी गाजू लागली. लोक गुणगुणू लागले.
मला आठवतं, तीच्या एका अल्बममधले एक गाणे आहे,
हो अशी कोकणची चिडवा हो नाखवा…
हो हिच्या गोवाला कोकण दाखवा…
हे गाणं माझी मुलगी गार्गी लहान असताना बोबड्या आवाजात म्हणायची तेव्हा आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. तशा अर्थानं गार्गीच्या गळ्यावर थोडा तरी ‘वैशाली संस्कार’ झाला म्हणायचं…!
अशा गाण्यानंतर तीला हिंदीत ए.आर. रहेमान यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. ‘लगान’ चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले’ या गाण्यातील क्लासीकल आलाप तिने गायला. पुढे ‘साथियां’ चित्रपटातील ‘छलका, छलका…’ ‘रांझना’ चित्रपटातील ‘ए सखी…’ ही गाणी तिला मिळाली. अमराठी संगीत दिग्दर्शकासोबत तीने तेलगू, तमीळ, भोजपुरी, कन्नड अशा अनेक भाषेत गाणी गायली.
वैशालीला ब्रँडींगचे भलतेच वेड. त्यातून तीने ‘पिझा बॉक्स’ नावाचा ब्रँड सुरु केला. पार्ल्यात दुकान सुरु केले. ते तसे यशस्वी झाले ही पण कोरोनाने पिझ्झाचा बॉक्स बंद करुन टाकला. या संपूर्ण प्रवासात तिला स्वत:च्या नावाने शो झाला पाहिजे याची क्रेझ होती. थोडक्यात काय तर ‘वैशाली सामंत संगीत रजनी’ या नावाने कार्यक्रम करण्याची तिची इच्छा पूर्ण झाली लोकमतच्या व्यासपीठावर. लोकमत औरंगाबादच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम औरंगाबादेत झाला. मला आठवतं, त्या कार्यक्रमाला तब्बल २५ हजाराहून अधिक रसिकांनी गर्दी केली होती. लोक खूर्ची डोक्यावर घेऊन नाचत होते. अदभूत अनूभव होता तो. त्यानंतर तीला गाण्यांच्या कार्यक्रमांचे गणित कळाले. पुढे तीने सिलीगुडी, केरळ, पंजाब, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सोडून जगभर तिला ‘दाजिबा’ आणि अन्य गाण्यांनी फिरवून आणले.
आता तिला संगीतकार होण्याचा ध्यास लागला होता. महिला संगीतकार अशी आपल्याकडे कोणीच नाही. ती ओळख तिला तिच्या नावावर हवी होती. त्यातून तिने ‘गलगले निघाले…’, ‘गोरी गोरी मांडवाखाली’ अशी गाणी केली आणि अजिंक्य देव सोबत तीने ‘जेता’ या चित्रपटासाठी पहिली महिला संगीतकार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख तयार केलीच. संगीतकार म्हणून तिच्याकडे साक्षात लता मंगेशकर, आशा भोसले, उशा उथ्थूप, सोनू निगम, शंकर महादेवन, साधना सरगम अशा अनेकांनी गाणी गायिली.
एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात व्यावसायिक गाण्याचे कोणतेही वातावरण नसताना वैशालीने स्वत:ची ओळख तयार केली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने यापेक्षा चांगली ओळख आणखी कोणत्या रणरागिणीची असू शकेल..? ऑल द बेस्ट वैशाली…!
वैशाली सामंत हिला जेव्हा तिच्या या सगळ्या प्रवासाबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणते, एकत्र कुटुंब आणि भरपूर मजा केलेली मी लहानपणी… माझ्या लहानपणीच्या आठवणी खूप रम्य आहेत. सगळे खेळ, सगळे सण, आमच्याकडे दणक्यात साजरे केले जायचे, आणि आता मी जे काम करते ते सगळे माझ्या गाण्यातून झिरपतं. भोंडल्याची गाणी, लग्नाची गाणी, मंगळागौरी हे सगळे अनुभवलेलं माझ्या डोक्यात ताज ताज आहे. पाच मामा आणि तीन आत्या या सगळ्यांची लाडकी होते. त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, आणि माझ्यावर विश्वास होता. माझं कुटुंब ही माझी आजही खूप मोठी ताकद आहे.
Comments