रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

मराठी माणूस एकमेकांशी भांडतोय, वाचा आणि थंड बसा..!

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

मराठी तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे… मराठी माणूस मुंबई टिकला पाहिजे… मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी शिवसेना लढेल… मराठी माणसांना योग्य मान मिळवून घेण्याचे काम शिवसेनाच करेल… मुंबईत मराठी माणसाला ८० टक्के नोकऱ्या आणि ८० टक्के घरे मिळालीच पाहिजेत ही शिवसेनेची भूमिका आहे… मराठी जनतेला एकत्र आणण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसेना करेल, अशा घोषणा देत मराठी मनात ऊर्जा निर्माण करत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मुंबईत रुजवली आणि वाढवली.

शिवसेनेचा उगम, प्रचार, प्रसार हा मराठीच्या मुद्द्यावरुन झाला. मराठीच्या अस्मितेसाठी झाला. “कोणी वंदा, कोणी निंदा, महाराष्ट्र हिताचा आमचा धंदा” असेही बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक मधून सांगितले होते. त्यामुळेच त्या काळात मुंबई, ठाणे आणि परिसरातील मराठी माणूस बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे खेचला गेला. मराठीची अस्मिता हे शिवसेना स्थापनेचे मूळ होते. ‘बजाव पुंगी हटाव लुंगी’ असा नारा देत बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिणेकडून होणारे अतिक्रमण रोखण्याची मोहीम हाती घेतली. मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मुंबईतल्या किती कंपन्यांमध्ये साउथ इंडियन लोकांना नोकऱ्या मिळतात, त्याच्या याद्या बाळासाहेबांनी त्यावेळी मार्मिक मधून छापणे सुरू केले. स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना केली. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, एलआयसी, विमानतळ अशा ठिकाणी मराठी तरुणांना का घेतले जात नाही? असा सवाल करत बाळासाहेबांनी मुंबईभर आंदोलन पेटवले. मराठी माणूस एकत्र करण्याचे, जोडण्याचे आणि मराठी तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून केले.

मात्र त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या काही दिवस आधी ऐन दिवाळीत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाण्यातील शाखेवरून एकमेकांना भिडले. दुसऱ्याने पहिल्यांदा काळे झेंडे दाखवले. पहिल्याने दुसऱ्याचा गद्दार, खोके असे म्हणत उद्धार केला. ठाण्यात झालेला राडा आणि दोन मराठी गट एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून तारस्वरात घोषणाबाजी करतानाचे चित्र कमालीचे अस्वस्थ करणारे होते. भारत पाकिस्तान युद्धात जसे दोन गट एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात, तसे चित्र त्यादिवशी होते. पोलिसांनी मध्यभागी बॅरिकेटिंग करून रिकाम्या जागेत दोन्ही दिशेने आपला बंदोबस्त लावला होता. दोन्ही बाजूच्या रेटारेटीत तो बंदोबस्त हटला असता तर दोन गट एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत एकमेकांना भिडले असते. या घटनेच्या काही दिवसांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे जोरदार भिडले. पुन्हा शिवीगाळ आणि एकमेकांचा उद्धार करून झाला. येणाऱ्या काळात निवडणुकांचे स्वरूप कसे असेल, त्याची ही नुसती झलक होती. निवडणुका जशा जवळ येतील तसे मराठी माणसाने, मराठी माणसाचे डोके फोडले अशा बातम्या आल्या तर फार आश्चर्य वाटायचे कारण नाही. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली, त्याच शिवसेनेच्या दोन गटातील मराठी माणसं एकमेकांचे शत्रू झाले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी त्यांना फुटकळ कारणे देखील पुरेशी ठरत आहेत.

जे काही सध्या शिवसेनेत सुरू आहे, ते पाहून बाळासाहेबांना काय वाटले असते? याचा विचार अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांनाच नव्हे तर मराठी मनाला भंडावून सोडत आहे. याचसाठी केला होता का अट्टाहास… असा प्रश्न अनेकांना पडतोय. पण त्याचे उत्तर मागायचे कुणाला..? राजकीय झेंडे आणि भूमिका बाजूला सारून मुंबईतल्या मराठी माणसांना जे काही चालू आहे ते तुम्हाला पटत आहे का? असे विचारले तर ते लोक भडभडून बोलतील. मात्र या गटाकडे बोललो तर तो गट नाराज होईल आणि त्या गटासोबत एखादा कार्यक्रम केला तर हा गट नाराज होईल. त्यामुळे कोणासोबतच जायला नको, अशी मानसिकता हळूहळू वाढत आहे. मध्यंतरी एका गटाचा नेता, दुसऱ्या गटाच्या नेत्यासोबत एका कार्यक्रमात भेटला. दोघांमध्ये बोलणे झाले. त्याची व्हिडिओ क्लिप जेव्हा दुसऱ्या गटाच्या नेत्याकडे गेली, तेव्हा त्याने अत्यंत जवळचे संबंध असतानाही तू आता त्यांच्यासोबत आहेस. माझ्याकडे कशाला येतोस, असे म्हणत त्या नेत्याला वाटेला लावले. ही कटूता दोन मराठी माणसांमध्येच निर्माण झालेली नाही. तर एकाच घरात बाप एका गटात तर मुलगा दुसऱ्या गटात इथपर्यंत ही फुट आणि कटूता गेली आहे.

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून, सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी आणि नंतरच्या काळात राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेला साद घालण्याचे काम केले. ‘बजाव पुंगी हटाव लुंगी’ म्हणत जसे दक्षिणेतल्या लोकांना थेट आव्हान दिले तसेच उत्तर प्रदेश, बिहार मधून येणाऱ्या लोंढ्यांच्या विरोधात ज्या शिवसेनेने आवाज बुलंद केला, त्याच शिवसेनेत असणारी दोन मराठी माणसं एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभी आहेत. उत्तरप्रदेश, बिहार मधून आलेले परप्रांतीय हा सगळा तमाशा शांतपणे बघत मनातल्या मनात विकट हास्य करत असतील. कोणी कोणाचे घर फोडले? कोणी कोणाचा पक्ष फोडला? याची उत्तरं येणाऱ्या काळात निवडणुकीच्या निकालातून मिळतील. मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असेल. मराठी मनात उभी फूट पडेल. बाप-मुलगा, भाऊ-बहीण, काका-पुतण्या अशा विविध नात्यांमध्ये या गटबाजीमुळे टोकाचे वितुष्ट निर्माण होईल, जे पुन्हा सहजासहजी जोडले जाणार नाही. मार्मिक मध्ये मराठी माणसांना डावल कसे डावलले जात आहे, याची माहिती दिली जायची. त्यावर ‘वाचा आणि थंड बसा’ असे लिहिलेले असायचे. या लेखाच्या शेवटी देखील, ‘वाचा आणि थंड बसा’ या पलीकडे काय लिहायचे…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *